*✨देव दया करतो✨*
*ज्या कोणावर मी दया करितो त्याच्यावर मी दया करीन आणि ज्या कोणावर मी करूणा करितो त्याच्यावर मी करूणा करीन..✍*
*( रोम ९:१५ )*
*...मनन...*
*!!..परमेश्वराची स्तुती असो..!!*
परमेश्वराची दया अगाध आहे. तो प्रेमस्वरूप आहे. तो प्रीतीपूर्ण देव आहे, तो सर्वांबरोबर प्रीतीने वागतो. देव आपल्या परिपूर्ण स्वभावाप्रमाणे वागतो. तो सर्वसमर्थ आहे, तरी आपल्या स्वभावाविरूद्ध वागू शकत नाही. तो न्यायी देव आहे. तो कोणावरही अन्याय होऊ देत नाही. *कारण सर्व जगाचा न्यायाधीश योग्य न्याय करणार नाही काय? ( उत्पत्ति १८:२५)* देव ज्ञानाने परिपूर्ण आहे आणि तो आपल्या ज्ञानानेच कृती करितो. देव कुणावर दया करितो ? प्रियांनो, परमेश्वर सर्वांवर सारखीच प्रीति करतो. त्याने सर्वांना आपल्याकडे येण्याचे आमंत्रण दिले आहे. तो म्हणतो, *अहो कष्टी व भाराक्रांत जनहो, तुम्ही सर्व माझ्याकडे या. ( मत्तय ११:२८)* आणि प्रभूने म्हटले आहे की, *...जो माझ्याकडे येतो त्याला मी मुळीच घालवून देणार नाही. ( योहान ६:३७)* म्हणून आज आम्ही त्याच्यावर विश्वास ठेवून, आमच्या सर्व काळजी, चिंता, आमचे दुःख, कष्ट, आमचा सर्व भार त्याच्यावर सोपवून देऊ या. त्याच्या आमंत्रणाचा स्वीकार करू या. कारण जो कोणी ह्या आमंत्रणाचा स्वीकार करतो आणि देवाकडे येतो, त्याला देवापासून दया प्राप्त होते. *देवाची दया सर्वांसाठी आहे. ( रोम ११:३२)* परंतु तरीही असे असूनही तो कित्येकांना कठीण हृदयाचेही बनवतो. आपण पाहातो, मिसरातून चारशे वर्षांच्या बंदीवासातून इस्राएल लोकांची सूटका करण्यासाठी जेव्हा मोशेला परमेश्वराने पाचारण केले होते, तेव्हा फारोच्या कठीण हृदयाला परमेश्वराने अधिक कठीण केले, ह्यासाठी की, त्याच्याद्वारे परमेश्वराचे गौरव व्हावे आणि त्याचे नाव दिगंतापर्यंत पोहोचावे. परमेश्वर म्हणतो, *तथापि मी तुला आपले सामर्थ्य दाखवावे आणि माझे नाव साऱ्या पृथ्वीवर प्रगट व्हावे यासाठीच मी तुला राखिले आहे. ( निर्गम ९:१६)* फारोने देवाच्या आज्ञा न पाळण्याचा निश्चय केला आणि देवाने त्याला जो आपले मन कठीण करतो त्याचा शेवट कसा होतो ह्याचे उदाहरण असे बनविले.
देवाने दया केली नसती तर ! देवाने इस्राएल लोकांनी त्याच्याविरूद्ध इतके बंड करूनही त्यांना स्वतःचे लोक म्हटले, शेकडो वर्षे ते बंड करीत राहिले. त्यामुळे *हे माझे लोक नव्हेत. ( होशेय १:९)* असे होशेय संदेष्ट्यांद्वारे देवाने सांगितले. परंतु तरीही तो दया करणारा आमचा प्रभू असल्यामुळे त्याने इस्राएल लोकांना टाकून दिले नाही. तर परमेश्वराने त्यांच्यावर दया करीन आणि ते पुन्हा देवाचे लोक होतील असे होशेयला सांगितले. ( होशेय २:२३) तो म्हणतो, *ते तुम्ही पूर्वी 'लोक नव्हता,' आता तर 'देवाचे लोक आहात; तुम्हांस दया मिळाली नव्हती,' आता तर 'दया मिळाली आहे.' ( १ पेत्र २:१०)* प्रियांनो, देवाची दया किती महान अशी आहे. त्याने इस्राएल लोकांचा समूळ नाश केला नाही. सदोम व गमोराप्रमाणे इस्राएल लोकांचा नाश तो करणार नाही असे अभिवचन त्याने दिले होते. *सेनाधीश परमेश्वराने आम्हांसाठी यत्किंचित शेष राखून ठेविले नसते तर आम्ही सदोमासारखे झालो असतो, गमोऱ्याप्रमाणे बनलो असतो. ( यशया १:९)* परंतु देव दयाळू आहे आणि तो इस्राएल लोकांवर दया करणारा देव आहे. त्याने इस्राएल लोकांवर दया करून त्यांच्या सर्व अपराधांची क्षमा केली. आजही तो आमच्यावर दया करून आमच्या अपराधांची आम्हाला क्षमा करीत आहे. गरज आहे ती आम्ही देवाची दया प्राप्त करून घेण्यासाठी त्याच्याकडे येण्याची, त्याच्या आज्ञांचे पालन करण्याची आणि त्याची परिपूर्ण इच्छा जाणून घेऊन त्यानुसार वागण्याची.
No comments:
Post a Comment