*✨विश्वासाचा पाया✨*
*..तुम्ही होईल तितका प्रयत्न करून आपल्या विश्वासात सात्विकतेची, सात्विकतेत ज्ञानाची, ज्ञानात इंद्रियदमनाची, इंद्रियदमनात धीराची, धीरात सुभक्तीची, सुभक्तीत बंधुप्रेमाची, बंधुप्रेमात प्रीतीची भर घाला..✍🏼*
*( २ पेत्र १:५-७ )*
*...मनन...*
*!!..परमेश्वराची स्तुती असो..!!*
काल आपण पाहिले की, आम्ही वरील वचनात दिलेले सात गुण आत्मसात करणे हे खूप आवश्यक आहे. ख्रिस्ताच्या स्वभावाचे होणे हे आमचे ध्येय असेल, ख्रिस्ताला परिधान करायचे असेल तर ही गुणवैशिष्ट्ये आमच्या अंगी असणे खूप महत्वाचे आहे. ते मिळविण्यासाठी आणि विकसित करण्यासाठी आम्हाला देवावर अवलंबून राहावे लागेल. आम्ही पाहिले की, या सर्व गुणवैशिष्ट्यांचा पाया हा विश्वासावर आधारलेला आहे त्यामुळे हा पाया म्हणजे आमचा विश्वास हा मजबूत आणि ठाम असला पाहिजे. कारण पाया मजबूत असेल तरच संपूर्ण इमारत मजबूत राहील अन्यथा ती कोसळून पडेल. आमची शरीररूपी इमारत देखील विश्वासाच्या पायावरच उभी असली पाहिजे.
विश्वास म्हणजे काय ? पौल म्हणतो, *विश्वास हा आशा धरलेल्या गोष्टींविषयीचा भरंवसा आणि न दिसणाऱ्या गोष्टींबद्दलची खात्री आहे. ( रोम ११:१)* आमच्या ठायी असलेला हा विश्वास आम्हाला सर्व प्रसंगी देवाशी आणि देवाच्या पवित्र वचनाशी एकनिष्ठ राहण्यास सक्षम करतो. हा विश्वास आम्हाला देवाच्या समक्षतेमध्ये आणि वचनामध्ये टिकून राहण्यासाठी मदत करतो. विश्वासाद्वारेच आम्ही देवाजवळ जाऊ शकतो. पौल म्हणतो, *आणि विश्वासावाचून त्याला 'संतोषविणे' अशक्य आहे; कारण देवाजवळ जाणाऱ्याने असा विश्वास ठेवला पाहिजे की, तो आहे, आणि त्याचा शोध झटून करणाऱ्यांना तो प्रतिफळ देणारा आहे. ( रोम ११:६)* पवित्र शास्त्रामध्ये अनेक लोकांच्या विश्वासाबद्दल पाहावयास मिळते. त्यांनी विश्वासाने देवाच्या आज्ञांचे पालन केले आणि ते सर्व नीतिमान ठरले. आम्हीही न दिसणाऱ्या देवावरील विश्वासाने आणि आज्ञापालनाद्वारे नीतिमान ठरवले जाण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. सदोदित आमची काळजी घेणाऱ्या, आम्हाला सर्व परिस्थितीत, संकटात साहाय्य करणाऱ्या देवाच्या अस्तित्वावर आम्ही विश्वास ठेवला पाहिजे आणि आमच्या जीवनात देवाची समक्षता, सामर्थ्य आणि हेतू असावेत अशी इच्छा आम्ही उत्कटतेने बाळगली पाहिजे आणि त्याद्वारे देवाच्या सामर्थ्याचा, चांगुलपणाचा अनुभव आम्ही घेतला पाहिजे.
प्रभू येशूवर विश्वास ठेवणारे लोकच केवळ तारण प्राप्त करू शकतात. तेच लोक देवाची मुले म्हणून बदलली जातात. तेच लोक सार्वकालिक जीवन मिळवू शकतात. विश्वास ठेवणाऱ्यालाच सर्व काही शक्य आहे. म्हणून मार्क आपल्या शुभवर्तमान मध्ये लिहितो.. *"जो विश्वास धरतो व बाप्तिस्मा घेतो त्याचे तारण होईल; जो विश्वास धरत नाही तो शिक्षेस पात्र ठरेल". (मार्क १६:१६)* म्हणून आम्ही देवाच्या पवित्र नावावर विश्वास ठेवला पाहिजे. त्याच्या वचनांवर विश्वास ठेवला पाहिजे.
No comments:
Post a Comment