Monday, 7 December 2020

आध्यत्मिक दैन्यावस्था

 *याकोब ४:२-३*


                 *प्रार्थनेची*

     *आध्यत्मिक दैन्यावस्था*


  *तुम्ही इच्छा धरता तरी तुम्हाला प्राप्त होत नाही ; तुम्ही घात व हेवा करता तरी हवे ते मिळविण्यास तुम्ही समर्थ नाही ; तुम्ही भांडता व लढता ; तुम्ही मागत नाही ; म्हणून तुम्हाला प्राप्त होत नाही.*  *याकोब ४:२*.


      देवाकडे मागणे म्हणजेच प्रार्थना करणे . पण वरील वचनात आमची अध्यात्मिक दैन्यावस्था  यामुळे प्रार्थनेकडे होणारे दुर्लक्ष हेच प्रकर्षाने जाणवते. याकोब हीच जाणीव करून देत आहे की, खुपकाही आपल्या इच्छा असतात, आपल्या जीवनात अमुक एक गोष्ट व्हावी , किंवा आपल्याला काही हवं असते पण मिळत नाही. जेव्हा मिळते नाही तेव्हा आपण आपले मार्ग शोधायला लागतो की जे देवापासून नसतात तर आपल्या बुद्धीने ठरवलेले असतात  त्यामुळे  वचनात सांगितल्या प्रमाणे घात, हेवा, भांडण वगैरे अशा मार्गावर आपली जर पावले पडत असतील तर ती अध्यात्मिक दैन्यावस्था निश्चितच असते. *कारण आम्ही देवाकडे मागतच नाही.*  *प्रार्थना हे एक असं दार आहे की आपण जे उघडलं तर परमेश्वराच्या उत्तम योजना   व परमेश्वराच्याच  संकल्पानुसार  आमच्या इच्छा पूर्णत्वास जातात. पण हे प्रार्थनेचे दार आपणच बंद करून ठेवतो. प्रभू येशू म्हणतो , जेव्हा तुम्ही प्रार्थना करता*. जेव्हा म्हणतो प्रभू, जर प्रार्थना करता असं म्हणत नाही. *जर* म्हणजे केली तर केली नाही केली प्रार्थना तरी ठीक आहे. पण *जेव्हा* हा शब्द  प्रार्थना केलीच पाहिजे ही आज्ञा दर्शवितो. प्रभू येशू म्हणतो प्रार्थना करा, मागा तरच मिळेल. पण आमचा अध्यात्मिक आळस आड येतो.

    एक इंटिरिअर डेकोरेटर त्याच्या मित्राच्या घरी गेला , दोघे खूप चांगले मित्र होते. त्याने मित्राच्या घराची हॉलची  अरेंजमेंट पाहिली , त्याच्या मनात 

 आले की जर या मित्राने सोफा आहे तिथे न ठेवता दुसऱ्या दिशेला ठेवला, टीव्ही , डायनिंग टेबलची रचना बदलून घेतली तर मस्तं हॉल दिसेल , छान गेटअप येईल. पण हा इंटिरिअर डेकोरेटर मित्र काहीच करू शकत नाही जोवर त्याचा मित्र विचारीत नाही तोवर. कारण कितीही चांगला मित्र असला तरी घर त्याच आहे, अधिकार त्याचा आहे त्याच्या घरात काय कसे असावे यावर.पण जर ह्या इंटिरिअर मित्राला त्याने विचारले तर नक्कीच त्याच घर  हा मित्र उत्तम करून देईलच .. अगदी असेच आपण प्रभूला जेव्हा विनवतो तेव्हा तो नक्कीच उत्तम ते देतो.

    परमेश्वराने सुध्दा आम्हाला निवडीचा अधिकार दिला आहे आणि इच्छा स्वातंत्र्य दिले आहे. म्हणूनच आपण परमेश्वराच्या इच्छेलाच निवडले आणि प्रार्थना पूर्वक मागितले तर परमेश्वराच्या उत्तम योजनाच आपल्या जीवनात आनंद निर्माण करतील. हेवा, घात, भांडणं अशा अध्यात्मिक दैन्यावस्थेकडे  नेणाऱ्या गोष्टींना वावच राहणार नाही. 

    *फक्त गरज आहे ती अध्यात्मिक आळस आणि दैन्यावस्था झटकून सदैव प्रार्थनेत तत्पर राहण्याची !!*

   *सामर्थ्यशाली पित्या आम्ही निरंतर प्रार्थना करून तुझ्या उत्तम योजना आमच्या जीवनात सफल व्हाव्यात यासाठी तुझ्या पासून मिळणाऱ्या आशीर्वादाचे दरवाजे प्रार्थनेद्वारे सतत उघडे ठेवावेत असे कर.* *आमेन*

      

No comments:

Post a Comment