*✨आज्ञा पाळणारा पेत्र✨*
*"देवाने जे शुद्ध केले आहे ते तू निषिद्ध मानू नकोस"..✍*
*( प्रे. कृत्ये १०:१५)*
*...मनन...*
*!!..परमेश्वराची स्तुती असो..!!*
कर्नेल्य हा सैन्यातील एक अधिकारी होता. तो यहूदी नव्हता तरीही जिवंत देवाला मानणारा होता. तो देवाच्या दृष्टीने जे योग्य ते करीत असे. तो नीतिमान व आपल्या कुटूंबातील सर्वांसह देवाचे भय बाळगणारा होता. तो नित्य प्रार्थना करीत असे आणि संपूर्ण सत्य समजण्याची इच्छा त्याला होती. देवाच्या सहवासात राहण्याची ओढ त्याला होती. *अशा मनुष्यालाच देवाचे आशीर्वाद मिळतात.* कर्नेल्याला अधिक सत्य समजावे म्हणून देवाने त्याच्याकडे देवदूत पाठवून पेत्राला बोलावून घेण्याची त्याला आज्ञा केली. आणि कर्नेल्याने पेत्राला बोलावण्यासाठी माणसे पाठवली. आपण पाहातो की, ती माणसे अजून वाटेत होती तोवरच देवाने एका दृष्टांताद्वारे पेत्राच्या मनाची तयारी करून घेतली. यहूदी लोक यहूदी नसलेल्या म्हणजेच परराष्ट्रीय लोकांना तुच्छ समजत असत. आणि त्यांच्याबरोबर जेवण करीत नसत. ते त्यांना अशुद्ध मानीत असत. ते त्यांच्याबरोबर कसलाच संबंध ठेवीत नसत. आणि ख्रिस्त हा भेदभाव पेत्राद्वारे नष्ट करणार होता. ह्या दृष्टांताद्वारे तो पेत्राला हेच शिकवीत होता. पेत्रानेही देवाची इच्छा काय असावी ह्याचा विचार केला आणि आत्म्याच्या प्रेरणेने जाण्यास तयार झाला. *जेव्हा आम्ही देवाचे वचन वाचतो आणि त्यावर विचार करतो, तेव्हा देव वचनाद्वारे आम्हाला काय सांगत आहे हे लक्षात घेतले पाहिजे.*
यहूदी लोकांना काही ठराविकच प्राणी मारून खाण्याची परवानगी होती आणि देवाने पेत्रासमोर सोडलेल्या पात्रामध्ये तर सर्व प्रकारचे प्राणी होते. परमेश्वर त्याला म्हणत आहे, *'पेत्रा, उठ; मारून खा.'* परंतु पेत्र ते नाकारून देवाला म्हणत आहे की, *"नको, नको, प्रभू'; कारण निषिद्ध आणि अशद्ध असे काही मी कधीही खाल्ले नाही."* प्रियांनो, प्रभू म्हणजे आमचा मालक किंवा धनी, आणि त्याची आज्ञा पाळणे दास ह्या नात्याने आमचे कर्तव्य आहे. परंतु तीन वेळा असे झाले आणि पेत्राने ते नाकारले. नंतर पेत्राने जो दृष्टांत पाहिला त्यावरून देव त्याला काहीतरी शिकवीत आहे हे त्याच्या लक्षात आले. आणि आत्मा त्याला म्हणाला, *"पाहा, तीन माणसे तुझा शोध करीत आहेत, तर उठ, खाली ये आणि काही संशय न धरता त्यांच्याबरोबर जा, कारण मीच त्यांना पाठवले आहे." ( प्रे. कृत्ये १०:१९,२०)* आणि पेत्र लागलीच कर्नेल्याने पाठविलेल्या माणसांबरोबर जाण्यास तयार झाला. *प्रभू आपल्याला जे करायला सांगत आहे ते करण्यास आपण मोठ्या आनंदाने तयार व्हावे.*
पेत्र कर्नेल्याकडे गेला आणि कर्नेल्याने व त्याच्या सर्व लोकांनी मोठ्या आनंदाने देवाचे वचन ग्रहण केले आणि आपण पाहातो की, त्या वचन ऐकणाऱ्या सर्वांवर म्हणजेच परराष्ट्रीयांवर पवित्र आत्मा उतरून आला. पेत्र म्हणतो, *"कोणाहि मनुष्याला निषिद्ध किंवा अशुद्ध म्हणू नये असे देवाने मला दाखविले आहे."* आणि देव पक्षपात करणारा नाही. तर सर्वांवर सारखीच प्रीति करणारा आहे. म्हणून प्रियांनो, आपणही देवाच्या आपल्या जीवनाबाबतीत असलेल्या इच्छा, योजना जाणून घेऊन त्या पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करू या. देवाच्या आज्ञांचे पालन करू या.
No comments:
Post a Comment