*✨ख्रिस्ती स्वभावगुण✨*
*कारण हे गुण तुमच्यामध्ये असून ते वाढते असले तर, आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्या ओळखीविषयी तुम्ही निष्क्रिय व निष्फळ ठरणार नाही, असे ते तुम्हाला करतील..✍🏼*
*( २ पेत्र १:८ )*
*...मनन...*
*!!..परमेश्वराची स्तुती असो..!!*
या वचनामध्ये सांगितलेले गुण कोणते आहेत ? कोणत्या गुणवैशिष्ट्यांमुळे आम्ही ख्रिस्ताच्या स्वभावाचे होऊ शकतो ? ख्रिस्ती लोकांना ही साधनसामग्री म्हणजे सामर्थ्य व अभिवचने दिलेली आहेत. म्हणून आपले ध्येय साध्य करण्याचे महत्व सांगून पेत्रने त्या दिशेने पूढे जाण्यासाठी सात गुण आत्मसात करण्यास सांगितले आहेत. त्यामध्ये वाढत जाऊन ख्रिस्तासारखे होणे हे ध्येय साध्य करण्यासाठी होईल तितका प्रयत्न करण्यास सांगितले आहे. आत्मिक दृष्टीने विजयी, परिणामकारक आणि फलदायी होण्यासाठी जे सकारात्मक स्वभावगुण ख्रिस्ती व्यक्तीने धारण केले पाहिजेत त्यांची यादी सांगताना पेत्र म्हणतो, *"आपल्या विश्वासात सात्विकतेची, सात्विकतेत ज्ञानाची, ज्ञानात इंद्रियदमनाची, इंद्रियदमनात धीराची, धीरात सुभक्तीची, सुभक्तीत बंधूप्रेमाची व बंधुप्रेमात प्रीतीची भर घाला." ( वचन ५-७)* ख्रिस्ती विश्वासणाऱ्याने ही सर्व सात गुणवैशिष्ट्ये एकत्रितपणे आणि परिपक्वता व परिपूर्णता मिळेपर्यंतच नाही तर सतत विकसित करायची आहेत. हे स्वभावगुण देवावर अवलंबून राहिल्याशिवाय व ते विकसित करण्यासाठी परिश्रमपूर्वक प्रयत्न केल्याशिवाय आपोआप वाढत नाहीत किंवा विकसित होत नाहीत. पेत्र स्पष्टपणे सांगत आहे की, ख्रिस्ती लोकांनी हे सात स्वभावगुण अंगी बाणले पाहिजेत. खोटे शिक्षक याउलट शिक्षण देत होते. परंतु पेत्र म्हणतो, *"ज्याने तुम्हाआम्हांला आपल्या गौरवासाठी व सात्विकतेसाठी पाचारण केले त्याच्या ओळखीच्या द्वारे, त्याच्या ईश्वरी सामर्थ्याने, जीवनास व सुभक्तीस आवश्यक असलेल्या सर्व गोष्टी आपल्याला दिल्या आहेत." ( वचन ३)*
या सर्व गुणवैशिष्ट्यांचा पाया हा विश्वासावर आधारलेला आहे. त्यामुळे प्रथम आमचा विश्वास हा मजबूत असला पाहिजे. आमचा विश्वास हा कृतीत उतरला पाहिजे. ज्यामुळे देवाविषयीचे आमचे ज्ञान सखोल होईल आणि आम्हाला आमच्या जीवनात या गुणांची वाढत्या प्रमाणात जोपासना करून प्रभूचा सखोल अनुभव घेऊन आमचे ख्रिस्ती जीवन सफल करता येईल. काही लोक देवाच्या या योजनेकडे साफ दुर्लक्ष करून स्वतःच्या इच्छेनुसार चालतात, त्यांच्याविषयी पेत्र म्हणतो, *ज्याच्या अंगी ते नाहीत तो आंधळा आहे, अदूरदृष्टीचा आहे, त्याला आपल्या पूर्वीच्या पापांपासून शुद्ध झाल्याचा विसर पडला आहे. ( वचन ९)* ख्रिस्ताच्या स्वभावात सहभागी होऊन त्याला 'माझ्यामधून जगू देणे' हाच या जगातील भयंकर पापांपासून दररोज सूटका करण्याचा मार्ग आहे. देवाचा स्वभाव प्रत्येकालाच मिळालेला नाही. सर्वच मानवांमध्ये दिव्यपणा नाही. ( १ करिंथ ११:७) त्याच्या जीवनातील कणभरसुद्धा अंश आमच्यामध्ये नाही. आम्ही ख्रिस्ताशिवाय मृत व निर्जीव असे आहोत. दिव्य तारक आमचा होतो तेव्हाच देवाचा दिव्य स्वभाव आम्हाला मिळतो. ख्रिस्त आमच्यामध्ये आहे तर दिव्य स्वभाव देखील आमच्यामध्ये आहे हे लक्षात आणून आम्ही धैर्य धरावे. ख्रिस्ताची "मोलवान व अतिमहान" अशी वचने आमच्यासमोर आहेत म्हणून आपण कशालाही न घाबरता सरळ पूढे चालावे. ( वचन ४)
प्रियांनो, देवाने आम्हाला दिलेला दिव्य स्वभाव आमच्या जीवनाच्या दैनंदिन आचरणातून स्पष्टपणे दिसला पाहिजे. ख्रिस्ती सद्गुणांचे आचरण हेच ख्रिस्ती शीलस्वभाव आहे. ख्रिस्ती सद्गुण हे आत्म्याचेच फळ आहे हे गलती ५ व्या अध्यायातून पाहावयास मिळते. आमचे वागणे आणि बोलणे यातून आमचे ख्रिस्तीपण इतरांना समजते का ? आमचे ख्रिस्ती असणे आम्ही न सांगता इतरांना ओळखता येते का ? ज्याप्रमाणे ख्रिस्ताला धरून नेले त्या रात्री पेत्राला एकाच व्यक्तीने नाही तर तीन व्यक्तींनी ओळखले होते की तो ख्रिस्ताबरोबर होता. आमचेही वर्तन असे असावे की ज्यामुळे आम्ही प्रभूचे लोक आहोत हे आपोआपच जाहीर होईल. कारण देवाने आम्हाला बदललेला दिव्य स्वभाव दिला आहे. आमचे वेगळेपण आमच्या आचरणातून इतरांना दिसून आले पाहिजे.
No comments:
Post a Comment