*✨मुकुटमंडित ख्रिस्त✨*
*ज्याच्यासाठी सर्व काही आहे, व ज्याच्याद्वारे सर्व काही आहे, त्याने पुष्कळ पुत्रांना गौरवात आणतांना त्यांच्या तारणाचा जो उत्पादक त्याला दुःखसहनाच्या द्वारे परिपूर्ण करावे हे त्याला उचित होते..✍*
*( इब्री २:१०)*
*...मनन...*
*!!..परमेश्वराची स्तुती असो..!!*
देवाचा पुत्र, प्रभू येशू ख्रिस्त किती श्रेष्ठ आहे आणि आम्ही त्याच्याकडे दुर्लक्ष करू नये ह्याकडे लेखक वाचकांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करत आहे. आणि आमच्या प्रभूचे देवपण आणि मानवपण हे इथे सांगितलेले आहे. मानवरूपात जन्म घेतल्यामुळे तो आमच्या सर्व गरजा समजून घेण्यास समर्थ आहे, कारण *तो परिपूर्ण मानव आहे.* त्याला मानवाच्या दुबळेपणाची जाणीव आहे. त्याचप्रमाणे *तो परिपूर्ण देवही आहे.* म्हणूनच तो आमच्या सर्व गरजांची परिपूर्ती करावयास समर्थ आहे. देवाने कधी असे योजिले नव्हते की पूढे कधीतरी देवदूत ह्या जगावर सत्ता चालवितील, परंतु देवाने मानवाच्या बाबतीत मात्र ही योजना केली होती. देवाने मनुष्याला ह्या जगाची निर्मिती केली तेव्हाच त्याला ह्या जगातील सर्व गोष्टींवर सत्ता दिली होती. ( उत्पत्ति १:२६ ते २८) परंतु आदामाने पाप केल्यामुळे ही त्याची सत्ता गेली. आणि आज सत्ता मिळविण्यासाठी मनुष्यांमध्ये स्पर्धा चालू आहे. मनुष्याने पाप केल्यामुळे ह्या जगात मरण शिरले. मनुष्य मरणाच्या अधीन आहे. तरी परमेश्वर त्याची आठवण करतो आणि मनुष्याला *वर उचलण्यास* तो तयार आहे. देवाने मनुष्यासाठी जे योजिले होते ते पूर्ण करण्यासाठी देवाने एक खूप आश्चर्यकारक योजना आखली. आणि देवाचा पुत्र ह्या जगात देहधारी होऊन आला. तो मनुष्य झाला. आणि आता हा मनुष्य म्हणजे देवाचा पुत्र ह्याला देवाने जगाचा अधिपती असे नेमिले आहे. *तूं त्याला गौरव व थोरवी ह्यांनी मुकुटमंडित केले आहे, आणि तूं आपल्या हातच्या कृत्यांवर त्याला नेमिले आहे, तूं सर्व काही त्याच्या अधीन, त्याच्या पायांखाली ठेविले आहे. ( वचन ७)*
मानवाला त्याच्या पापापासून सोडविण्यासाठी देवाने देवदूताला नाही, तर स्वतःच्या पुत्राला पाठविले आणि तेही देवदूताच्या रूपात नाही, तर मानवरूपात पाठविले. ह्यासाठी की, त्याने आमचा उद्धारक होऊन मानव म्हणून दुःख सोसावे आणि मानव म्हणूनच मरावे जेणेकरून मरणावर सत्ता गाजविणाऱ्या सैतानाला हतबल करावे, त्याची मरणावरची सत्ता उलथून टाकावी. देवाने मनुष्यमात्रावर कृपा केली आणि ख्रिस्ताने मनुष्यांकरिता दुःखसहन सोसले, मरणाचा अनुभव घेतला. आणि आज *येशू ख्रिस्त गौरव व थोरवी ह्यांनी मुकुटमंडित आहे.* त्याच्याद्वारे देवाची मनुष्याच्या बाबतीतली योजना पूर्ण होणार आहे, ती ही की, *मनुष्य ह्या जगावर सत्ता चालवील.* ख्रिस्ताने मरण सोसून मानवांच्या पापांबद्दल प्रायश्चित्त केले आणि अशारितीने मनुष्याला देवाच्या आशीर्वादात येण्याचा मार्ग मोकळा झाला. त्याने आपल्या मरणाने, मरण व मरणावर सत्ता चालविणारा सैतान ह्यांची सत्ता दूर केली. जे मरणाच्या सत्तेत होते त्यांना बंधमुक्त केले. आणि त्याने मरणातून परत उठून अधोलोक व मरण ह्यांवरचा अधिकार त्याने मिळविला. सैतान मरणाच्या बंधनात आता कोणालाच जखडून टाकू शकणार नाही.
म्हणून प्रियांनो, आम्ही आमच्या दुबळेपणाकडे म्हणजेच स्वतःकडे व स्वतःच्या अशक्तपणाकडे लक्ष लावू नये तर आमचे हे दुबळेपण, हे अशक्तपण दूर करण्यास समर्थ असणाऱ्या आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताकडे आम्ही लक्ष लावले पाहिजे. आमची नजर पृथ्वीवरील, जगीक गोष्टींकडे नाही, तर वर स्वर्गाकडे, जिथे आमचा प्रभू येशू ख्रिस्त देवाच्या उजवीकडे बसला आहे, तिथे आमच्या मुकुटमंडित अशा ख्रिस्ताकडे आम्ही आमची नजर लावली पाहिजे.
*
No comments:
Post a Comment