*✨सावध राहण्याचा इशारा✨*
*ह्यावरून आपण इतरांसारखी झोप घेऊ नये, तर जागे व सावध राहावे..✍🏼*
*( १ थेस्सल ५:६ )*
*...मनन...*
*!!..परमेश्वराची स्तुती असो..!!*
सावधगिरीचा इशारा देताना प्रभू येशू ख्रिस्ताने जे सांगितले होते तेच प्रेषित पौल येथे सांगत आहे. परंतु येथे त्याला एका विशिष्ट मुद्द्यावर भर द्यायचा आहे. तो म्हणजे प्रभूचा दिवस. प्रभूचा दिवस याचा संबंध न्यायाकडे आहे. या भयंकर घटनेसंबंधीचा हा इशारा विश्वास न ठेवणाऱ्यांसाठी आहे, विश्वास ठेवणाऱ्यांसाठी नाही. या दिवसाचा संबंध प्रकाशाचा उदय होण्याकडेही आहे. प्रकाश हे दिव्य प्रकटीकरणाचे व नीतिमत्वाचे प्रतीक आहे. विश्वासणारे तर आधीचेच प्रकाशात म्हणजे ख्रिस्ताच्या सान्निध्यात राहणारे लोक आहेत. ख्रिस्तावरील त्यांच्या विश्वासाच्या द्वारे ते आता पापाच्या आणि अज्ञानाच्या अंधारात नाहीत. कारण ख्रिस्ताचा प्रकाश त्यांच्यामध्ये, त्यांच्याबरोबर आहे. परिणामी त्यांच्यासाठी प्रभूचा दिवस हा प्रखर शोधक प्रकाश झोतासारखा असणार नाही. परंतु दुर्जनांची किंवा पापी जनांची या शोधक प्रकाशझोतामध्ये अंधाराच्या काळोख्या आवरणाखाली लोकांच्या नजरेआड केलेली पापे उघडकीस येतील. आणि पापी जनांना, दुष्कर्मे करणाऱ्यांना या प्रकाशापासून दूर जाऊन लपून बसावे वाटेल. याउलट जे नीतिमान आहेत असे म्हणजेच विश्वासणारे त्या दिवसाच्या परिपूर्ण प्रकाशाचे स्वागत करतील. त्यांना त्या दिवसाची भिती वाटणार नाही. कारण ज्यामुळे न्यायनिवाडा होईल अशाप्रकारची दोषपात्र कृत्ये त्यांनी केलेली नसणार. त्यांच्याविषयी पौल म्हणतो, *"बंधूजनहो, त्या दिवसाने चोरासारखे तुम्हाला गाठावे असे तुम्ही अंधारात नाही. कारण तुम्ही सगळे प्रकाशाची प्रजा व दिवसाची प्रजा आहात; आपण रात्रीचे व अंधाराचे नाही." ( वचन ४,५)*
त्यामुळेच पौल आम्हाला अंधकाराची कामे टाकून देऊन प्रकाशाची प्रजा होण्यास सांगत आहे. हा प्रकाश तर आमचा प्रभू येशू ख्रिस्त आहे. देवाच्या न्याय्य क्रोधाच्या, न्यायाच्या आणि शिक्षा देण्याच्या दिवसापासून आपली सूटका व्हावी म्हणून पौल आम्हाला आध्यात्मिकरित्या तयार राहायला सांगत आहे. प्रियांनो, देवाच्या क्रोधापासून आपली सूटका व्हावी असे वाटत असेल तर आपण आध्यात्मिकरित्या जागे आणि नैतिकदृष्ट्या सावध राहिले पाहिजे. आमचा प्रभू येशू ख्रिस्त परत येईपर्यंत त्याच्यावरील आमची निष्ठा कायम ठेवून आपण विश्वासात, प्रीतीत आणि पूर्ण तारणाच्या आशेमध्ये टिकून राहिले पाहिजे. पौल म्हणतो, *"परंतु जे आपण दिवसाचे आहोत त्या आपण सावध असावे, विश्वास व प्रीति हे उरस्राण व तारणाची आशा हे शिरस्राण घालावे." ( वचन ८)* त्यासाठी विश्वासणाऱ्यांना प्रभूशी अविश्वासू होण्यास आणि त्याच्या पुनरागमनसमयी बेसावध राहण्यास भाग पाडणारी जगीक सुखे, मोह, चिंता किंवा आत्मिक गोष्टींपासून लक्ष विचलीत करणाऱ्या गोष्टींमध्ये अडकून पडू नये म्हणून आध्यात्मिकरित्या आपण सावध किंवा जागे राहणे अत्यंत आवश्यक आहे. प्रभू म्हणत आहे, *"तुम्ही तर होणाऱ्या या सर्व गोष्टी चुकवण्यास व मनुष्याच्या पुत्रासमोर उभे राहण्यास समर्थ व्हावे म्हणून सर्व प्रसंगी प्रार्थना करत जागृत राहा." ( लूक २१:३६)* म्हणून प्रियांनो, सांभाळा, जगातील इतर लोकांबरोबर आमचा न्याय होऊ नये, आमचा नाश होऊ नये म्हणून आम्ही सदैव सावध आणि जागे राहून आमच्या प्रभूच्या येण्याची उत्कंठतेने वाट पाहावी. आम्ही अंधारात नाही तर प्रकाशाची प्रजा असल्यामुळे प्रकाशात राहावे. प्रकाशात राहण्यासाठी आम्हाला स्वतःला शुद्ध व पवित्र, निष्कलंक, निर्दोष राहाणे गरजेचे आहे. तरच आम्ही देवाचे लोक होऊ शकतो, तरच प्रकाशाची प्रजा होण्यास आम्ही पात्र आहोत. *कारण आपल्यावर क्रोध व्हावा म्हणून नव्हे, तर आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्या द्वारे आपले तारण व्हावे म्हणून देवाने आपल्याला नेमले आहे. ( वचन ९)*
*
No comments:
Post a Comment