Thursday, 17 December 2020

ख्रिस्ताच्या आनंदाने भरलेले असा



  *✨ख्रिस्ताच्या आनंदाने भरलेले असा✨*


*प्रभूमध्ये सर्वदा आनंद करा, पुन्हा म्हणेन, आनंद करा..✍🏼*

                   *( फिलिप्पै ४:४)*


                           *...मनन...*


          *!!..परमेश्वराची स्तुती असो..!!*


    ख्रिस्त कोण आहे हे जाणून घेऊन आपण त्याच्या ठायी आहोत हे लक्षात घेऊन आनंदी असा. कारण ख्रिस्ताच्या ठायीच आनंद आहे. आणि हा आनंद आपल्या सभोवतालच्या परिस्थितीमुळे मिळत नाही तर तो आपल्या अंतःकरणात भरलेला असतो. फिलिप्पै येथील मंडळीबद्दल पौल खूप समाधानी आहे. कारण त्यांनी त्यांच्या वर्तणूकीने आणि देवावर दाखवीत असलेल्या विश्वासामुळे पौलाला मोठा आनंद दिला आहे आणि म्हणून पौलाची त्यांच्यावर प्रीती आहे. पौल त्यांना ते त्याचा आनंद आणि मुकूट आहेत असे म्हणत आहे. तो म्हणतो, *तुमच्या विश्वासाचा यज्ञ व सेवा होतांना जरी मी स्वतः अर्पिला जात आहे तरी मी त्याबद्दल आनंद करितो, आणि त्याचाच तुम्हीही आनंद माना व माझ्याबरोबर आनंद करा. ( फिलिप्पै २:१७,१८)* पौलाची इच्छा आहे की त्यांनी विश्वासामध्ये स्थिर राहावे आणि प्रीति, आनंद, शांती ह्या पवित्र आत्म्याच्या फळांनी भरून जावे. 


   आपण आनंदी राहण्यासाठी आम्ही आपले विचार शुद्ध व निर्मळ राखले पाहिजेत. कारण आत्मिक आरोग्याचे हे खरे लक्षण आहे. आपण व्यर्थ काळजी, चिंता करीत बसू नये, तर प्रार्थनेद्वारा सर्व काळजी, चिंता प्रभूवर सोपवून द्यावी. असे लिहिले आहे की, *कशाविषयीही चिंताक्रांत होऊ नका तर सर्व गोष्टींविषयी प्रार्थना व विनंती करून आभारप्रदर्शनासह आपली मागणी देवाला कळवा. ( फिलिप्पै ४:६)* प्रार्थना करणे म्हणजे देवाच्या सान्निध्यात विश्वासाने जाणे होय. विनंती करणे म्हणजे उत्तराच्या आशेने आपली बाब प्रभूसमोर मांडणे होय आणि आभारप्रदर्शनासह ही कृती देवावरील अढळ असा विश्वास प्रगट करते. असे जर आपण करू तर देवापासून येणाऱ्या स्वर्गीय शांतीचा ओघ आपल्या अंतःकरणात सदैव राहील आणि आपली अंतःकरणे सदोदित आनंदी राहतील. 


    आनंदी राहण्यासाठी पौल सांगतो त्याप्रमाणे जर आपण केले तर निश्चितच सर्व दुःख देणाऱ्या गोष्टी आपल्या जीवनातून पळ काढतील आणि आपले जीवन आनंदी होईल. त्यासाठी पौल म्हणतो की, *जे काही सत्य, जे काही आदरणीय, जे काही न्याय्य, जे काही शुद्ध, जे काही प्रशंसनीय, जे काही श्रवणीय, जो काही सद्गुण, जी काही स्तुती त्यांचे मनन करा. ( फिलिप्पै ४:८)* म्हणजेच 

    *जे काही सत्य -* म्हणजे जे खोटे, अप्रामाणिक, बेभरवशाचे, आहे त्यावर विश्वास ठेवून दुःखी होऊ नका. तर पौल म्हणतो त्याप्रमाणे आम्ही राहावे. पौल म्हणतो, *अज्ञान्यासारखे नव्हे तर ज्ञान्यांसारखे सभोवार नजर ठेवून जपून चाला. ( इफिस ५:१५)* 

   *जे आदरणीय म्हणजे -*  ज्या गोष्टींचा आदर बाळगता येईल असे आणि सन्मानास पात्र आहे ते अंगीकारा म्हणजे तुमचा आनंद टिकून राहील.

  *जे न्याय्य -* देवाच्या वचनाप्रमाणे व देवाला संपूर्ण मान्य असे राहा.

   *शुद्ध -* जे शुद्ध, पवित्र, निर्भेळ आहे, नैतिक दृष्ट्या स्वच्छ आहे त्याचाच स्वीकार करा

   *प्रशंसनीय -* ज्यामुळे केवळ  शांतीच प्रस्थापित होते, देवाची प्रशंसा होते, तणाव निर्माण होत नाही असे.

   *श्रवणीय -* जे काही आमच्या आध्यात्मिक उन्नतीसाठी, वृद्धीसाठी आहे ते,जे वि्ध्वंसक नसेल ते. 

   *सद्गुण -* ते देवाच्या ठायी असलेले सर्व चांगले आचरण सर्व सद्गूण असे आमच्या देवाच्या चांगल्या गुणांनी भरलेले असतात.

   *स्तुती -* ह्या सर्व गोष्टी अंगीकारल्यामुळे आपण सदैव आनंदी राहतो. आणि देवाची स्तुती करतो. आणि ख्रिस्ताच्या   आनंदाने भरलेले असे होऊ शकतो. 


       प्रियांनो, आनंदी राहण्यासाठी ह्याशिवाय दूसरे काहीही करण्याची आवश्यकता नाही. आपण देवावर पूर्ण जिवेभावे विश्वास ठेवून त्याच्या मार्गाने चालू या आणि आनंदी होऊन त्याचे आशीर्वाद प्राप्त करून घेऊ या.


        

No comments:

Post a Comment