*✨देवाच्या घरात दुष्काळ नाही✨*
*"तुझ्या घरातील समृद्धीने त्यांची तृप्ती होईल, आणि तू आपल्या सुखांच्या नदीचे पाणी त्यांस पाजशील"..✍🏼*
*( स्तोत्र ३६:८ )*
*...मनन...*
*!!..परमेश्वराची स्तुती असो..!!*
देवाच्या घरात म्हणजेच देवाच्या मंदिरात समृद्धी आहे, विपूलता आहे. देवाच्या घरात कुठल्याच चांगल्या गोष्टींची कमतरता नाही, दुष्काळ नाही. देवाच्या घरात आशीर्वादांची आणि सर्व चांगल्या गोष्टींची रेलचेल आहे. त्यातूनच आपली तृप्ती होते. आपण नेहमी चर्चमध्ये असलेल्या प्रार्थना सभांमध्ये सहभागी झालो पाहिजे. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे आम्ही देवाचे घर सोडून इतर ठिकाणी व्यर्थ भटकता कामा नये. कारण आमच्यासाठी गरजेच्या असलेल्या सर्व गोष्टी देवाने आमच्यासाठी राखून ठेवल्या आहेत. आम्ही जर देवाचे घर सोडून भटकलो तर आमची स्थिती खूप दयनीय होते. आणि देवापासून दूर गेल्यामुळे आमचे पतन होते. बायबल मध्ये अशी अनेक उदाहरणे आहेत की जे देवाला सोडून दूर गेले आणि त्यामुळे त्यांचे वाईट झाले. बायबलमधून काही उदाहरणे पाहूया -
अब्राहाम हा विश्वासणाऱ्यांचा बाप, आज्ञांकितपणाचा व अर्पणांचा पुरूष आहे. तो राष्ट्रांचा जनक आहे. अशा अनेक गोष्टी आपण त्याच्याविषयी ऐकलेल्या आहेत. परंतु पतनाचा एक वाईट अनुभव आपण त्याच्या जीवनात पाहातो. जसे त्याच्या विश्वासाच्या द्वारे आणि आज्ञांकितपणाच्या द्वारे आपल्याला अनेक धडे शिकता येतात. तसेच त्याच्या जीवनातील या पतनाद्वारेही शिकायला मिळते. *तेथून निघून अब्राम प्रवास करीत नेगेबकडे गेला. पूढे देशात दुष्काळ पडला; तेव्हा काही दिवस मिसरात जाऊन राहावे म्हणून अब्राम तिकडे निघून गेला, कारण त्या देशातला दुष्काळ फार तीव्र होता. ( उत्पत्ती १२:९,१०)* येथे आपण पाहातो की, कनान देशातील दुष्काळ पाहून अब्रामचा आरंभीचा धार्मिक उत्साह मावळला. त्याला देशांतर करून इजिप्तमध्ये जावे लागले. बेथेल सोडून तो दक्षिणेकडे गेला. *"बेथेल"* म्हणजे *"देवाचे घर"* बेथेलात दुष्काळ नसतो.अब्राहामाने बेथेल सोडायला नको होते. जेव्हा आपण देवाचे घर सोडून जातो तेव्हा दुष्काळी परिस्थिती निर्माण होते. आपल्या पित्याच्या घरात तर भाकरीची रेलचेल आहे.
आपण पाहातो की, देशात दुष्काळ पडला आणि अन्नान्नदशा झाली म्हणून एक इस्राएली कुटुंब आपला देश सोडून आश्रयासाठी परक्या मवाब देशात जाऊन राहिले. थोड्या दिवसांसाठी स्वदेश सोडून गेलेले असे ते त्या परक्या देशातच राहिले. *"बेथेलहेम"* म्हणजे *"भाकरीचे घर"* हे बेथेलहेम म्हणजे भाकरीचे घर सोडून ते दूर गेले. परंतु त्या देशामध्ये नामीने आपला पती आणि दोन्ही मुलांना गमावले. आणि त्यामुळे तिला आपल्या देशाची आठवण झाली. *"देवाने आपल्या लोकांचा समाचार घेऊन त्यांस अन्न दिले आहे."* हे ऐकून घोर निराशेत तिला आशेचा किरण दिसला आणि तिने स्वदेशी परत जाण्याची तयारी केली. *"परत जाणे"* म्हणजे पश्चाताप करणे, देवापासून दूर गेलेल्याने माघारी फिरणे. तिने पश्चाताप करून परत देवाकडे येण्याची तयारी केली.
प्रियांनो, आमच्यामध्ये आध्यात्मिक अन्नाची कमी असेल आणि देवाच्या वचनाची इच्छा तुमच्या मनात नसेल तर आम्ही चुकीच्या दिशेने चाललो आहोत. जर आम्हाला भरपूर आध्यात्मिक अन्न मिळत नसेल तर मग मिसर देशाच्या अन्नाकडे आम्ही वळू शकतो, त्यासाठी आग्रह धरू शकतो, परंतु आम्ही लक्षात ठेवावे की ते आम्हाला कधीही तृप्त करू शकणार नाही. आमच्या देवाच्या घरातील, भाकरी खाऊनच आमची भूक भागवली जाणार आहे. जे देवाचे अनुसरण करण्याचा प्रयत्न करतात ते देवाच्या कृपेने सर्व प्रकारच्या संकटातून, अडचणीतून निभावतात. आपल्या जीवनात येणाऱ्या समस्या, ह्या आपण जर देवावर भरंवसा ठेवला आणि त्याच्या आज्ञा पाळल्या तर देव त्याचे हेतू पूर्ण करण्यासाठी त्यातून मार्ग काढतो. देव आमचे पतन होऊ देत नाही तर आम्हाला आमच्या चुकांची क्षमा करून आम्हाला साहाय्य करतो. म्हणून आम्ही देवाचे घर, देवाचे मंदिर सोडून, देवापासून दूर जाऊ नये तर सदैव देवाच्या समक्षतेत राहावे.
No comments:
Post a Comment