*मत्तय २०:२९-३४*
*खरे आंधळे कोण?*
*त्यांनी उगे रहावे म्हणून लोकांनी त्यास धमकावले ; तरी ते अधिकच ओरडून म्हणाले ; प्रभो, दावीदाचे पुत्रा आम्हावर दया करा.*
*मत्तय २०: ३१*
पुष्कळ लोकांचा स्वभाव असतो दुसऱ्यांना मागे खेचण्याचा! किंवा अति महत्वाच्या किंवा समाजातील मान्यवर अशा व्यक्तीच्या जर ते जवळचे असतील तर ते स्वतःलाच मोठे, महत्वाचे समजायला लागतात स्वतःचे महत्व टिकवण्यासाठी किंवा आमची मर्जी असेल तरच तुम्ही भेटू शकता हे इतरांच्या मनावर ठसवण्यासाठी . येशूच्याही काळात असे लोक त्याच्या भोवती होते. जेव्हा हे दोन आंधळे येशूला हाका मारू लागले तेव्हा येशूच्या जवळच्या लोकांनीच त्यांना धमकावले..
पण हे दोघे गप्प बसले नाहीत तर आणखी मोठयाने हाका मारू लागले. ते ऐकून येशू स्वतः थांबला त्यांना जवळ बोलावून त्यांच आंधळेपण दूर केले. त्यांना प्रभू येशू दिसला आणि लाभला सुद्धा !!
*जो मनापासून प्रभूला हाक मारतो प्रभू येशु त्यांच्यासाठी वेळ देतो, भेट घेतो, आणि त्यांच्या जीवनात आणि त्याच मंडळीत कार्यसुद्धा करतो*. *कोणी कितीही अडवण्याचा प्रयत्न केला तरीही !!* मला नेहमी वाटते की हे दोन आंधळे खऱ्या अर्थाने डोळस होते. कारण डोळ्यांनी जरी ते प्रभूला पाहू शकत नव्हते तरी त्यांच्या अंतकरणाने मात्र प्रभूला पुरतेपणी पाहिलं होतं, पूर्ण विश्वास ठेवला होता , म्हणूनच त्यांना जरी लोकांनी धमकावले तरीही त्या धमकावण्याकडे दुर्लक्ष करून त्यांनी विश्वासाने प्रभू येशूला हाक मारली. *त्यांच्या अंतकरणाचा डोळसपणा प्रभुनेच जाणला*.. म्हणूनच तो थांबला, आपला वेळ त्यांना दिला आणि शारीरिक आरोग्यही बहाल केले.
*खरे आंधळे तर त्यांना प्रभू येशूला भेटण्यापासून धमकावणारे, अडवणारेच होते*.. आजही अशा प्रभू येशूला भेटू न देणाऱ्या आंधळ्याची मंडळीत कमतरता नाही.. ते स्वतःही प्रभूला जाणत नाहीत ,भेटत नाहीत आणि इतरांनाही भेटू देत नाहीत.. *त्यांची अंतःकरणे ह्या युगाच्या दैवताने आंधळी केलेली असतात*. *म्हणजेच स्वार्थीपणा, अहंकार, ह्यामुळे त्याच्यामध्ये आंधळेपण आलेले आहे*..
*२करिंथ ४:४*. आम्ही तर असे अंतःकरणाने आंधळे नाहीत ना की ज्यामुळे आम्हाला प्रभू येशू दिसत नाही आणि इतरांनाही दिसू देत नाही. जर आमच्यातही असे आंधळेपण असेल तर प्रभूला विनंती करू की,
*सर्वसमर्था तुझ्यापासून दूर नेणारे अंतःकरणाचे आंधळेपण आमच्यात असेल तर दूर कर.* *आमेन*...
No comments:
Post a Comment