*फिलिपै २:५-११*
*ख्रिस्ताचा जन्म तो*
*देव असूनही मानव झाला*
*कारण आम्हासाठी बाळ जन्माला आहे, आम्हास पुत्र दिला आहे.* *यशया ९:६*.
घरोघरी ख्रिस्त जन्माचा आनंद सोहळा सुरू झाला आहे.
डिसेंबर महिना ह्या आनंद सोहळ्याची चाहूल घेऊनच येतो. खरेदीची, घराच्या रंग सफेतीची, घर सजावटीची लगबग सुरू झाली असणारच. ख्रिस्त जन्माचा सोहळा म्हणजे फक्त आनंदच!!
क्षणभर थांबून विचार करू आपण की का हा आनंद साजरा करतो आपण? *आजच प्रतीक वचन सांगते आम्हासाठी बाळ जन्माला , म्हणजे ख्रिस्त पूर्ण मानव होऊन या जगात आला. आणि आम्हासाठी पुत्र दिला अर्थात प्रत्यक्ष देवपित्याचा पुत्र म्हणजेच प्रत्यक्षात देवच या पृथ्वीतलावर आला. पूर्ण मानव पूर्ण देव !!* यशया संदेष्ट्याने ही भविष्यवाणी ख्रिस्त जन्माच्या सातशे वर्षे अगोदरच केली होती.
*परमेश्वर मनुष्य होऊन स्वर्गातून पृथ्वीवर आला की ज्यामुळे पृथ्वीवरील मानवाला स्वर्गात जात यावे.* म्हणून हा आनंद सोहळा आपण साजरा करतो. पौल आजच्या मननाच्या शास्त्रपाठात याचे स्पष्टीकरण करीत आहे की, *मनुष्य प्रकृतीचे असे प्रगट होऊन ख्रिस्ताने मरण आणि तेही वधस्तंभावरचे मरण सोसले ; येथपर्यंत आज्ञापालन करून ख्रिस्ताने स्वतःला लीन केले*. ख्रिसमस म्हणजे काय हे जाणून घ्यायचे असेल तर हे वचन समजून घेणे आवश्यक आहे.
*राजासनावर बसणारा ख्रिस्त गव्हाणीत निजला , राजमुकुट आणि शुभ्र वस्त्रं धारण करणारा बाळंत्याने गुंडाळला गेला. सदैव पवित्र असणारा तो अपराधी म्हणून वधस्तंभावर गेला.*का केले प्रभूने असे कारण ख्रिस्ताला आमचा आत्मा मोलवान वाटतो.* *पृथ्वीवरील त्याच्या स्वतःच्या जीवनापेक्षा आमचं सार्वकालिक जीवन ख्रिस्ताला महत्वाचे वाटते.* *सर्वोच्च स्थानी असणारा ख्रिस्त आमच्यासाठी दास असा झाला. फक्त दास नाही तर तारणारा झाला.* *वधस्तंभावर मरण पावला. येशू शिडीवरून खाली का आला तर त्या शिडीवरुन आम्ही वर जावे*.म्हणून *प्रभुसारखे नम्र आम्ही झालं पाहिजे. पण हा वर जाण्याचा मार्ग वरचढ, अहंकारी होण्यासाठी नाही तर हा मार्ग नम्र आणि लिनतेचा आहे.*
*मेलवीन ( Melvin ) नावाचे अभ्यासक म्हणतात की, " ख्रिस्ताने स्वतःचे गॉड कार्ड कुठेही वापरले नाही.तो कुठेही म्हणाला नाही की मी येशूख्रिस्त आहे म्हणून मीच आधी जाणार..* *किंवा तू कोणाशी बोलत आहेस हे तुला कळते काय? ,प्रभू कधीही कोणाला म्हणाला नाही की माझा हक्क आधी आहे. उलट ख्रिस्त नम्रच झाला.* आपणही नम्र झालंच पाहिजे कारण *विश्वासाने खरा ख्रिस्तमस पाळणे म्हणजे ख्रिस्ताचे अनुकरण करणे*.
*जर आम्ही ख्रिस्तासारखे नम्र होऊ तर खऱ्या अर्थाने हा आनंद सोहळा साजरा करू.*
*प्रभू येशु तुझ्यासारखी नम्र चित्तवृत्ती आमच्यात येऊ दे म्हणजे तुझ्या जन्माचा आमचाआनंद द्विगुणित होईल.*
*आमेन*..
No comments:
Post a Comment