Wednesday, 9 December 2020

उचित समय



                 *✨उचित समय✨*


*सर्वांचा काही उचित काळ म्हणून असतो, भूतलावरील प्रत्येक कार्याला समय असतो..✍*

                 *( उपदेशक ३:१)*


                   *...मनन...*


          *!!..परमेश्वराची स्तुती असो..!!*


    उपदेशक पुस्तकाचा लेखक सर्वांचा काही उचित काळ असतो हे सांगत असताना पूढे मानवाच्या नित्य जीवनातील आणि अनुभवातील असे अनेक प्रसंगाचे वर्णन त्याने केले आहे. जसे की, जन्म व मृत्युचा समय, रोपण्याचा व उपटण्याचा समय, वधण्याचा व बरे करण्याचा, मोडून टाकण्याचा व बांधण्याचा, रडण्याचा व हसण्याचा, शोक करण्याचा व नृत्य करण्याचा, प्रेम करण्याचा व द्वेष करण्याचा अशा अनेक समयांचे वर्णन केलेले आम्हाला पाहावयास मिळते. कारण प्रत्येक गोष्टींचा एक उचित काळ असतोच. आणि त्या त्या वेळीच म्हणजे योग्य समयीच ती गोष्ट घडत असते. आमच्या जीवनात सर्व काही परमेश्वराच्या योजनेनुसारच घडून येत असते. म्हणून आम्ही शांत राहून देवाच्या इच्छेप्रमाणे, योजनेप्रमाणे घडून येण्याची वाट पाहावी.


   प्रियांनो, ऋतू बदलतात, मौसम बदलतात. आमची परिस्थिती देखील कायम आहे अशी राहात नाही तर तीही बदलत राहाते. चांगल्या बदलाचे आम्ही आनंदाने स्वागत करतो परंतु अनेकदा जीवनात कठीण प्रसंग येतात, दुःखाचे, निराशेचे, हानीचे त्याचे आपण स्वागत करू शकत नाही पण त्यांचा स्वीकार करण्यावाचून काहीच पर्याय नसतो. परंतु सर्व परिस्थिती बदलली तरी आमचा देव कधीच बदलत नाही. तो कधीही न बदलणारा देव आहे. मलाखी संदेष्ट्याच्या द्वारे तो म्हणतो, *मी परमेश्वर बदलणारा नव्हे. ( मलाखी ३:६)* देव आहे तसाच राहतो. तो कधीच बदलत नाही, पालटत नाही म्हणूनच जरी आमच्या जीवनात कठीण प्रसंग आले तरीही आम्ही त्याच्यावर विश्वास ठेवून चालत असलो तर आम्हाला भिती बाळगण्याचे किंवा चिंता करण्याचे काहीच कारण नाही. आम्ही त्याच्यावर विसंबून राहू शकतो. कारण तो आमची काळजी घेतो आणि सदैव आमच्या बरोबर असतो. संकटसमयी तो आम्हाला साहाय्य करतो आणि आम्हाला संकटातून सोडवितो. स्तोत्रकर्ता म्हणतो, *देव आमचा आश्रय व आमचे सामर्थ्य आहे, तो संकटसमयी साहाय्य करण्यास सदा सिद्ध असतो. ( स्तोत्र ४६:१)* 


    परमेश्वर सदोदित आमच्या सन्निध असतो. आमच्या अंतःकरणाचे रक्षण करण्यास त्याची शांती समर्थ आहे. पौल म्हणतो, *कशाविषयीही चिंताक्रांत होऊ नका तर सर्व गोष्टींविषयी प्रार्थना व विनंती करून आभारप्रदर्शनासह आपली मागणी देवाला कळवा. म्हणजे सर्व बुद्धिसामर्थ्याच्या पलीकडे असलेली देवाने दिलेली शांती तुमची अंतःकरणे व तुमचे विचार ख्रिस्त येशूच्या ठायी राखील. ( फिलिप्पै ४:६,७)* परमेश्वराची प्रीति आम्हां विश्वासणाऱ्यांच्या फक्त बाह्य शरीराचेच रक्षण करीत नाही तर आमच्या जीव आत्म्यांना देखील सुरक्षित ठेवते. परमेश्वराची आम्हांवरील प्रीति आम्हाला सावरून धरते. आम्हाला देवापासून दूर करीत नाही. पौल म्हणतो, *उंची, खोली, किंवा दूसरी कोणतीहि सृष्ट वस्तु, ख्रिस्त येशू आपला प्रभू ह्याच्यामध्ये देवाची आपल्यावरील जी प्रीति आहे तिच्यापासून आपल्याला विभक्त करावयाला समर्थ होणार नाही. ( रोम ८:३९)* 


*ह्या नेहमी नेहमी बदलणाऱ्या समयात कधीही न बदलणारा आमचा देव आम्हाला सुरक्षित ठेवतो.*


        

No comments:

Post a Comment