*✨देहावर ताबा✨*
*( भाग -४ )*
*..तुम्ही होईल तितका प्रयत्न करून आपल्या विश्वासात सात्विकतेची, सात्विकतेत ज्ञानाची, ज्ञानात इंद्रियदमनाची, इंद्रियदमनात धीराची, धीरात सुभक्तीची, सुभक्तीत बंधुप्रेमाची, बंधुप्रेमात प्रीतीची भर घाला..✍🏼*
*( २ पेत्र १:५-७ )*
*...मनन...*
*!!..परमेश्वराची स्तुती असो..!!*
आपण आतापर्यंत विश्वासात सात्विकतेची आणि सात्विकतेत ज्ञानाची भर घालणे हे पाहिले. खरे ज्ञान आम्हाला पापापासून, पतन होण्यापासून वाचविते. कारण ते देवापासून प्राप्त झालेले असते. देवाचे भय धरणाऱ्यांस ते प्राप्त होते. वचन सांगते, परमेश्वराचे भय ज्ञानाचा आरंभ होय. आम्ही पाहातो की, परमेश्वराचे भय धरणारांनी दुष्कर्माचा, गर्व, अभिमान बाळगणाऱ्यांचा, उद्दामपणे बोलणाऱ्यांचा द्वेष करावा किंवा अशा वाईट गोष्टींपासून दूर राहावे.
आज आम्ही इंद्रियदमन याविषयी पाहणार आहोत.
"आपल्या... ज्ञानात इंद्रियदमनाची... भर घाला."
*इंद्रियदमन -* इंद्रियदमन म्हणजे काय ? इंद्रियदमन म्हणजे आपल्या स्वतःच्या इच्छा, भावना आणि वासना आपल्या ताब्यात म्हणजे नियंत्रणात ठेवणे. त्यासाठी आम्ही आमच्या जीवनात येणाऱ्या मोहांना जिंकून, त्या मोहांवर विजय मिळवून आध्यात्मिक दृष्टीने पवित्र, शुद्ध, भक्कम आणि स्थिर राहण्यासाठी देवावर अवलंबून राहणे आवश्यक आहे. देवावरील विश्वासाद्वारे आम्ही आमच्या जीवनातील मोह, परीक्षांना तोंड देऊन त्यावर जय प्राप्त करू शकतो. इंद्रियदमन म्हणजे देहवासना पूर्ण करण्यापासून स्वतःला रोखणे. सोप्या भाषेत सांगायचे म्हणजे सर्व प्रकारच्या वाईट गोष्टींना, मोहांना 'नाही म्हणणे'. हो, वाईट गोष्टी करण्यास 'नकार दर्शविणे'. ही एकप्रकारची लढाई आहे सर्व देहवासनांविरोधात. आणि ती आम्हाला जिंकायची आहे.
बायबलमध्ये आपण पाहातो की, नीतिमान ठरवले गेलेले, देवाला प्रिय असलेले लोकही या एका 'नाही म्हणणे' न जमल्यामुळे पतन पावले. दाविद राजाविषयी आम्हां सर्वांना माहीत आहे, त्याने त्याच्या डोळ्यांच्या द्वारे घडलेल्या पापास सुरूवातीसच नकार दिला असता, आपल्या मनाला नाही म्हटले असता, संयम बाळगला असता तर पापात पडला नसता आणि दोन निर्दोष जीव गेले नसते. ( बथशेबेचा पती उरिया हित्ती आणि दाविदापासून तिला झालेला प्रथम पुत्र ) याउलट न केलेल्या पापांची कबूली देत प्रेषित पौल म्हणतो, *"जे चांगले करावेसे मला वाटते ते मी करीत नाही; तर करावेसे वाटत नाही असे जे वाईट ते मी करितो." ( रोम ७:१९)* पौल देवाच्या इच्छेनुसार चालणारा होता, त्याच्या ठायी काही दोष नव्हता. तरीही तो देवाला शरण जाऊन पूढे म्हणत आहे की, *माझा अंतरात्मा देवाच्या नियमशास्त्रामुळे हर्ष करितो; तरी माझ्या अवयवात मला निराळाच नियम दिसतो; तो माझ्या मनातल्या नियमाबरोबर लढतो आणि मला कैद करून माझ्या अवयवातील पापाच्या नियमाच्या स्वाधीन करितो. किती मी कष्टी माणूस ! मला ह्या मरणाधीन असलेल्या देहापासून कोण सोडवील ?" ( रोम ७:२२-२४)*
पौल म्हणतो, *"तर मी आपले शरीर कुदलतो व त्याला दास करून ठेवतो;.." ( १ करिंथ ९:२७)* आम्हालाही गरज आहे आमच्या शरीराला काबूत ठेवण्याची, आमच्या मनावर ताबा ठेवण्याची. कारण पाप फक्त शरीरानेच नाही तर मनानेही होते. आमच्या मनात असलेल्या इतरांबद्दलच्या द्वेष, मत्सर, क्रोध, हेवा इत्यादि गोष्टी देखील पापच आहेत. अशा सर्व प्रकारच्या पापांना आम्हाला 'नाही म्हणता' आले पाहिजे. परंतु आज 'नाही म्हणण्याची' असमर्थता आणि अनिच्छा अभूतपूर्व प्रमाणात दिसून येते. यावरून हेच दिसून येते की आपण खरोखरच "शेवटल्या काळात" जगत आहोत. आणि पौलाने सांगितल्याप्रमाणे *"शेवटल्या काळी कठीण दिवस येतील कारण माणसे स्वार्थी, धनलोभी, बढाईखोर, गर्विष्ठ निंदक.. असंयमी होतील..." ( २ तीमथ्य ३:१-३)* म्हणून आम्ही या शेवटल्या काळी सर्व प्रकारच्या मोहपरीक्षांना नाही म्हटले पाहिजे, इंद्रियदमन करण्यास शिकले पाहिजे, देहवासना पूर्ण करू नये तर पौल म्हणतो त्याप्रमाणे आत्म्याच्या प्रेरणेने चालावे.
No comments:
Post a Comment