Monday, 14 December 2020

बंद दार

 *प्रकटीकरण ३: २१*


               *बंद दार*


      *पहा मी दाराशी उभा आहे व दार ठोकत आहे; जर कोणी माझी वाणी ऐकून दार उघडील, तर मी त्याच्याजवळ आत जाईन व त्याच्याबरोबर जेवीन, आणि तो माझ्याबरोबर जेवील.*  *प्रकटीकरण 3:२०*


      बाहेरून येणाऱ्या व्यक्तीला घरात येण्यासाठी दार ठोकावे लागते किंवा बेल वाजवावी लागते.  हाक मारावी लागते. *कारण दार बंद असतं, कडी आतून लावलेली असते.* कदाचित कामात, टीव्ही पाहण्यात किंवा इतर काही कारणांमुळे दार कोणी वाजवतयं हे लक्षात येत नाही. म्हणूनच

जोवर घरातील कोणी दार उघडीत नाही तोवर कोणालाही आत येता येत नाही. *कारण दार आतून बंद आहे*.

    आमच्या हृदयाची अवस्था अशीच आहे. ह्या हृदयाचे दरवाजे आम्ही आतून बंद करून घेतले आहेत. *प्रभू आमच्या हृदयाच्या दाराबाहेरच उभा आहे आणि आत यायचंय प्रभूला!!* 

  कशासाठी ख्रिस्ताला आत यायचे आहे? आमची सहभागीता त्याला हवी आहे, जेवायचं आहे प्रभूला आमच्या घरात आणि आमच्याबरोबर!! ही खरी तर सुवर्णसंधी आहे आमच्यासाठी.. 

  पण आमच्या हृदयाच्या दारावर ख्रिस्ताने दिलेली ही थाप , त्याची वाणी, वाजवलेली बेल काही ऐकायला येत नाही.. कारण हे जग आणि जगातील मोह आवरता येत नाहीत आपल्याला. प्रभू येशू दोष देत आहे की तू शीतही नाहीस , उष्ण पण नाहीस. चर्चच्या मंडळींचे सभासद आहोत तर आपण परिपूर्ण आहोत ,नीतिमान आहोत हा गैरसमज आहे, तोच गैरसमज जो प्रभूच्या सहभागीतेपासून दूर ठेवतो तोच ख्रिस्त येथे दूर करू पहातो , कारण आमचा नाश होऊ नये अशी प्रभूची इच्छा आहे .प्रभू म्हणतो, *"श्रीमंत होण्यासाठी अग्नीने शुद्ध केलेले सोने  माझ्यापासून विकत घे ,तुझी लज्जास्पद नग्नता दिसण्यात येऊ नये म्हणून नेसावयास शुभ्र वस्त्र विकत घे*".  कारण *तुला वाटते तू श्रीमंत आहे,धन मिळवले, पण तू दीन, दरिद्री, उघडा, आहे हे तुला कळत नाही*.   जगातील ह्याच मोहमायात, मान सन्मानात , बेगडी प्रतिष्ठेत इतके दंग झालेलो असतो आम्ही मग प्रभूच दार ठोठावणे, त्याची वाणी कशी ऐकायला येणार?

   यावरच तर मात करायची आहे, कारण प्रभू येशूबरोबर बसून जेवणं याहून कोणती श्रीमंती, कोणती प्रतिष्ठा मोठी आहे? जेव्हा ख्रिस्तासाठी ह्या हृदयाचे दार आपण उघडतो तेव्हा आणखी एक सन्मानाची गोष्ट प्रभू करतो ती म्हणजे प्रभू ज्या पित्याच्या राजासनावर आहे तेथे प्रभू बरोबर बसायला मिळणार आहे.

     *पण ह्या हृदयाच्या दाराची कडी मात्र आतूनच बंद आहे, आणि प्रभू येशु दाराच्या बाहेर उभा राहून ठोकत आहे, उघडणार नाही का हृदयाचं दार आपण??* *नाहीतर ओकून टाकले जाणार आहोत आपण*.. 

     *प्रभू येशु तू मारीत असलेली हाक, तुझं आमच्या हृदयाचं दार ठोठावणे ऐकून आम्ही हृदयाच्या दाराची कडी उघडावी असे कर*

        

No comments:

Post a Comment