*✨विजयाची रहस्ये✨*
*ह्यामुळे देवाने त्याला अत्युच्च केले, आणि सर्व नांवांपेक्षा जे श्रेष्ठ नांव ते त्याला दिले, ह्यांत हेतु हा की, स्वर्गात, पृथ्वीवर व पृथ्वीखाली प्रत्येक गुडघा येशूच्या नावात टेकला जावा..✍*
*( फिलिप्पै २:९,१० )*
*...मनन...*
*!!..परमेश्वराची स्तुती असो..!!*
आमचा प्रभू येशू ख्रिस्त विजयी राजा आहे. त्याने खूप मोठा विजय मिळविला आहे, त्याने मृत्युची सर्व बंधने तोडून टाकून, मरणाची नांगी मोडून टाकून मृत्युवर विजय मिळविला आहे. आज आम्ही जे विश्वासणारे, ख्रिस्ताला अनुसरणारे त्या आम्हाला देखील आमच्या जीवनामध्ये येणाऱ्या वादळवाऱ्यात, तुफानात दृढ, भक्कम, खंबीर असे टिकून राहण्यासाठी, विश्वासात अढळ राहण्यासाठी विजय मिळविणे क्रमप्राप्त आहे. कारण आम्ही विजयी राजाची प्रजा आहों.
आपण कशाप्रकारे विजय मिळवू शकतो ते वचनाद्वारे पाहू या -
*१) वधस्तंभ हे विजयाचे रहस्य आहे -* हा देवाचा मार्ग आहे, आमचा कोकरा वधस्तंभावर मरण पत्करून, मरणावर विजय मिळवून, पुन्हा उठला आणि स्वर्गात राजासनावर देवाच्या उजवीकडे बसला आहे. आमच्या जीवनात वधस्तंभाचे चिन्ह किंवा खूण हाच आमचा खरा विजय आहे. पौल म्हणतो, *आम्ही स्वतःवर नव्हे तर मृतांना सजीव करणाऱ्या देवावर भरंवसा ठेवावा. ( २ करिंथ १:९)* जेव्हा आम्हाला आमचे भवितव्य, भविष्यकाळ, आमचे प्रियजन, आणि अगदी आमचे स्वतःचे जीवन सुद्धा देवाच्या हाती सोपवून देणे शक्य होते तेव्हा आम्ही महाविजयी होण्यास स्वतंत्र आणि पाशरहित असे होतो.
*२) पुनरुत्थानाचा संदर्भ घेऊन जगणे -* ख्रिस्ताने मरणावर विजय मिळवून, पुनरुत्थानाद्वारे आम्हाला एक नवीन आशा प्राप्त करून दिली आहे. आम्ही पुनरुत्थानावर विश्वास ठेवून मार्गक्रमण केले पाहिजे, आमचे जीवन पुनरूत्थानाचा संदर्भ घेऊनच जगले पाहिजे. पौल म्हणतो, *ख्रिस्त मेलेल्यांतून उठविला गेला आहे, तो महानिद्रा घेणाऱ्यांतले प्रथमफळ असा आहे, कारण मनुष्याच्या द्वारे मरण आहे, म्हणून मनुष्याच्या द्वारे मेलेल्यांचे पुनरुत्थानहि आहे. ( १ करिंथ १५:२०,२१)*
*३) छळ होणार हे मान्य करून त्याला धैर्याने तोंड देणे -* आमच्या जीवनात जेव्हा वादळे, संकटे येतात तेव्हा आम्ही आमची मने, अंतःकरणे आणि आमचा विश्वास देवाकडे लावून त्या वादळावर मात करू शकतो. वादळे आमच्यावर मात करू शकत नाहीत. आपण देवाच्या शक्तीला कार्य करू द्यावे. देवाचे सामर्थ्य आम्हाला वादळाच्या वर वर नेईल. आमच्या जीवनात आजार, संकटे, दुःख, शोकाचे प्रसंग, अपयश, निराशा घेऊन येणाऱ्या वादळी वाऱ्यांवर आरूढ होण्यास देव आम्हाला शक्ती, सामर्थ्य देतो. आणि आम्ही त्यावर विजय मिळवितो. असे लिहिले आहे की, *तरी परमेश्वराची आशा धरून राहणारे नवी शक्ती संपादन करतील, ते गरूडाप्रमाणे पंखांनी वर उडतील; ते धावतील तरी दमणार नाहीत, चालतील तरी थकणार नाहीत. ( यशया ४०:३१)*
*श्रीमंती, सुबत्ता आणि संकटांचा अभाव हे आमच्या विजयाचे रहस्य नाही, तर छळ, संकटांमध्येही विजय हेच विजयाचे रहस्य आहे.*
*४) ख्रिस्ताचा सेवक, सैनिक होणे -* विश्वासणाऱ्याच्या शील, स्वभावावर वधस्तंभाची खूण आहे. डोंगरावरील प्रवचनानुसार स्वाभाविक वर्तणूक आणि प्रत्यक्ष लढाईतील वर्तन ह्यात जमीन अस्मानाचा फरक आहे. साधारणतः एका सैनिकामध्ये दया, शांती, क्षमा, कृपा ह्या गोष्टींना मुळीच स्थान नाही, परंतु देवाचे जे सेवक आहेत, सैनिक आहेत, ते प्रीति, आनंद, शांती, आत्मसमर्पण आणि स्वार्थत्याग ह्या आध्यात्मिक शस्रांनी त्यांचे ध्येय साध्य करून घेतात. आम्ही देवाने आम्हाला सोपवून दिलेली कामगिरी त्याचा सैनिक ह्या नात्याने व्यवस्थित पूर्ण करावी. पौल म्हणतो, *जो देव आपल्या राज्यात व गौरवात तुम्हाला पाचारण करीत आहे त्याला शोभेल असे तुम्ही चालावे. ( १ थेस्सल २:१२)*
*छळ सोसणाऱ्यांबरोबर पूढे पूढे जाऊन आम्ही महाविजयी व्हावे आणि आमच्यावर प्रीति करणाऱ्या देवाच्या द्वारे आम्ही जिंकणारे व्हावे अशीच आमच्या जीवनाद्वारे प्रभूची इच्छा आहे.*
No comments:
Post a Comment