*✨वचन जपा✨*
*शिवाय अधिक निश्चित असे संदेष्ट्याचे वचन आमच्याजवळ आहे; ते काळोख्या जागी प्रकाशणाऱ्या दिव्याप्रमाणे आहे; तुमच्या अंतःकरणात दिवस उजाडेपर्यंत व पहाटचा तारा उगवेपर्यंत तुम्ही त्याकडे लक्ष द्याल तर बरे होईल..✍🏼*
*( २ पेत्र १:१९ )*
*...मनन...*
*!!..परमेश्वराची स्तुती असो..!!*
पेत्र आपल्या पत्रात एका विशिष्ट गोष्टीचा उल्लेख करीत आहे. आपण काल बघितले होते की उत्तरेकडून सुवर्णप्रभा येत आहे, ज्या सीयोन पर्वतावर आपला प्रभू विराजमान आहे. जे आपल्या प्रभूचे नगर आहे. आजही प्रभू प्रकाश याविषयी आपल्याला बोलत आहे. कारण प्रभू येशूचे आगमन जवळ आले आहे. होय, आपला प्रभू येशू आपल्या असंख्य देवदूतांसह लवकरच येत आहे. म्हणून पेत्र बोलत आहे की संदेष्ट्याचे वचन आमच्याजवळ आहे.. ते वचन काय आहे याविषयी तो लिहितो की, ते काळोख्या जागी प्रकाशणाऱ्या दिव्यासारखे आहे. म्हणजेच देवाचे वचन हे दिवा आहे. ते प्रकाश देणारे आहे. त्या प्रकाशात आपल्याला चालायचे आहे. स्तोत्रकर्ता म्हणतो, *तुझे वचन माझ्या पावलांकरिता दिव्यासारखे व माझ्या मार्गावर प्रकाशासारखे आहे. ( स्तोत्र ११९:१०५)* प्रभू येशू म्हणतो, मीच जगाचा प्रकाश आहे.. होय, हा प्रकाश खरा प्रकाश आहे. या जगातील दिवे, विद्युत दिवे, आकाशातील सूर्य, चंद्र आणि तारे हे सर्व या प्रकाशापूढे फिके आहेत. या सर्वांपेक्षा अधिक तीव्र आणि प्रखर असा हा प्रकाश आहे. दिव्य तेजाने युक्त असा हा अत्यंत तेजस्वी प्रकाश आहे. प्रभू येशू ख्रिस्त हाच जगाचा प्रकाश आहे हे आपण कसे समजू शकतो ? जेव्हा प्रभू येशूला वधस्तंभावर खिळले आणि त्याने आपला प्राण पित्याच्या हातात सोपवला तेव्हा संपूर्ण जगभर अंधार पडलेला आपण पाहातो. वचन सांगते, *सहाव्या तासापासून नवव्या तासापर्यंत देशभर अंधार पडला. ( मार्क १५:३३)* यावरून आम्हाला समजू शकते की आमचा प्रभू येशू ख्रिस्त हा खरोखरच प्रकाश आहे.
वरील वचनाद्वारे आता पेत्र असे बोलत आहे की, हे जे वचन आहे, किंवा हा जो प्रकाश आहे, किंवा हा जो दिवा आहे तो आपल्याला दिवस उजाडेपर्यंत व पहाटेचा तारा उगवेपर्यंत म्हणजे ख्रिस्ताच्या आगमनापर्यंत सांभाळला पाहिजे, जपला पाहिजे. जे देवाचे वचन आपण आपल्या जीवनात स्वीकारले आहे ते येशूच्या आगमनापर्यंत आपल्याला टिकवता आले पाहिजे. कारण वचनात जीवन आहे. दिव्यासारखे प्रकाशने म्हणजे आपण पूर्ण पावित्र्य, शुद्धता राखले पाहिजे. कारण देवाचे वचनच आपल्याला शुद्ध करते. वचनाच्या द्वारे आपण रोज शुद्ध आणि पवित्र होऊन सदैव देवाचा महिमा केला पाहिजे. आपले पावित्र्य जर आपण राखले तर आज जरी प्रभू येशूचे आगमन झाले तरी आपल्याला काहीच भीती नसणार. आपण निश्चितच प्रभूच्या आगमनात उचलले जाणार.
म्हणून प्रियांनो, जग आणि जगातील गोष्टींकडे लक्ष केंद्रित न करता आपण आपल्या प्रभूला प्रसन्न केले पाहिजे. आमच्या प्रभूला कशाने संतोष होईल हे प्रथम पाहिले पाहिजे. आम्ही सर्व परिस्थितीत त्यालाच प्रथम स्थान दिले तर तो विश्वासयोग्य देव आहे. तो आपल्याला त्या अंधःकारापासून सुरक्षित ठेवील. योहान आपल्या पत्रात लिहितो की, *जो संदेश आम्ही त्याच्यापासून ऐकला आहे तो तुम्हाला विदित करतो; तो संदेश हा की, देव प्रकाश आहे आणि त्याच्या ठायी मुळीच अंधार नाही. ( १ योहान १:५)* म्हणून आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताला आपल्या अंतःकरणात जागा द्यायला पाहिजे. म्हणजे अंतःकरणात असलेली सर्व अंधाराची कामे नष्ट होतील. योहान म्हणतो, *तरी एकप्रकारे मी तुम्हांस नवी आज्ञा लिहितो. ती त्याच्या व तुमच्या बाबतीत खरोखर तशीच आहे; कारण अंधार नाहीसा होत आहे, व खरा प्रकाश आता प्रकाशत आहे. ( १ योहान २:८)* खरोखरच आमचा प्रभू येशू ख्रिस्त आम्हाला, जे आम्ही पूर्वी अंधकारात होतो, त्या आपल्या सर्वांना काळोखातून प्रकाशात आणण्यासाठी प्रकाश असा या भूतलावर आला आहे. वचन सांगते, *त्यांनी अंधारातून उजेडाकडे व सैतानाच्या अधिकारातून देवाकडे वळावे, म्हणून तू त्यांचे 'डोळे उघडावे,' आणि त्यांच्या पापांची क्षमा व्हावी व माझ्यावरील विश्वासाने पवित्र झालेल्या लोकांमध्ये वतन मिळावे. ( प्रे. कृत्ये २६:१८)*
No comments:
Post a Comment