Saturday, 3 October 2020

स्वतंत्र जन्मलेला



                     स्वतंत्र जन्मलेला
                     गलती.४:१९-३१


गलती.४:१९-३१ मध्ये देवाने आपणांस हा धडा दिला आहे की, आपण मानवी प्रयत्नांनी त्याच्या आज्ञांचे पालन कधीच करू शकत नाही. केवळ येशू ख्रिस्ताला तारणारा म्हणून स्वीकारल्यानेच त्यांचे पालन होऊ शकते. मग आपल्यामध्ये वास करणार्‍या पवित्र आत्म्याद्वारे येशू ख्रिस्ताचे जीवन आपल्यामध्ये परिपूर्ण होते. इश्माएलचा जन्म ही केवळ मानवी योजना होती. त्यात देवाला काही देणेघेणे नव्हते. जे देहापासून आहे ते देवाला नाखूश करते आणि तो ते स्वीकारत नाही. इश्माएल हा देहस्वभावापासून जन्मलेला मुलगा होता आणि त्याची माता दासी असल्यामुळे तोदेखील दासच होता.

परंतु इसहाकाची गोष्ट पूर्णपणे वेगळी होती. तो स्वतंत्र स्त्रीपासून जन्मला होता. तो जगामध्ये येण्यामागे देवाचे कार्य करण्याचा हेतू होता. येथे मुद्दा हा आहे की, ख्रिस्तावरील विश्‍वासाने आपण इसहाकाचे बंधू म्हणून गणले जातो. मानवी प्रयत्नाने नाही तर स्वर्गीय सामर्थ्याने जन्मलेले असे आपण अभिवचनाची मुले आहोत.


तारणासाठी नियमशास्त्र आवश्यक आहे असे ठाम मत असणार्‍या व्यक्तीची एक प्रबल वृत्ती असते, ती म्हणजे केवळ कृपेनेच तारणप्राप्ती होते असा प्रचार करणार्‍यांचा ते छळ करतात. जे नियमशास्त्रावर जोर देतात त्यांना असे वाटते की, कृपेचा संदेश देणारे लोकांना पाप करणे अधिक सोपे करतात. परंतु ते सत्य नाही. कृपा लोकांना पाप करण्याची परवानगी देत नाही. कृपा आपल्याला देवहीन गोष्टी व जगिक वासना नाकारून साधेसुधे नीतीचे जीवन जगण्यास शिकवते. या कारणास्तव जरी विरोध किंवा छळ सोसावा लागला, तरी आपण तो सहन करण्यास तयार असावे.


परंतु नियमशास्त्र आणि कृपा याकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन कसा असावा? नियमशास्त्र शिकवणार्‍यासोबत राहून आपण काहीच म्हणणार नाही काय? यावर शास्त्रलेखाचे उत्तर आहे, ‘‘त्या दासीला व तिच्या मुलाला घालवून दे; कारण दासीचा पुत्र स्वतंत्र स्त्रीच्या पुत्राबरोबर वारस होणारच नाही’’ (गलती.४ः३०). ते दोघे कधीच मिसळणार नाहीत. आपण कृपेद्वारे तारले गेले आहोत. आपण आता नियमशास्त्राच्या बंधनात नाही. ते आपण दूर सारले आहे.


_ह्या स्वातंत्र्याकरता ख्रिस्ताने आपणास मुक्त केले आहे; म्हणून त्यात टिकून राहा गुलामगिरीच्या जुवाखाली पुन्हा सापडू नका (गलती.५:१)._


No comments:

Post a Comment