*✨दैवी ज्ञानात वाढा✨*
*( भाग -३ )*
*..तुम्ही होईल तितका प्रयत्न करून आपल्या विश्वासात सात्विकतेची, सात्विकतेत ज्ञानाची, ज्ञानात इंद्रियदमनाची, इंद्रियदमनात धीराची, धीरात सुभक्तीची, सुभक्तीत बंधुप्रेमाची, बंधुप्रेमात प्रीतीची भर घाला..✍🏼*
*( २ पेत्र १:५-७ )*
*...मनन...*
*!!..परमेश्वराची स्तुती असो..!!*
सात्विक जीवन जगण्यासाठी काय केले पाहिजे, आमचे आचरण, आमची वर्तणूक कशी असली पाहिजे हे आपण काल पाहिले. आमच्या ठायी सात्विकता असल्याशिवाय आम्ही देवाजवळ जाऊ शकत नाही, आमचे जीवन देवाला संतोषविणारे असे असू शकत नाही. पेत्र म्हणत आहे, सात्विकतेत ज्ञानाची, ज्ञानात इंद्रियदमनाची, इंद्रियदमनात धीराची, धीरात सुभक्तीची, सुभक्तीत बंधुप्रेमाची, बंधुप्रेमात प्रीतीची भर घाला. आज आपण पूढील भाग पाहणार आहोत.
"तुमच्या विश्वासात... ज्ञानाची भर घाला." -
*ज्ञान -* सर्व खऱ्या ज्ञानाचा सर्वात महत्वाचा केंद्रबिंदू परमेश्वर आहे. त्याच्याशिवाय ज्ञानप्राप्ती होऊ शकत नाही. खरे ज्ञान प्राप्त करू इच्छिणाऱ्याला देवाबद्दल आदरयुक्त भय असले पाहिजे. कारण *परमेश्वराचे भय ज्ञानाचा आरंभ होय.* देवाचे भय नसेल तर मानवी ज्ञान व जगिक बुद्धी यांना काही महत्व राहणार नाही. परमेश्वराचे भय धरणे म्हणजे काय ? *परमेश्वराचे भय धरणे म्हणजे दुष्कर्माचा द्वेष करणे होय; गर्व अभिमान, कुमार्ग व उद्दामपणाची वाणी ह्यांचा मी ( ज्ञान) द्वेष करते. ( नीति ८:१३)* म्हणून आम्ही या वचनाप्रमाणे परमेश्वराचे भय धरण्यासाठी सर्व प्रकारचे दुष्कर्म, अनीती, गर्व, अभिमान, कुमार्ग व उद्दामपणा सोडून देऊन देवाची वाणी ऐकली पाहिजे आणि त्याचेच भय बाळगले पाहिजे. पौल म्हणतो, *ज्ञानी कोठे राहिले ? शास्त्री कोठे राहिले ? ह्या युगाचे वाद घालणारे कोठे राहिले ? 'देवाने जगाचे ज्ञान मूर्खपणाचे ठरविले की नाही' ? ( १ करिंथ १:२०)* परमेश्वराचे भय नसल्यामुळे एक जगिक मनुष्य, त्याला माहीत असलेल्या गोष्टींवरून चूकीचा निर्णय घेतो व शेवटी तो एक मूर्ख ठरतो. मूर्ख लोक बुद्धीच्या वाणीकडे लक्ष देत नाहीत, परिणामतः ते आपल्या वर्तनाचे फळ भोगतील. त्यांचे भलतीकडे वळणे व भरभराट त्यांचा नाश करिते. ( नीति १:२२-३३)
नीतिसूत्रकार म्हणतो, *"ज्ञान ही श्रेष्ठ चीज आहे म्हणून ते संपादन कर, आपली सर्व संपत्ति वेचून सूज्ञता संपादन कर." ( नीति ४:७)* म्हणजेच प्रसंगी संपत्ती नसली तरी चालेल, ती विकून टाक, पण ज्ञान संपादन करण्यास, मिळविण्यास झटून प्रयत्न कर. ज्ञानात वाढ केल्याने आम्हाला फलदायी होण्यास मदत होऊ शकते. आणि आम्हाला दिसेल की अधिक ज्ञान घेणे आम्हाला अधिक आनंददायक वाटू लागेल. ( नीति २:२-५) ज्ञानाच्या द्वारे आम्ही जे काही शिकू त्याची आम्हाला आठवण राहील आणि इतरांना शिष्य बनविण्यासाठी त्यांना शिकवताना ते आम्हाला उपयुक्त ठरेल. *"ज्ञान्याला बोध केला तर तो अधिक ज्ञानी होईल: नीतिमानाला बोध केला तर त्याचे ज्ञान वाढेल." ( नीति ९:९)* ह्या प्रकारे देखील आम्ही फलदायी होऊ शकतो व आमच्या प्रभूचा महिमा, गौरव करू शकतो. पेत्र लिहितो, *"आपला प्रभू व तारणारा येशू ख्रिस्त ह्याच्या कृपेत व ज्ञानात वाढत जा. त्याला आता व अनंतकालपर्यंत गौरव असो." ( २ पेत्र ३:१८)*
No comments:
Post a Comment