Wednesday, 30 December 2020

अजून कोठवर ?



            *✨अजून कोठवर ?✨*


 *हे परमेश्वरा, तू मला कोठवर विसरणार ? सर्वकाळ काय ? तू माझ्यापासून आपले मुख कोठवर लपवणार ?..✍🏼*

                   *( स्तोत्र १३:१ )*


                           *...मनन...*


           *!!..परमेश्वराची स्तुती असो..!!* 


    "कोठवर ?" असा प्रश्न कधी ना कधी आपल्या सर्वांनाच पडतो. कोठवर ? हा प्रश्न यशया आणि हबक्कुक या देवाच्या विश्वासू संदेष्ट्यांनीही विचारला. ( यशया ६:११, हबक्कुक १:२) त्याचप्रमाणे आमच्या प्रभू येशू ख्रिस्तानेही लोकांच्या अविश्वासू असण्याबद्दल म्हटले, *"हे विश्वासहीन व कुटिल पिढी ! मी कोठवर तुम्हांबरोबर असू ? कोठवर तुमचे सोसू ?" ( मत्तय १७:१७)* कशामुळे आम्हाला असा प्रश्न पडतो ? कदाचित अन्याय, दीर्घकाळ चालू असणारे आजारपण, वाढत्या वयातील वेगवेगळ्या समस्या, आसपासच्या लोकांच्या वागण्यातील चुकीची प्रवृत्ती पाहून निराश झाल्यामुळे इत्यादि अनेक गोष्टी आपल्या समोर समस्या बनून उभ्या असतात. परंतु आमचा भरवंसा आमच्या देवावर असला पाहिजे दाविद राजाप्रमाणे. आम्ही अशावेळी धीर धरून परमेश्वराची वाट पाहिली पाहिजे. याकोब लिहीतो, *"माझ्या बांधवांनो, प्रभूच्या उपस्थितीपर्यंत धीर धरा." ( याकोब ५:७)* स्तोत्रकर्ता म्हणजे दाविद राजा खूप खिन्न, खचलेला आणि उद्विग्न झालेला दिसत आहे. दाविद राजाला शत्रूंनी चोहोकडून घेरलेले आहे. अशा वेळी शोकाच्या परिणामातून तातडीच्या प्रार्थनेचा स्वर उमटतो. आणि पालट झाल्याच्या अनुभवातून शांती, विसावा लाभतो. खऱ्या प्रार्थनेत गरजेची प्रत्येक बाजू देवापूढे मांडली जाते. दाविद परमेश्वराची प्रार्थना करत आहे आणि प्रार्थनेचे उत्तर मिळाले म्हणून दाविद परमेश्वराची स्तुती करत आहे, तो म्हणतो, *"परमेश्वराने माझ्यावर फार उपकार केले आहेत, म्हणून मी त्याची स्तुतीस्तोत्रे गाईन." ( वचन ६)*


    या ठिकाणी हा प्रसंग शौलासंबंधी आहे. दाविद परमेश्वराकडे या शत्रूचा ( शौलाचा) नाश व्हावा अशी विनंती करीत नाही. कारण संधी मिळाली असूनही त्याने शौलाला मारले नाही हे आपण पाहातो. दाविद म्हणतो, *परमेश्वराच्या अभिषिक्तावर आपला हात टाकायचे माझ्याकडून न घडो. ( १ शमुवेल २६:११)*  देव खूप दूर असल्यासारखे वाटते तेव्हा आम्ही खचून जातो, आमच्या प्रार्थना ऐकल्या जात नाहीत असे वाटते. दीर्घकाळापासून होणारे क्लेश आम्हाला त्रासून सोडतात. आम्हाला ताबडतोब, एका क्षणात उत्तर हवे असते. पण काही गोष्टी लगेच सुस्थिर करता येत नाहीत. त्या सोसाव्याच लागतात. पण देवाच्या लोकांनी काही महत्वपूर्ण गोष्टी लक्षात घ्यायला हव्यात. नीतिमान लोकांच्या प्रार्थनेची उत्तरे कदाचित लवकर मिळणार नाहीत, पण देव त्यांच्या प्रार्थना ऐकतोच ऐकतो. आजार, आर्थिक अडचण किंवा काही अवघड कौटूंबिक समस्यातून जात असताना देवाने आपल्याला सोडल्याची भावना आपल्याला होते. अशा वेळी पवित्र आत्म्याने आपल्याला शांती व धीर द्यावा अशी प्रार्थना करावी. पवित्र शास्र आम्हाला शिकवते की, आपण आत्मिकरित्या तारले गेलो आहोत आणि देवाबरोबर आपले व्यक्तिगत नाते आहे. ते भावना किंवा परिस्थितीवर आधारित नाही, तर आमच्या ठायी असलेल्या दृढ विश्वासाद्वारे आहे. ही वस्तुस्थिती आपल्याला आनंदी व प्रसन्न होण्यास कारण होते. 


     प्रियांनो, जर आपण येशू ख्रिस्तावरील विश्वासाच्या द्वारे देवावर विसंबून राहात आहोत तर मग देवाने आपल्या प्रार्थनेच्या उत्तराला केलेल्या उशिराचा अर्थ त्याने आम्हाला सोडून दिले आहे असा होत नाही. उलट आपल्या जीवनाद्वारे काही तरी उद्देश सिद्धिस न्यावा अशी त्याची योजना असू शकते. ( पाहा २ करिंथ १२:७-१०, इब्री १२:१०,११) आम्ही आमच्या अडचणीत, संकटात देवाला आपली गाऱ्हाणी सांगू शकतो. आम्ही त्याचे साहाय्य मागावे ही त्याची इच्छा आहे. दुःख, क्लेश संपतीलच असे नाही, परंतु दाविद राजाने दुःख- संकटातही स्तोत्रे लिहीली, गीते गाईली कारण त्याला माहीत होते तो देवाचे लेकरू आहे, देव त्याला साहाय्य करण्यास समर्थ आहे. काय आम्ही देवाचे लाडके मूल आहोत काय ? देव आम्हाला साहाय्य करण्यास समर्थ आहे यावर आमचा विश्वास आहे काय ? प्रियांनो, आम्ही दुःख- संकटातही देवाच्या प्रीतीवर विश्वास ठेवायला शिकले पाहिजे, देवाच्या हाती सर्व सोपवून विश्वासाने त्याच्यावरच अवलंबून राहिले पाहिजे.


ए. डब्ल्यू. थोरोल्ड लिहीतात की, *"आध्यात्मिक जीवनाचे शिखर अखंड सूर्यप्रकाशात सुखानंद अनुभवणे नाही तर देवाच्या प्रीतीवर निःशंक आणि परिपूर्ण विश्वास हेच ते शिखर आहे."*


         

Tuesday, 29 December 2020

वचन जपा



                  *✨वचन जपा✨*


*शिवाय अधिक निश्चित असे संदेष्ट्याचे वचन आमच्याजवळ आहे; ते काळोख्या जागी प्रकाशणाऱ्या दिव्याप्रमाणे आहे; तुमच्या अंतःकरणात दिवस उजाडेपर्यंत व पहाटचा तारा उगवेपर्यंत तुम्ही त्याकडे लक्ष द्याल तर बरे होईल..✍🏼*

                     *( २ पेत्र १:१९ )*


                           *...मनन...*


           *!!..परमेश्वराची स्तुती असो..!!* 


    पेत्र आपल्या पत्रात एका विशिष्ट गोष्टीचा उल्लेख करीत आहे. आपण काल बघितले होते की उत्तरेकडून सुवर्णप्रभा येत आहे, ज्या सीयोन पर्वतावर आपला प्रभू विराजमान आहे. जे आपल्या प्रभूचे नगर आहे. आजही प्रभू प्रकाश याविषयी आपल्याला बोलत आहे. कारण प्रभू येशूचे आगमन जवळ आले आहे. होय, आपला प्रभू येशू आपल्या असंख्य देवदूतांसह लवकरच येत आहे. म्हणून पेत्र बोलत आहे की संदेष्ट्याचे वचन आमच्याजवळ आहे.. ते वचन काय आहे याविषयी तो लिहितो की, ते काळोख्या जागी प्रकाशणाऱ्या दिव्यासारखे आहे. म्हणजेच देवाचे वचन हे दिवा आहे. ते प्रकाश देणारे आहे. त्या प्रकाशात आपल्याला चालायचे आहे. स्तोत्रकर्ता म्हणतो, *तुझे वचन माझ्या पावलांकरिता दिव्यासारखे व माझ्या मार्गावर प्रकाशासारखे आहे. ( स्तोत्र ११९:१०५)* प्रभू येशू म्हणतो, मीच जगाचा प्रकाश आहे.. होय, हा प्रकाश खरा प्रकाश आहे. या जगातील दिवे, विद्युत दिवे, आकाशातील सूर्य, चंद्र आणि तारे हे सर्व या प्रकाशापूढे फिके आहेत. या सर्वांपेक्षा अधिक तीव्र आणि प्रखर असा हा प्रकाश आहे. दिव्य तेजाने युक्त असा हा अत्यंत तेजस्वी प्रकाश आहे. प्रभू येशू ख्रिस्त हाच जगाचा प्रकाश आहे हे आपण कसे समजू शकतो ? जेव्हा प्रभू येशूला वधस्तंभावर खिळले आणि त्याने आपला प्राण पित्याच्या हातात सोपवला तेव्हा संपूर्ण जगभर अंधार पडलेला आपण पाहातो. वचन सांगते, *सहाव्या तासापासून नवव्या तासापर्यंत देशभर अंधार पडला. ( मार्क १५:३३)* यावरून आम्हाला समजू शकते की आमचा प्रभू येशू ख्रिस्त हा खरोखरच प्रकाश आहे.


    वरील वचनाद्वारे आता पेत्र असे बोलत आहे की, हे जे वचन आहे, किंवा हा जो प्रकाश आहे, किंवा हा जो दिवा आहे तो आपल्याला दिवस उजाडेपर्यंत व पहाटेचा तारा उगवेपर्यंत म्हणजे ख्रिस्ताच्या आगमनापर्यंत सांभाळला पाहिजे, जपला पाहिजे. जे देवाचे वचन आपण आपल्या जीवनात स्वीकारले आहे ते येशूच्या आगमनापर्यंत आपल्याला टिकवता आले पाहिजे. कारण वचनात जीवन आहे. दिव्यासारखे प्रकाशने म्हणजे आपण पूर्ण पावित्र्य, शुद्धता राखले पाहिजे. कारण देवाचे वचनच आपल्याला शुद्ध करते. वचनाच्या द्वारे आपण रोज शुद्ध आणि पवित्र होऊन सदैव देवाचा महिमा केला पाहिजे. आपले पावित्र्य जर आपण राखले तर आज जरी प्रभू येशूचे आगमन झाले तरी आपल्याला काहीच भीती नसणार. आपण निश्चितच प्रभूच्या आगमनात उचलले जाणार. 


    म्हणून प्रियांनो, जग आणि जगातील गोष्टींकडे लक्ष केंद्रित न करता आपण आपल्या प्रभूला प्रसन्न केले पाहिजे. आमच्या प्रभूला कशाने संतोष होईल हे प्रथम पाहिले पाहिजे. आम्ही सर्व परिस्थितीत त्यालाच प्रथम स्थान दिले तर तो विश्वासयोग्य देव आहे. तो आपल्याला त्या अंधःकारापासून सुरक्षित ठेवील. योहान आपल्या पत्रात लिहितो की, *जो संदेश आम्ही त्याच्यापासून ऐकला आहे तो तुम्हाला विदित करतो; तो संदेश हा की, देव प्रकाश आहे आणि त्याच्या ठायी मुळीच अंधार नाही. ( १ योहान १:५)* म्हणून आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताला आपल्या अंतःकरणात जागा द्यायला पाहिजे. म्हणजे अंतःकरणात असलेली सर्व अंधाराची कामे नष्ट होतील. योहान म्हणतो, *तरी एकप्रकारे मी तुम्हांस नवी आज्ञा लिहितो. ती त्याच्या व तुमच्या बाबतीत खरोखर तशीच आहे; कारण अंधार नाहीसा होत आहे, व खरा प्रकाश आता प्रकाशत आहे. ( १ योहान २:८)* खरोखरच आमचा प्रभू येशू ख्रिस्त आम्हाला, जे आम्ही पूर्वी अंधकारात होतो, त्या आपल्या सर्वांना काळोखातून प्रकाशात आणण्यासाठी प्रकाश असा या भूतलावर आला आहे. वचन सांगते, *त्यांनी अंधारातून उजेडाकडे व सैतानाच्या अधिकारातून देवाकडे वळावे, म्हणून तू त्यांचे 'डोळे उघडावे,' आणि त्यांच्या पापांची क्षमा व्हावी व माझ्यावरील विश्वासाने पवित्र झालेल्या लोकांमध्ये वतन मिळावे. ( प्रे. कृत्ये २६:१८)*


       

Monday, 28 December 2020

उत्तर दिशेकडे वळा



          *✨उत्तर दिशेकडे वळा✨*


*"तुम्ही ह्या डोंगराभोवती पुष्कळ दिवस फिरत राहिलां आहां; आता उत्तरेकडे वळा;"..✍🏼*

                  *( अनुवाद २:३ )*


                           *...मनन...*


           *!!..परमेश्वराची स्तुती असो..!!* 


      इस्राएल लोकांनी तांबडा समुद्र पार करून अरण्यात प्रवास केला. तेव्हा अनेक दिवस ते सेईर प्रदेशातून तेथील डोंगर भागात फिरत राहिले होते. आपण पाहातो की अरण्यात असताना परमेश्वराने त्यांची प्रत्येक गरज पूर्ण केली होती. देवदूतांचे अन्न म्हणजेच स्वर्गीय मान्ना त्यांना देवाने खावयास देऊन त्यांना तृप्त केले. वचन सांगते की, त्यांचे वस्त्र कधी जूने झाले नाहीत किंवा जीर्ण झाले नाहीत, इतका दूरचा प्रवास करत असतानाही त्यांचे पाय देखील कधी सूजले नाहीत, त्यांच्या चपला झिजल्या नाहीत. इतकेच केवळ नाही तर अगदी त्यांनी मांस खाण्यासाठी कुरकुर केली तर ती देखील त्यांची इच्छा परमेश्वराने पूर्ण केली. कारण परमेश्वर त्यांच्यावर प्रेम करीत होता. परंतु आपण पाहातो की, त्या इस्त्राएल लोकांपैकी कित्येक लोकांनी परमेश्वराचे भय धरले नाही. त्यांनी कधी परमेश्वराला धन्यवाद दिला नाही. कित्येक लोकांवर परमेश्वराचा कोप भडकून त्याने अग्नीने त्यांचा नाश केलेला देखील आपण वाचतो. 


    होय प्रियांनो, या वर्षात प्रभूने कशाप्रकारे तुम्हाला चालवले याची आठवण करा. कशाप्रकारे प्रभूने आम्हाला सांभाळले त्याची आठवण करा. कोरोनासारख्या महारोगातून त्याने आम्हाला सुरक्षित ठेवले. अनेक वेळा संकटे आली, वादळ वारे आले, महापूर आला... परंतु आपला विश्वासयोग्य परमेश्वर सदोदित  आपल्या बरोबर होता. त्याने सर्व काही शांत केले. या कठीण परिस्थितीमध्ये देखील अजूनही त्या इस्त्राएल लोकांसारखे आजचे काही विश्वासणारे दिसून येतात. ते मनापासून परमेश्वराचे भय बाळगीत नाही, त्याचा धन्यवाद करीत नाही, आपल्या जीवनात प्रभूला प्रथम स्थान देत नाही. याउलट आज अनेक लोक स्वतःच्याच उदोउदो करताना दिसून येतात. ते स्वतःचे प्रदर्शन करीत आहेत. आणि ज्या देवाने, ज्या प्रभू येशूने तुम्हाला आम्हाला सुरक्षित ठेवले, सुखरूप ठेवले त्याचा महिमा करताना, स्तुती करताना दिसत नाहीत. प्रवासात प्रभूने वाचवले. कामाच्या ठिकाणी, येतांना जातांना सुरक्षित ठेवले, घरातील काम करीत असताना आपल्या सर्व बहिणींना सांभाळले. आजार, कष्ट, दुःख यात प्रभूने अधिक कृपा दिली. आम्हालाच केवळ सांभाळले असे नाही तर आपली आई,वडील, बहीण, भाऊ, पती पत्नी, मुले, इतर आप्त या सर्वांनाही प्रभूने मोठ्या करुणेने सांभाळले. प्रियांनो, परमेश्वराने अजून आपल्यासाठी काय करायला हवे ? प्रियांनो, प्रभूला सर्व गोष्टींसाठी मनापासून धन्यवाद द्या. त्याची उपकारस्तुती करा.


    पूढे वचनात आपण पाहातो की, आता परमेश्वराची इच्छा आहे की आपण उत्तरेकडे वळावे.. होय उत्तर दिशेलाच आपले उत्तर आहे. का आपल्याला उत्तर दिशेला वळायचे आहे ? काय आहे उत्तर दिशेला ? प्रियांनो, कारण उत्तर दिशेकडून एक सुवर्णज्योत आपल्याकडे येत आहे. तो महान गौरव आपल्याकडे येत आहे, ते पवित्र तेज आपल्याकडे येत आहे. मोशे परमेश्वराला भेटण्यासाठी जेव्हा पर्वतावर जात असे, जेव्हा तो परत येई तेव्हा त्याचे मुख त्या सुवर्ण तेजाने भरलेले असे. आज त्या तेजाची आपल्याला गरज आहे. ते तेज आपल्यातील अंधकार दूर करील. ते तेज आपल्यातील दुष्ट विचार नष्ट करील. ते तेज तुम्हाला आणि मला प्रकाशित करील. वचन वाचू या.. *उत्तर दिशेकडून सुवर्णप्रभा येते, देव भयजनक तेजाने मंडित आहे. ( ईयोब ३७:२२)* 


    होय प्रियांनो, चला आपण उत्तरेकडे जाऊ या. आपला परमेश्वर भयजनक तेजाने, महिम्याने भरलेला आहे. ही सुवर्णप्रभा येते कोठून ? असे आहे तरी काय उत्तर दिशेकडे ? सूर्याच्या किरणांपेक्षाही तेजस्वी किरणे आहेत ही. संपूर्ण शरीर नाही तर आत्मा, प्राण, शरीर तेजस्वी करणारी ही सुवर्णप्रभा आहे. हीच सुवर्णप्रभा आपल्याला पूर्ण पवित्र, शुद्ध करीत आहे. कशासाठी पवित्र करत आहे ? प्रभूच्या राज्यासाठी, सार्वकालिक जीवनासाठी. उत्तर दिशेला कोण आहेत ? आपण बघूया... स्तोत्रकर्ता म्हणतो, *उत्तर सीमेवरील सीयोन डोंगर, राजाधिराजाचे नगर, उच्चतेमुळे सुंदर व सर्व पृथ्वीचा आनंद आहे. ( स्तोत्र ४८:२)* किती सुंदर !! उत्तर दिशेकडे सीयोन डोंगर आहे.. जे आपल्या देवाचे नगर आहे... होय प्रियांनो, सीयोन डोंगराकडे त्या उत्तर दिशेकडे जाऊ या. या संपूर्ण वर्षात अनेक वेळा आपण प्रभूपासून दूर गेलो असू, पण आता प्रभू येशूचे आगमन जवळ आले आहे. आज पूर्ण मनाने आपण एक निश्चय करू या आणि प्रभूला आमच्या जीवनात प्रथम स्थान देऊया. तेव्हाच त्याचा महिमा, त्याचे तेज आपल्यावर पडेल आणि येशूच्या आगमनात आपण उचलले जाऊ.


         

Saturday, 26 December 2020

अतिपवित्र देव



              *✨अतिपवित्र देव✨*


*आणि जे दिसले ते इतके भयंकर होते की, मोशे म्हणाला, ' मी अति भयभीत' व ' कंपित' झालो आहे.. ✍*

                    *( इब्री १२:२१)*


                           *...मनन...*


          *!!..परमेश्वराची स्तुती असो..!!*


    इस्राएल लोकांना देवाने नियमशास्र दिले तेव्हा ते सिनाय पर्वताजवळ राहात होते. देवाने त्यांना प्रगट व्हायचे ठरविले तेव्हा त्याने त्या सर्वांना पवित्र आणि शुद्ध होण्यास सांगितले होते. नंतर आपण पाहातो की, पर्वतावर मेघ उतरले. विजा चमकू लागल्या आणि भूमिकंप झाला. तेव्हा त्यासमयी मोशेला सुद्धा भिती वाटली. परमेश्वर देव हा अतिपवित्र असून तो मनुष्य नाही किंवा मनुष्यांपैकी कोणी नाही. तो अति थोर न महान देव आहे हे इस्राएल लोकांना समजावे म्हणून तो अशाप्रकारे प्रगट झाला. *सर्व सिनाय पर्वतावर धूर पसरला कारण परमेश्वर अग्नीतून त्याच्यावर उतरला. भट्टीच्या धूरासारखा त्याचा धूर वर चढला व सर्व पर्वत थरथरू लागला. शिंगाचा आवाज अधिकच वाढू लागला तेव्हा मोशे बोलू लागला व देव त्याला आपल्या वाणीने उत्तर देत गेला. ( निर्गम १९:१८,१९)* खरोखरच देव किती पवित्र आहे हे आम्ही समजून घेतले पाहिजे. 


    परमेश्वराने ख्रिस्तामध्ये जो नवा करार केला आहे त्याप्रमाणे आपण स्वर्गीय स्थानाकडे आलो आहोत. आपण सियोन पर्वत म्हणजेच जिवंत देवाचे नगर, स्वर्गीय यरूशलेमेत आलो आहोत. तेथे लाखो देवदूत आहेत. ही नगरी देवाच्या खऱ्या मंडळीचे दर्शक आहे. प्रभूच्या मंडळीतील त्याचे सर्व लोक हे स्वर्गीय राज्याचे वारीस आहेत. देव खरा न्यायाधीश आहे आणि तो खऱ्या आणि स्वर्गीय ज्ञानाने सर्वांचा न्याय करील. ते सर्व प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे नीतिमान ठरविण्यांत आले आहेत. परमेश्वराने त्यांच्याबरोबर जो नवा करार केला आहे तो स्थिर आहे. कारण ह्या कराराचा मध्यस्थ स्वतः प्रभू येशू ख्रिस्तच आहे. त्याचे रक्त क्षमेसाठी ओतले गेले आहे. *नव्या कराराचा मध्यस्थ येशू, आणि शिंपडण्याचे रक्त ह्यांच्याजवळ आला आहात, त्या रक्ताचे बोलणे हाबेलाच्या रक्ताच्या बोलण्यापेक्षा उत्तम आहे. ( इब्री १२:२४)* हाबेलाचे रक्त हे *'न्याय कर'* अशी हाक मारते, तर ख्रिस्ताचे रक्त *'क्षमा कर '* अशी हाक मारते. 


    देवाने सिनाय पर्वतावरून इस्राएल लोकांना आज्ञा दिल्या होत्या. त्यांनी त्या मानल्या नाहीत त्यामुळे देवाचा क्रोध त्यांच्यावर पडला व अविश्वास आणि आज्ञाभंग ह्यामुळे हजारोंचा रानात नाश झाला. देवाने ख्रिस्ताला ह्या जगात पाठविले व तो त्याच्याद्वारे आमच्याबरोबर बोलत आहे. *तो ह्या काळाच्या शेवटी पुत्राच्या द्वारे आपल्याशी बोलला आहे, त्याने त्याला सर्व गोष्टींचा वारीस करून ठेविले आणि त्याच्याद्वारे त्याने विश्व निर्माण केले. ( इब्री १:२)* आणि पूढे असेही म्हटले आहे की, जे प्रभू येशू ख्रिस्ताचे ऐकणार नाहीत त्यांचा निभाव लागणार नाही. *कारण पृथ्वीवर आज्ञा सांगणाऱ्यांचा अवमान करणारे जर निभावले नाहीत, तर स्वर्गातून आज्ञा सांगणाऱ्यांपासून बहकल्यास आपण विशेषेकरून निभावणार नाही. ( इब्री १२:२५)*


    परमेश्वर इस्राएलाशी बोलला तेव्हा पर्वत थरथरले व देवाचे गौरव प्रगट झाले. आणि पृथ्वी किती अस्थिर किंवा हलणारी आहे हे त्यांना समजले. परमेश्वराचा क्रोध ह्या जगावर येईल तेव्हा आकाशातील ग्रह व तारे हेसुद्धा कंपायमान होतील. कारण सेनाधीश परमेश्वर म्हणतो, *आणखी एकदा लवकरच मी आकाश व पृथ्वी, समुद्र व कोरडी जमीन, ही हलवून सोडीन. ( हाग्गय २:६)* प्रियांनो आम्ही ख्रिस्ताच्या वाणीकडे लक्ष दिल्यामुळे कधीही न हलणाऱ्या, स्थिर अशा देवाच्या राज्यात आलो आहोत म्हणून देवाचे उपकार मानू या. देवाने आपल्याला सोपविलेली जबाबदारी म्हणजेच देवाची सेवा, त्याचे आदरयुक्त भय धरून त्याची सेवा करूया. जेणेकरून देवाला संतोष होईल अशाप्रकारे आमचे आचरण असावे..  *सदासर्वकाळ आमच्या विश्वासाचा उत्पादक व पूर्ण करणारा प्रभू येशू त्याच्याकडे सदैव पाहात राहू या.*

 

*देवाच्या दृष्टीने त्याला संतोष देणारे जीवन जगण्यास स्वतः प्रभू आम्हाला साहाय्य करील.*


      

Friday, 25 December 2020

ज्ञानी होऊ या


               

               *✨ज्ञानी होऊ या✨*

      

 *“यहूद्यांचा राजा जन्मास आला तो कोठे आहे? कारण आम्ही पूर्व दिशेस त्याचा तारा पाहून त्याला नमन करण्यास आलो आहोत.” (मत्तय २:२)*


                           *...मनन...*


           *!!..परमेश्वराची स्तुती असो..!!* 


    आपण या वचनातून थोडक्यात मागी /ज्ञानी लोकांनी यरुशलेमच्या लोकांना केलेला प्रश्न वाचतो. आपण कल्पना करू शकतो की या ज्ञानी लोकांनी/ज्योतिष्यांनी फक्त येशूला शोधण्यासाठी दुरच्या पूर्वेकडून मध्य पूर्वेकडे, मोठ्या किंमतीवर कितीतरी मैलांचा प्रवास पूर्ण केला असेल. हे ज्ञानी लोक सत्याच्या शोधात कोणत्याही परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी तयार होते. 


   येशूचा जन्म यरुशलेमपासून सहा मैलांच्या अंतरावर बेथलहेममध्ये झाला होता. सर्व प्रकारचे आध्यात्मिक उपक्रम यरुशलेममध्ये घडले. संपूर्ण जगाचे सर्व प्रमुख आणि मुख्य नेते यरुशलेममध्ये असत, परंतु त्यांच्यातील कोणीही येशूला शोधण्याचा प्रयत्न केला नाही, करीत नाही. केवळ बाहेरील लोक-ज्ञानी लोकांनी जे दुसर्‍या संस्कृतीचे होते, ते येशूचा शोध घेत होते.


    बेथलेहेममधील व्यापारी नेत्यांनाही ते समजले नाही.आणि आपण जरी त्याला शोधले नाही किंवा तो आपल्याला सापडला नाही तर आपणही त्याला समजू शकणार नाही. प्रभू येशू म्हणतो सत्य तुम्हांस समजेल व सत्य तुम्हांस बंधमुक्त करील. पण ते ज्ञानी, ज्योतिषी येशूचा शोध घेत होते. सत्याचा शोध घेत होते. ते देवाला शोधण्यासाठी खूप उत्सुक होते. त्याला मिळविण्यासाठी ते कोणत्याही प्रमाणात जाण्यास तयार होते. म्हणजेच, आपणही तेच केले पाहिजे. देवाला शोधण्यासाठी आपण आपल्या वाटेच्या मध्यभागी काहीही अडखळण असले तरी ते पार केले पाहिजे.


    येशू म्हणाला की स्वर्गातील राज्य त्या मोत्यासारखे आहे, ज्याकडे जाण्यासाठी आपण सर्व काही विकायला तयार आहोत. येशूच्या जन्माविषयी भूतकाळाच्या त्या ज्ञानी लोकांना/ज्योतिष्यांना हे अगदी चांगले समजले असावे असेच यातून दिसते.


    हे ज्ञानी लोक प्रभू येशूला शोधण्यासाठी, त्याची उपासना करण्यासाठी सर्वकाही सोडून त्याग करण्यास तयार होते. आपल्या घराच्या सर्व सुखसोयींचा त्याग करुन त्यांचा तो वेळ दीर्घ आणि कठीण प्रवासात गेला कारण त्यांचा एक चांगला आणि खरा हेतू होता आणि तो म्हणजे येशूला शोधायचा. कारण त्यांना त्याची उपासना करायची होती.


    ज्ञानी (मागी) लोक माझ्यासाठी ख्रिसमसच्या कथेतील ही सर्वात आकर्षक व्यक्तिरेखा आहेत. आम्हाला त्यांच्याबद्दल फारसे माहिती नाही. ते कोण आहेत आणि कोठून आले हे आम्हाला ठाऊक नाही. पवित्र शास्त्र त्यांना "मागी/ज्ञानी" म्हणते. मागी/ ज्ञानी हे तत्वज्ञ, वैज्ञानिक आणि खगोलशास्त्रज्ञ यांचे मिश्रित रूप होते. ते खूप सुशिक्षित होते. परंतु आपण त्यांच्याबद्दल एवढेच जाणत आहोत. पण आपल्याला माहिती आहे की ते ज्ञानी होते. उलट, ख्रिसमसच्या कथेत त्याने प्रदर्शित केलेल्या बुद्धिमत्तेवरून आपण बरेच काही शिकू शकतो.

ज्ञानी पुरुषांकडून शिकण्यासारख्या इतर धड्यांपैकी आपण सत्य शोधणे देखील शिकतो. त्यांना देवाबद्दलचे सत्य, स्वतःबद्दलचे भूतकाळ आणि त्याचे भविष्य जाणून घ्यायचे होते. ज्ञानी लोकांनी विचारले, *"यहूद्यांचा राजा होण्यासाठी जन्मलेला बाळ कोठे आहे?" (मत्तय २:२)* ज्ञानी लोक येशूचा शोध घेत होते. आजही काही सुज्ञ पुरुष आणि स्त्रिया सत्याचा शोध घेत आहेत. जेव्हा सत्याची कल्पना येते तेव्हा जीवनात दोन प्रकारचे लोक असतात; कल्पित आणि साधक.  ते फक्त सत्यांबद्दल अनुमान लावतात. देव कसा आहे, कल्पित लोक विचार करतात की त्यांना हे माहित आहे. देवाविषयी बोलणे आणि वाद घालणे ते पसंत करतात, परंतु ते फक्त अनुमान लावतात. कारण त्यांना खरोखर सत्य जाणून घ्यायचे नसते. त्यांना फक्त त्याच्याबद्दल बोलायचे आहे. असे लोक कधीच प्रभू येशू ख्रिस्ताला प्राप्त करु शकत नाहीत. 


    दुसरीकडे, जे सत्याच्या शोधात असतात त्यांना ते सापडते. त्यांचेयावर देव प्रेम करतो. अन्वेषक चार गोष्टी करतात: ते प्रश्न विचारतात, ते अभ्यास करतात, ते सत्याचा शोध घेतात, ते आपल्या आजूबाजूला काय घडत आहे याची काळजी घेतात.


    जे लोक शोधतात त्यांना तो सापडतो. पवित्र शास्त्र म्हणते, *"पण तेथून जरी तुम्ही आपला देव परमेश्वर ह्याला शरण गेलात आणि पूर्ण जिवेभावे त्याच्या शोधाला लागलात तर तो तुम्हांला पावेल." (अनुवाद ४:२९)* आपण खरोखर गांभीर्याने सत्याचा शोध घेत असाल तर आपण अपयशी होऊ शकणार नाही.


   प्रियांनो, जसे ज्ञानी लोकांनी सर्व परिस्थितीला सामोरे जाऊन येशूला शोधले.. आपणही आपल्या राजाला, आपल्या प्रभूला, आपल्या तारकाला मनापासून शोधूया आणि त्याला आपल्या जीवनात, आपल्या हृदयात स्थान देऊ या!!


     *!!.

Thursday, 24 December 2020

ख्रिसमस, ख्रिस्तजन्मदिन का खिस्तजयंती?

 *ख्रिसमस, ख्रिस्तजन्मदिन का खिस्तजयंती?*




ह्या वर्षी दोघांनी मला ह्या विषयावर प्रश्‍न विचारले. एक बंधू म्हणाले की, ‘‘ख्रिस्तजयंती या शब्दावर दरवर्षी वाद निर्माण होतात. कारण प्रचलित अर्थानुसार जयंती ही फक्त मृत व्यक्तीच्या संदर्भात वापरतात. टिळकांनी हा शब्द वापरून चूक केली का?’’ दुसर्‍या एका बहिणीने विचारले, ‘‘ख्रिस्तजन्मदिन का ख्रिस्तजयंती कोणता शब्द बरोबर आहे?’’ तेव्हा येशू ख्रिस्ताच्या जन्मानिमित्त आपण जो उत्सव साजरा करतो त्यासाठी नेमक्या कोणत्या शब्दाचा वापर करावा याविषयी मी माझे वैयक्तिक मत मांडतो. प्रथम आपण जयंती शब्दाचा शब्दकोशातील अर्थ पाहू :


*जयंती*


‘अवतारी पुरुषाच्या जन्मदिवसाचा समारंभ’ - मराठी शब्दरत्नाकर

‘देव किंवा साधुसंत यांच्या जन्मतिथीचा उत्सव’ - मराठी व्युत्पत्ती कोश

‘देवाची, पुण्यपुरुषाची अथवा थोर पुरुषाची जन्मतिथी; त्या दिवसाचा उत्सव; वाढदिवस’ - अभिनव मराठी-मराठी शब्दकोश.


आता २५ डिसेंबर ही येशूची जयंती आहे काय ते आपण पाहू :


सर्वप्रथम आपण हे लक्षात घेऊ या की, २५ डिसेंबर ही येशूची जन्मतारीख नाही. येशूचा जन्म कधी झाला याविषयी कोणालाच निश्‍चित ठाऊक नाही. त्यामुळे २५ डिसेंबरला ‘ख्रिस्तजन्मदिन’ म्हणता येत नाही. ती लबाडी होईल आणि कोणत्याही असत्यावर ख्रिस्ती सत्याची उभारणी करता येत नाही.


दुसरी गोष्ट, २५ डिसेंबरला ‘ख्रिस्तजयंतीही’ म्हणता येणार नाही. कारण येशू हा आदी आणि अंत आहे. तो सर्वगुणसंपन्न परमेश्‍वर आहे. त्यामुळे जन्ममरण ह्या मानवी कल्पना त्याला लागू होत नाही. त्याची जयंतीही पाळता येत नाही. जयंती पाळली तर पुण्यतिथीही पाळावी लागेल. त्यामुळे २५ डिसेंबरला त्याची जयंती म्हणणे ही मानवी कल्पना आहे. लोकांनी अनंतकालिक देवाला मानवनिर्मित कल्पनेच्या चौकटीत बसवलेले आहे.


तिसरी गोष्ट, २५ डिसेंबरला ‘ख्रिसमस’ म्हणणेही बरोबर नाही. ख्रिसमस हा शब्द ख्राईस्ट + मास अशा दोन शब्दांपासून तयार झाला आहे. ख्रिस्त म्हणजे अभिषिक्त. हा ग्रीक शब्द आहे जो मूळ हिब्रू शब्द मशीहापासून आलेला आहे. आणि मास शब्दाचा अर्थ आहे रोमन कॅथलिकांचा ख्रिस्ताच्या मरणाच्या स्मरणार्थ केला जाणारा प्रभुभोजनाचा विधी. म्हणून ख्रिसमस म्हणजे ख्रिस्ताच्या जन्माच्या स्मरणार्थ केलेले प्रभुभोजन असा त्याचा अर्थ आहे, त्यात येशूच्या जन्माचा काही उल्लेख येत नाही. उलट मरणाच्या स्मरणार्थ विधी केला जातो.


*ख्रिस्तजन्मोत्सव हाच योग्य शब्द*


आपण पाहिले की २५ डिसेंबर येशूच्या जन्माची तारीख नाही, तरी त्या तारखेला आपण येशूच्या जन्माची आठवण करून उत्सव साजरा करतो. त्यामुळे त्याला ‘ख्रिस्तजन्मोत्सव’ म्हणणेच योग्य ठरेल असे मला वाटते. इतर शब्दांमुळे जे प्रश्‍न उपस्थित केले जातात ते या शब्दाने होत नाहीत.


पण जर खरी तारीख तुम्हांला ठाऊक नाही तर कशाला ख्रिस्तजन्मोत्सव साजरा करता? बायबलमध्ये तसे काही सांगितलेले नाही. खरे तर तुम्ही रोमी लोकांचा सण साजरा करता असे काही जण आक्षेप घेतात.


आता २५ डिसेंबर ही येशूच्या जन्माची तारीख नाही हे आपणांस मान्य आहे. तसेच ऐतिहासिक दृष्ट्या ती रोमी लोकांच्या एका सणाची तारीख होती हेही खरे आहे. पण येशू जन्मला हे सत्य पवित्र शास्त्रात दिले आहे. ते नाकारता येत नाही. तो आमच्यासाठी जन्मला ह्याचा आम्हाला आनंद वाटतो आणि त्यासाठी आम्हांला एखादा दिवस नेमून त्याच्या जन्माचा उत्सव साजरा करायचा असेल तर काय हरकत आहे?


संत पौल रोमकरांस पत्रात म्हणतो की, ‘‘कोणी माणूस एखादा दिवस दुसर्‍या दिवसापेक्षा अधिक मानतो. दुसरा कोणी सर्व दिवस सारखे मानतो. तर प्रत्येकाने आपल्या मनाची पूर्ण खातरी करून घ्यावी. जो दिवस पाळतो, तो प्रभूकरता पाळतो, आणि जो पाळीत नाही तो प्रभूकरता पाळत नाही; आणि जो खातो तो प्रभूकरता खातो, कारण तो देवाचे आभार मानतो; जो खात नाही, तो प्रभूकरता खात नाही, आणि तोही देवाचे आभार मानतो. कारण आपल्यातील कोणी स्वतःकरता जगत नाही आणि कोणी स्वतःकरता मरत नाही’’ (रोम.१४ः५-७). तेव्हा आपणांस रोमी लोकांच्या सणाच्याच दिवशी जर ख्रिस्ताच्या जन्माची आठवण करायची असेल, तर त्याला कोणी हरकत घेता कामा नये. मात्र आपण तो दिवस ‘प्रभूकरता’ पाळावा. त्याच्या वचनाच्या विरुद्ध इतर कोणत्याही विपरीत गोष्टी करून आपण त्याला खिन्न करू नये. त्या दिवशी आपण त्याची भक्ती करावी. तो दिवस त्याच्या जन्माविषयी व तत्संबंधी घडलेल्या गोष्टी बोलण्यात घालवावा. त्याच्या जन्माविषयी ख्रिस्तीतरांना सुवार्ता सांगावी. आणि त्याच्या जन्माचा उत्सव पाळत असताना मंडळीतील व मंडळीबाहेरील गोरगरिबांचीही आठवण ठेवावी. 


ह्या बंधुभगिनींच्या प्रश्‍नांची उत्तरे दिल्यावर त्या बंधूने दुसरा प्रश्‍न विचारला, ‘‘अवतार व देहधारण यात फरक काय?’’ चला तर, तेही आपण पाहू :


*अवतार*


उपासना संगीतात एका गाण्यात ‘देवाचा अवतार पाहिला देवाचा अवतार’ असे कवी म्हणतो. पण येशू हा देवाचा अवतार नव्हता. पवित्र शास्त्रात कुठेच ‘अवतार’ हा शब्द वापरला नाही, तर येशूने ‘देहधारण’ केले असे म्हटले आहे. ‘‘शब्द देही झाला व त्याने आमच्यामध्ये वस्ती केली, आणि आम्ही त्याचे गौरव पाहिले. ते पित्यापासून आलेल्या एकुलत्या एकाचे गौरव असावे असे अनुग्रह व सत्य ह्यांनी परिपूर्ण होते.’’

येशूच्या देहधारणाची ही कल्पना अवतारापेक्षा अनेक बाबतीत भिन्न आहे :


१. ख्रिस्तीतरांत अवतार म्हणजे अनेक देवदेवतांनी वेळोवेळी घेतलेले मानवी किंवा पशुपक्ष्यांचे जन्म आहेत. पण आदी व अंत असणाऱ्या येशूने एकदाच देहधारण केलेले आहे.


२. ख्रिस्तीतरांत दुष्टांचा व दुष्ट प्रवृत्तींचा संहार करून धर्माची पुनःस्थापना करण्यासाठी अवतार घेतले जातात. पण येशूने जे देहधारण केले ते दुष्टांचा संहार करण्यासाठी नाही, तर दुष्टांवर प्रीती करण्यासाठी केले. तो म्हणतो, ‘‘मी तर त्यांना जीवनप्राप्ती व्हावी व ती विपुलपणे व्हावी म्हणून आलो आहे’’ (योहान.१०ः१०). तसेच त्याने ठरावीक देशातील, किंवा ठरावीक लोकांसाठी हे देहधारण केले नाही तर हे सर्व मानवजातीसाठी केले. योहान म्हणतो, ‘‘दुसर्‍या दिवशी येशूला आपणाकडे येताना पाहून तो (योहान) म्हणाला, हा पाहा, जगाचे पाप हरण करणारा देवाचा कोकरा!’’ (योहान.१ः२९). त्याला सर्व मानवजातीच्या पापांचा दंड चुकता करायचा होता. त्यांच्या पापासाठी त्याला प्रायश्‍चित्त घ्यायचे होते. त्यासाठी जे निर्दोष व निष्कलंक रक्त हवे होते ते त्याने दिले व सर्व मानवजातीसाठी मुक्तीचा मार्ग मोकळा केला.


३. ख्रिस्तीतरांत अवतार हे स्त्रीपुरुषांच्या किंवा देवदेवता व स्त्रिया यांच्या लैंगिक संबंधातून निर्माण झाले. पण येशूने केलेले देहधारण हे लैंगिक संबंधातून झालेले नाही. त्याची आई मरीया ही कुमारी असताना देवाच्या आत्म्याच्या सामर्थ्याने गरोदर राहिली. हे यासाठी झाले की, येशू जे प्रायश्‍चित्ताचे रक्त मानवजातीच्या पापासाठी वधस्तंभावर सांडणार होता, ते निर्दोष व निष्कलंक असायला हवे होते. येशू स्त्रीपुरुषाच्या संबंधातून जन्मला असता, तर आद्य मातापिता आदाम व हव्वा यांचा पापी स्वभाव घेऊन जन्मला असता व प्रायश्‍चित्तासाठी पापी स्वभावाच्या पुरुषाचे पापी रक्त देवाने मान्य केले नसते. तेव्हा देवानेच त्याला कुमारीपासून जन्माला घालण्याची योजना आखली व ती पूर्णत्वास नेली.


४. इतर अवतार आधी मानव होते. पण त्यांच्या चमत्कारी कृत्यांमुळे त्यांना देव मानले गेले. तरी ते देवासारखे परिपूर्ण, सर्वगुणसंपन्न नव्हते. त्यांच्या हातून चुका होत होत्या. एवढेच नव्हे तर ते दैहिक वृत्तीने वागत, खोटे बोलत, चोरी करीत, लैंगिक पापे करीत. पण त्यांच्या अनुयायांनी त्यांच्या पापांचेही उदात्तीकरण केले. तसे येशूचे नव्हते. येशू हा परिपूर्ण देव होता व परिपूर्ण मानव होता. त्याच्या हातून एकही पाप झाले नाही. तो म्हणतो, ‘‘तुमच्यापैकी कोण मला पापी ठरवतो’’ (योहान.८ः४६).


५. सर्व अवतारांचा शेवट मृत्यूत झाला. ते मरणातून परत जिवंत झाले नाहीत. पण येशू मानवजातीच्या पातकांसाठी वधस्तंभावर जरी मृत्यू पावला, तरी तो तिसर्‍या दिवशी मृत्यूवर विजय मिळवून पुन्हा जिवंत झाला. एवढेच नाही तर पृथ्वीवर ४० दिवस राहून तो सर्वांदेखत सदेह स्वर्गात गेला.


६. ख्रिस्तीतरांत येथून पुढे अवतार येतच राहतील. पण येशूचे देहधारण एकदाच झाले आहे. ते पुनःपुन्हा होणार नाही. आता येशू आपल्याला घ्यायला येईल, तेव्हा तो पुनरुत्थित झालेल्या गौरवी शरीराने येणार आहे.

हा ख्रिस्ती विश्वास आहे. ही ख्रिस्ती आशा आहे की, जसा तो पुनरुत्थित झाला तसे त्याच्यावर विश्‍वास ठेवून त्याला आपला तारणारा म्हणून स्वीकरणारेही पुनरुत्थित होतील व देवासह सदासर्वकाळ जिवंत राहतील!


तेव्हा वाचकांनो, आपले मेल्यानंतर काय होईल ह्याची आपणांस खातरी नसेल, तर येशूवर विश्‍वास ठेवा. त्याला आपला तारणारा व प्रभू म्हणून स्वीकारा. तो तुम्हांला हमखास नरकापासून वाचवून स्वर्गातील अनंतकालिक जीवनात नेईल. कारण दुसऱ्या कोणत्याही अवताराने तुमचा उद्धार व्हावा म्हणून स्वतःचे बलिदान केलेले नाही... आणि पापांत राहणारे कोणीही, मग ते अवतार का असेनात, पापी लोकांचा उद्धार करू शकत नाही. 


●●●

Tuesday, 22 December 2020

परमेश्वराची स्तुती करा



           *✨परमेश्वराची स्तुती करा✨*


*हे परमेश्वरा, माझ्या दुर्गा, माझ्या उद्धारका, माझ्या तोंडचे शब्द व माझ्या मनचे विचार तुला मान्य असोत..✍*

                  *( स्तोत्र १९:१४)*


                           *...मनन...*


          *!!..परमेश्वराची स्तुती असो..!!*


   होय प्रियांनो, परमेश्वराचीच स्तुती करा. परमेश्वराचीच प्रशंसा करा. आम्ही आमच्या ओठांनी कुणाची स्तुती करतो ? कुणाची प्रशंसा करतो? आज जगामध्ये आपण पाहातो की, लोक आपले काम एखाद्या व्यक्तीकडून करून घेण्यासाठी त्याची खोटी स्तुती, खोटी प्रशंसा करतात. ह्या जगात सात्विक, सरळमार्गी, विश्वासू लोक फारच कमी उरले आहेत. आणि लोक प्रशंसा करण्यापेक्षा खुशामद करण्यात गुंतले आहे. प्रशंसा म्हणजे दूसऱ्याने केलेली एखादी चांगली गोष्ट किंवा एखाद्याचे सद्गुण ह्यामुळे सहजपणे स्तुतीचे शब्द अंतःकरणापासून ओठांतून बाहेर पडतात. परंतु खुशामद करण्यामागे आपला स्वार्थ साधण्याचाच हेतू असतो, आणि त्यासाठीच दूसऱ्याची मेहेरबानी व्हावी हा प्रयत्न असतो. स्तुती प्रशंसा एखाद्याला उत्तेजन देण्यासाठी असते तर खुशामद दूसऱ्याचे मन वळवून स्वार्थ साधून घेण्यासाठी असते. स्तोत्रकर्ता म्हणतो, *ते एकमेकांशी असत्य भाषण करितात, ते दूजाभाव ठेवून खुशामदीचे शब्द बोलतात. ते म्हणतात, आमचे ओठ आमचेच आहेत, आमचा धनी कोण ?( स्तोत्र १२:२,४)* 


   आम्ही आमचा स्वार्थ साधण्यासाठी कुणाला तरी खुशामदीचे शब्द बोलायला आम्हाला मोह झाला तर आम्ही हा विचार करायला पाहिजे की, आमचे हे ओठ प्रभूने आम्हाला त्याची स्तुती करण्यासाठी दिले आहेत. माझे ओठ जर प्रभूचे असतील तर माझ्या प्रत्येक शब्दांतून त्याचेच प्रतिबिंब दिसून येईल. त्याचीच वचने माझ्या ओठांवर येतील. आणि देवाची वचने शुद्ध, पवित्र आहेत. दाविद म्हणतो, *परमेश्वराची वचने शुद्ध वचने आहेत, भट्टीत सात वेळा शुद्ध करून, जमिनीवरील मूशीत ओतलेल्या रूप्यासारखी ती आहेत. ( स्तोत्र १२:६)* आम्ही परमेश्वराची स्तुती करावी म्हणून स्तोत्रकर्ता  म्हणतो, *परमेश्वराची परमश्रेष्ठ स्तुती त्यांच्या कंठी असो, दुधारी तरवार त्यांच्या हाती असो. ( स्तोत्र १४९:६)* म्हणजेच देवाची स्तुती आम्ही अखंड केली पाहिजे आणि त्याच्या वचनाची तरवार आम्ही हाती घेतली पाहिजे. कारण *देवाचे वचन सजीव, सक्रिय, कोणत्याही दुधारी तरवारीपेक्षा तीक्ष्ण असून, जीव व आत्मा, सांधे व मज्जा ह्यांना भेदून आरपार जाणारे आणि मनातील विचार व हेतु ह्यांचे परिक्षक असे आहे. ( इब्री ४:१२)* म्हणून दाविद म्हणतो की, माझ्या तोंडचे शब्द व माझ्या मनचे विचार तुला मान्य असोत. 


      परमेश्वराची प्रशंसा करण्यासाठी शलमोन राजा म्हणतो, *त्याची वाणी परममधूर आहे, तो सर्वस्वी मनोहर आहे. ( गीतरत्न ५:१६)* आम्ही आमच्या वाणीने केवळ आमच्या प्रभूचीच प्रशंसा केली पाहिजे. यशयाला परमेश्वराने पाचारण केले तेव्हा तो म्हणतो की मी अशुद्ध ओठांचा आहे, परंतु आपण पाहातो परमेश्वराने त्याला शुद्ध आणि पवित्र करून त्याच्या सेवेसाठी निवडले. आणि पूढे तोच मी अशुद्ध ओठांचा आहे, असे म्हणणारा यशया म्हणत आहे की, *शिणलेल्यांस बोलून धीर कसा द्यावा ते समजावे म्हणून प्रभू परमेश्वराने मला सुशिक्षितांची जिव्हा दिली आहे. ( यशया ५०:४)* परमेश्वर आम्हाला परिपूर्ण करण्यास समर्थ आहे. याकोब आपल्या पत्रामध्ये म्हणत आहे की, *आपण सगळेच पुष्कळ चुका करितो. कोणी जर बोलण्यात चुकत नाही तर तो मनुष्य पूर्ण होय. तो सर्व शरीरही कह्यांत ठेवण्यास समर्थ आहे. ( याकोब ३:२)*


    म्हणून प्रियांनो आम्ही बोलण्यात चुकू नये म्हणून सांभाळा. आम्ही कळतनकळत वाईट लोकांची किंवा वाईट गोष्टींची तर प्रशंसा करत नाही आहोत ना ? हे तपासून पाहू या. आणि आमच्या मुखाने आम्ही केवळ देवाचीच स्तुती, स्तवन, प्रशंसा करू या. देवाचाच जयजयकार करू या. त्याचेच नाव उंच करू या.


*जो आपले तोंड सांभाळितो तो आपला जीव राखितो. ( नीति १३:३)*