*✨ख्रिस्ती जीवन✨*
*कारण ते देवाच्या पुत्राला स्वतःपूरते नव्याने वधस्तंभावर खिळतात व त्याचा उघड अपमान करतात..✍*
*( इब्री ६:६)*
*...मनन...*
*!!..परमेश्वराची स्तुती असो..!!*
वरील वचनाद्वारे आपण पाहतो की, लेखक ह्या वचनाद्वारे लोकांना इशारा देत आहे. त्याची इच्छा आहे की त्यांनी ख्रिस्ताची शिकवण विसरू नये. कारण त्यांचे तारण झाले आहे, ते ख्रिस्ताला ओळखत आहेत, पण तरीही आत्मिक बाबतीत त्यांची वाढ झाली नसल्यामुळे ख्रिस्ताच्या सुवार्तेच्या मूळच्या गोष्टी ते विसरले होते व देवाविषयीची तीच सत्ये त्यांना पुन्हा एकदा शिकविण्याची गरज आहे. त्यांच्याविषयी लेखक म्हणतो, *तुम्ही ऐकण्यात मंद झाला आहात* कारण आतापावेतो त्यांनी स्वतःच शिक्षक व्हावयास पाहिजे होते. ज्याला फक्त नव्या जन्माविषयीची सुवार्ता माहीत आहे, व जो फक्त आपल्या तारणाचाच विचार करतो, ज्याची आध्यात्मिक वाढ झालेली नाही, ज्याला देवाचे वचन व नीतीने चालण्याविषयीचे शिक्षण यांंची माहिती नाही अशा लहान बाळकांसारखे ते झाले आहेत. अशा लोकांबद्दल लिहिले आहे की, *तुम्हाला दूधाची गरज आहे, जड अन्न चालत नाही, कारण दूधावर राहणारा नीतिमत्वाच्या वचनाशी अपरिचित असतो, कारण तो बाळक आहे. ( इब्री ५:१२,१३ )*
आपण पाहातो की, त्यांनी ख्रिस्ताचा स्वीकार केला व देवापासून मिळणारा आशीर्वाद मिळविला व त्यांना पवित्र आत्मा मिळाला म्हणजेच त्यांनी देवाच्या अभिवचनांचा, समक्षतेचा अनुभव घेतला आहे. असे लिहिले आहे की, *ज्यांना एकदा प्रकाश मिळाला, ज्यांनी स्वर्गीय दानाची रूची घेतली, जे पवित्र आत्म्याचे वाटेकरी झाले, आणि ज्यांनी देवाच्या सुवचनाची व येणाऱ्या युगाच्या सामर्थ्याची रूची घेतली ( इब्री ६:४,५)* आणि तरीही *ते जर पतित झाले* म्हणजेच ख्रिस्ती जीवनात पूढे न जाता ते अविश्वासाने राहिले, ख्रिस्तावर अवलंबून राहण्याचे त्यांनी बंद केले आहे. पौल म्हणतो, *ते सत्याविषयी चुकले आहेत ( २ तीमथ्य २:१८)* अशा परिस्थितीमध्ये त्यांना पश्चाताप होईल असे त्यांचे पुन्हा नवीकरण करणे अशक्य आहे असे पौल म्हणत आहे. इब्री लोकांस पत्रामध्ये भूमीबद्दल संदर्भ घेऊन खूप सुंदर उदाहरण दिले आहे. असे लिहिले आहे की, *जी भूमी आपणावर वारंवार पडलेला पाऊस पिऊन आपली लागवड करणाऱ्यांना उपयोगी अशी वनस्पती उपजविते, तिला देवाचा आशीर्वाद मिळतो. ( इब्री ६:७)* ह्याचा अर्थ जेव्हा आपण सुवार्ता ऐकतो, आणि ख्रिस्ताच्या समक्षतेमध्ये येतो तेव्हा जे आम्ही ऐकले आहे, ग्रहण केले आहे त्याप्रमाणे आचरण करून आणि इतरांनाही देवाच्या समक्षतेमध्ये घेऊन आले पाहिजे, देवाबद्दलच्या विश्वासामध्ये इतरांनाही वाढण्यास मदत केली पाहिजे. कारण आमच्यामधून शंभर पट पीक मिळावे अशी देवाची इच्छा आहे. म्हणजे मग आम्हीही आशीर्वादित केले जाऊ. आणि याउलट बायबल मध्ये आणखी एक उदाहरण सांगितले आहे. ते असे की, *पण जी भूमी कांटेकुसळे उपजविते ती नापसंत व शापित होण्याच्या बेतांत आली आहे, तिचा शेवट जाळण्यात आहे. ( इब्री ६:८)* जर भूमीने चांगले पीक दिले नाही, कांटेकुसळेच उपजविली तर ती नापसंत करण्यात येईल. आम्ही आम्हाला सोपवून दिलेली कामगिरी पार पाडली नाही तर आम्ही देवाच्या पसंतीस न उतरलेले असे ठरू. आम्ही देवाचे कामकरी आहोत. आणि देवाचे वचन पेरणे आणि देवाची सुवार्ता अनेकांपर्यंत पोहोचविणे हेच आमचे काम आहे. ते आम्ही केले नाही तर कांटेकुसळे उगविणाऱ्या भूमीप्रमाणे आम्हीही होऊ आणि देवाच्या राज्यासाठी अयोग्य ठरवले जाऊ.
म्हणून प्रियांनो, आम्ही देवाच्या आज्ञा पाळून त्याच्यावर प्रीति केली पाहिजे. आपला विश्वास टिकवून ठेवून व प्रभूवर प्रीति करून इतरांची सेवा करणे हे विश्वासणाऱ्यांच्या जीवनात दिसून यावे. ख्रिस्तावरील विश्वासाने पूढील काळातील आशीर्वादांची खात्री आम्हाला मिळते. कारण आम्ही करत असलेले कार्य व पवित्र जनांची सेवा ही तो विसरून जाणार नाही तर आम्हाला त्याचे प्रतिफळ दिल्याशिवाय तो राहणार नाही. म्हणून इब्री लोकांस पत्राचा लेखक म्हणतो, *तुम्ही आळशी होऊ नये, तर विश्वासाच्या व धीराच्या योगे जे अभिवचनांचा वारसा उपभोगणारे होतात त्यांचे तुम्ही अनुकारी व्हावे. ( इब्री ६:१२)* ह्या वचनाप्रमाणे आमचे आचरण असावे. आम्ही आळशी नसावे. देवाच्या राज्याची सुवार्ता अनेकांपर्यंत घेऊन जाणारे असे आम्ही असावे.
*आपल्याला जगाचा आत्मा नव्हे, तर देवापासून निघणारा आत्मा मिळाला आहे, ह्यासाठी की, "जे देवाने आपल्याला कृपेने दिले" ते आपण ओळखून घ्यावे. ( १ करिंथ २:१२)*
No comments:
Post a Comment