*✨परमेश्वराची स्तुती करा✨*
*हे परमेश्वरा, माझ्या दुर्गा, माझ्या उद्धारका, माझ्या तोंडचे शब्द व माझ्या मनचे विचार तुला मान्य असोत..✍*
*( स्तोत्र १९:१४)*
*...मनन...*
*!!..परमेश्वराची स्तुती असो..!!*
होय प्रियांनो, परमेश्वराचीच स्तुती करा. परमेश्वराचीच प्रशंसा करा. आम्ही आमच्या ओठांनी कुणाची स्तुती करतो ? कुणाची प्रशंसा करतो? आज जगामध्ये आपण पाहातो की, लोक आपले काम एखाद्या व्यक्तीकडून करून घेण्यासाठी त्याची खोटी स्तुती, खोटी प्रशंसा करतात. ह्या जगात सात्विक, सरळमार्गी, विश्वासू लोक फारच कमी उरले आहेत. आणि लोक प्रशंसा करण्यापेक्षा खुशामद करण्यात गुंतले आहे. प्रशंसा म्हणजे दूसऱ्याने केलेली एखादी चांगली गोष्ट किंवा एखाद्याचे सद्गुण ह्यामुळे सहजपणे स्तुतीचे शब्द अंतःकरणापासून ओठांतून बाहेर पडतात. परंतु खुशामद करण्यामागे आपला स्वार्थ साधण्याचाच हेतू असतो, आणि त्यासाठीच दूसऱ्याची मेहेरबानी व्हावी हा प्रयत्न असतो. स्तुती प्रशंसा एखाद्याला उत्तेजन देण्यासाठी असते तर खुशामद दूसऱ्याचे मन वळवून स्वार्थ साधून घेण्यासाठी असते. स्तोत्रकर्ता म्हणतो, *ते एकमेकांशी असत्य भाषण करितात, ते दूजाभाव ठेवून खुशामदीचे शब्द बोलतात. ते म्हणतात, आमचे ओठ आमचेच आहेत, आमचा धनी कोण ?( स्तोत्र १२:२,४)*
आम्ही आमचा स्वार्थ साधण्यासाठी कुणाला तरी खुशामदीचे शब्द बोलायला आम्हाला मोह झाला तर आम्ही हा विचार करायला पाहिजे की, आमचे हे ओठ प्रभूने आम्हाला त्याची स्तुती करण्यासाठी दिले आहेत. माझे ओठ जर प्रभूचे असतील तर माझ्या प्रत्येक शब्दांतून त्याचेच प्रतिबिंब दिसून येईल. त्याचीच वचने माझ्या ओठांवर येतील. आणि देवाची वचने शुद्ध, पवित्र आहेत. दाविद म्हणतो, *परमेश्वराची वचने शुद्ध वचने आहेत, भट्टीत सात वेळा शुद्ध करून, जमिनीवरील मूशीत ओतलेल्या रूप्यासारखी ती आहेत. ( स्तोत्र १२:६)* आम्ही परमेश्वराची स्तुती करावी म्हणून स्तोत्रकर्ता म्हणतो, *परमेश्वराची परमश्रेष्ठ स्तुती त्यांच्या कंठी असो, दुधारी तरवार त्यांच्या हाती असो. ( स्तोत्र १४९:६)* म्हणजेच देवाची स्तुती आम्ही अखंड केली पाहिजे आणि त्याच्या वचनाची तरवार आम्ही हाती घेतली पाहिजे. कारण *देवाचे वचन सजीव, सक्रिय, कोणत्याही दुधारी तरवारीपेक्षा तीक्ष्ण असून, जीव व आत्मा, सांधे व मज्जा ह्यांना भेदून आरपार जाणारे आणि मनातील विचार व हेतु ह्यांचे परिक्षक असे आहे. ( इब्री ४:१२)* म्हणून दाविद म्हणतो की, माझ्या तोंडचे शब्द व माझ्या मनचे विचार तुला मान्य असोत.
परमेश्वराची प्रशंसा करण्यासाठी शलमोन राजा म्हणतो, *त्याची वाणी परममधूर आहे, तो सर्वस्वी मनोहर आहे. ( गीतरत्न ५:१६)* आम्ही आमच्या वाणीने केवळ आमच्या प्रभूचीच प्रशंसा केली पाहिजे. यशयाला परमेश्वराने पाचारण केले तेव्हा तो म्हणतो की मी अशुद्ध ओठांचा आहे, परंतु आपण पाहातो परमेश्वराने त्याला शुद्ध आणि पवित्र करून त्याच्या सेवेसाठी निवडले. आणि पूढे तोच मी अशुद्ध ओठांचा आहे, असे म्हणणारा यशया म्हणत आहे की, *शिणलेल्यांस बोलून धीर कसा द्यावा ते समजावे म्हणून प्रभू परमेश्वराने मला सुशिक्षितांची जिव्हा दिली आहे. ( यशया ५०:४)* परमेश्वर आम्हाला परिपूर्ण करण्यास समर्थ आहे. याकोब आपल्या पत्रामध्ये म्हणत आहे की, *आपण सगळेच पुष्कळ चुका करितो. कोणी जर बोलण्यात चुकत नाही तर तो मनुष्य पूर्ण होय. तो सर्व शरीरही कह्यांत ठेवण्यास समर्थ आहे. ( याकोब ३:२)*
म्हणून प्रियांनो आम्ही बोलण्यात चुकू नये म्हणून सांभाळा. आम्ही कळतनकळत वाईट लोकांची किंवा वाईट गोष्टींची तर प्रशंसा करत नाही आहोत ना ? हे तपासून पाहू या. आणि आमच्या मुखाने आम्ही केवळ देवाचीच स्तुती, स्तवन, प्रशंसा करू या. देवाचाच जयजयकार करू या. त्याचेच नाव उंच करू या.
*जो आपले तोंड सांभाळितो तो आपला जीव राखितो. ( नीति १३:३)*
No comments:
Post a Comment