Thursday, 3 December 2020

स्वामीला उपयोगी पात्र



           *✨स्वामीला उपयोगी पात्र✨*


*जर कोणी त्यापासून दूर राहून स्वतःला शुद्ध करील, तर तो पवित्र केलेले, स्वामीला उपयोगी पडणारे, प्रत्येक चांगल्या कामास तयार केलेले, असे मानाचे पात्र होईल..✍*

              *( २ तीमथ्य २:२१)*


                           *...मनन...*


          *!!..परमेश्वराची स्तुती असो..!!*


    प्रभूच्या दासाने कसे राहावे, त्याचे आचरण कसे असावे हे पौल तीमथ्याला सांगत आहे. *देवाचा एक चांगला शिपाई ह्या नात्याने आपण दुःख सोसले पाहिजे* असे पौल सांगत आहे. आमच्या सेवेचे क्षेत्र हेच आहे. येथे आम्ही कसोटीस उतरले पाहिजे. देवाच्या कार्याची *लाज वाटण्यास कसलेही कारण नसलेला* असे आपण असावे. ख्रिस्ताच्या ठायी कृपेमध्ये *बलवान होत जा* असे पौल म्हणतो. प्रभूला संतोष देण्यासाठी झटायचे होते आणि देवाच्या वचनातील नियमानुसार वागणे अगत्याचे होते. मंडळी जेव्हा एकत्र येते तेव्हा ती प्रभूसमोर असते. अशावेळी स्वतःची मते मांडून, वचनाचा दूसराच अर्थ लावून वाद घालू नये तर *देवाच्या पसंतीस उतरलेला कामकरी हो* असे पौल सांगत आहे. देवाच्या वचनाचा विपरीत अर्थ सांगून मंडळीचा नाश करणारा नव्हे तर *तू सत्याचे वचन नीट सांगणारा हो* असे पौल सांगतो. म्हणजे मंडळीची उन्नती करणारे झाले पाहिजे.


    तीमथ्याने नेहमी कसे राहावे हे सांगताना पौल म्हणतो, *प्रभूला उपयोगी पात्र* असा तू हो. पात्र कशाचे बनवले आहे, कोणत्या धातूचे बनवले आहे हे महत्वाचे नाही तर त्याचा योग्य उपयोग होतो का हे पाहिले पाहिजे. ते उपयोगी असावे ह्यासाठी ते स्वच्छ, साफ असावे आणि चांगल्या कामासाठी तयार केलेले असावे. प्रभू आपला उपयोग चांगल्या कामासाठी करतो का ? किंवा आपला उपयोग करता येत नाही किंवा आपण उपयोगी पात्र नाही म्हणून त्याने आम्हाला बाजूला काढून ठेवले आहे का ? असे होऊ नये म्हणून जपा. आणि प्रभूच्या उपयोगी येणारे पात्र बनण्यासाठी आपल्याला शुद्ध, पवित्र बनवा. पवित्र राहण्यासाठी काही गोष्टींपासून दूर राहावे लागते व काही गोष्टींच्या पाठीस लागावे लागते. जसे की, तरूणपणाच्या वासना म्हणजे, उतावीळपणा, तापट, संतापी वृत्ती, स्वतःच्या इच्छा पूढे करणे, वादविवाद करण्यास सरसावणे, आणि अनेक प्रकारच्या अनैतिक पापाच्या इच्छा किंवा पापाची बंधने ह्यापासून दूर राहिले पाहिजे. आणि ह्या गोष्टींच्या पाठीस लागावे - देवाच्या लोकांबरोबर सहभागितेमध्ये राहावे आणि देवाच्या विश्वासामध्ये अधिकाधिक वाढावे, विश्वासामध्ये स्थिर राहावे ही प्रत्येक विश्वासणाऱ्याची गरज आहे. सहभागितेमध्ये राहिले म्हणजे ते सर्व देवाचे लोक प्रभूचा धावा करणारे आणि एकमेकांना आधार देऊन एकमेकांना उत्तेजन देणारे असे असतात. उगाचच वायफळ वादविवादापासून दूर राहावे कारण वादविवाद भांडणास कारण होतो. आणि ख्रिस्ती माणसाने कधीही भांडू नये. *प्रभूच्या दासाने भांडू नये तर त्याने सर्वांबरोबर सौम्य, शिकविण्यात निपूण, सहनशील, विरोध करणाऱ्यांना सौम्यतेने शिक्षण देणारा, असे असावे. ( वचन २४,२५)* त्यामुळेच कदाचित विरोध करणाऱ्यांना पश्चाताप होईल आणि ते देवाच्या इच्छेप्रमाणे करण्यास तयार होतील. देवाच्या कार्यामध्ये खरी सौम्यता खूप आवश्यक आहे. स्तोत्रकर्ता म्हणतो, *...तुझ्या लीनतेमुळे मला थोरवी प्राप्त झाली आहे. ( स्तोत्र १८:३५)*


    ख्रिस्ती जीवनासंबंधाने आम्ही वाद घालू नये तर ते आम्ही जगावे. जगातील लोकांवर मात करण्यासाठी, त्यांच्याहून अधिक चांगले असे आमचे आचरण असावे, ह्यासाठी की, आमचे बोलणे, आमचे वागणे हे पाहून त्यांचे जीवन बदलले जाईल.  जगातील लोकांना आमचे जीवन एक आदर्श जीवन ठरावे आणि त्यांच्यासमोर कित्ता घालून देण्यासाठी उपयोगी यावे. आपल्या सेवाकार्यातील लीनता आणि विश्वासाची खात्री ह्यामुळे मंडळीविषयीची द्वेषभावना जाऊन मंडळीला तिचे योग्य स्थान प्राप्त होईल. आणि तिचा नाश होण्यापासून वाचेल. त्यासाठी त्यांना द्वेषाने दूर लोटून नाही तर प्रीतीने ख्रिस्ताकडे आम्ही ओढून घेतले पाहिजे. म्हणजे ते *सैतानाने त्यांना धरून ठेविल्यानंतर ते त्याच्या पाशांतून सुटून देवाच्या इच्छेस वश होण्याकरिता शुद्धीवर येतील. ( वचन २६)*


*"विजयी जीवन हीच ख्रिस्तासंबंधाने उत्तम साक्ष आहे "*


      

No comments:

Post a Comment