*✨अगाध समृद्धी✨*
*दैन्यावस्थेत राहणे मला समजते, संपन्नतेतही राहणे समजते. प्रत्येक प्रसंगी अन्नतृप्त असणे व क्षुधित असणे, संपन्न असणे व विपन्न असणे ह्याचे रहस्य मला शिकविण्यात आले आहे..✍🏼*
*( फिलिप्पै ४:१२ )*
*...मनन...*
*!!..परमेश्वराची स्तुती असो..!!*
या अध्यायाद्वारे पौलाला दोन गोष्टींचा उल्लेख करायचा आहे. फिलिप्पै येथील मंडळीतील लोकांनी त्याच्यासाठी पाठवलेल्या देणग्यांबद्दल त्यांचे आभार मानायचे आहेत आणि त्याचबरोबर त्यांना न दुखवता अगदी सौम्यतेने त्यांना मानवी साहाय्यावर नव्हे तर प्रभूवर विसंबून, अवलंबून राहण्याचे आध्यात्मिक तत्व सांगायचे आहे. त्यांनी पाठवलेल्या देणग्यांमुळे त्याला आनंद झाला तरीही त्यांच्याकडून आणखी देणग्या मिळण्याच्या अपेक्षेने तो हे लिहीत नाही किंवा त्यांच्यावर अवलंबून राहण्याचा त्याचा विचार नव्हता. याउलट जवळ काही असो की नसो, येईल त्या परिस्थितीत संतुष्ट राहण्याचे रहस्य त्याला अवगत आहे. ज्याची आपल्याला आवश्यकता आहे ते सर्व काही प्रभू देईलच आणि सर्व प्रसंगांना तोंड देण्यास बळही तो देईल यावर त्याचा ठाम विश्वास आहे. आपण कुठल्याही परिस्थितीला जुमानत नाही, ती कशीही असो, त्यापासून आपण स्वतंत्र आहो, पण त्याचबरोबर सकल पूर्णता असलेली साधनसामग्री त्याला शक्तीमान करणाऱ्याच्या म्हणजे जिवंत प्रभू येशूच्या द्वारे मिळते हेही तो आवर्जून सांगत आहे. तो म्हणतो, *"जो मला सामर्थ्य देतो त्याच्याकडून मी सर्व काही करावयास शक्तीमान आहे." ( वचन १३)*
ख्रिस्ताच्या मार्गाने चालणाऱ्या प्रत्येकाने समाधानी वृती बाळगली पाहिजे. पौल म्हणतो, *"चित्तसमाधानासह भक्ती हा तर मोठाच लाभ आहे. आपण जगात काही आणले नाही, आपल्याला त्यातून काही नेता येत नाही." ( १ तीमथ्य ६:६,७)* परंतु आज आपण पाहातो की, जास्तीत जास्त लोक श्रीमंत होण्याची इच्छा बाळगतात. त्यांच्या मनात सदैव पैशांचा लोभ राहातो. पण पवित्र शास्त्र आपल्याला चेतावनी देते की, *"धनवान होण्यासाठी धडपड करू नको. आपले चातुर्य एकीकडे ठेव. जे पाहता पाहता नाहीसे होते, त्याकडे तू नजर लावावी काय ? कारण गगनात उडणाऱ्या गरूडासारखे पंख धन आपणांस लाविते." ( नीति २३:४,५)* म्हणून आम्ही नश्वर धनाकडे नाही तर आमच्या प्रभू येशू द्वारे मिळणाऱ्या आध्यात्मिक श्रीमंतीमध्ये समाधानी व्हावे. पवित्र वचनाची श्रीमंतीच सर्वश्रेष्ठ आहे हे ओळखावे.
समाधानी वृत्तीचे हे रहस्य आहे की आम्ही पौल म्हणतो त्याप्रमाणे, दैन्यावस्थेत किंवा संपन्नतेतही तृप्त असावे. कारण ख्रिस्ताला ओळखणे आणि त्याच्या सेवेसाठी पाचारण होणे हीच 'अगाध समृद्धी' आहे. पौल म्हणतो, *"मी जो सर्व पवित्र जनांतील लहानाहून लहान त्या माझ्यावर ही कृपा अशी झाली की, मी ख्रिस्ताच्या अगाध समृद्धीची सुवार्ता परराष्ट्रीयांना सांगावी." ( इफिस ३:८)* म्हणून प्रियांनो, परमेश्वराने आम्हाला ज्या अवस्थेमध्ये ठेवले आहे तिच्यात तृप्त राहून परमेश्वराचे गौरव करावे. कारण आमच्या स्वर्गीय पित्याची इच्छा हीच आहे की आम्ही नेहमी तृप्त व आनंदी असावे.
No comments:
Post a Comment