*✨नवे हृदय ✨*
*सर्व रक्षणीय वस्तुंपेक्षा आपल्या अंतःकरणाचे विशेष रक्षण कर, कारण त्यात जीवनाचा उगम आहे..✍*
*( नीति ४:२३ )*
*...मनन...*
*!!..परमेश्वराची स्तुती असो..!!*
आपण आपल्या सांसारिक जीवनात खूप काही गोष्टींसाठी धावपळ करतो. खूप कष्ट करून, जॉब करून आपल्याला आनंद देणाऱ्या किंवा आपल्याला आवडणाऱ्या वस्तु घेत असतो. आणि त्यास अधिक महत्व देऊन आपण त्या खूप जपतो. उदाहरणार्थ.. मोटार सायकल, कार, दागदागिने, मोबाईल इत्यादि वस्तु आपण आपल्या वैयक्तिक सुखासाठी, आनंदासाठी घेतो आणि त्यांचा अगदी मनापासून सांभाळ करतो. परंतु या सर्व वस्तु सांभाळून आपण आपल्या देवाला प्रसन्न करू शकतो का ? या वस्तूंचे रक्षण करून आपण देवाच्या राज्यात जाऊ शकतो का ? नाही प्रियांनो... आपण या वस्तूंमुळे ना देवाला प्रसन्न करू शकत ना देवाच्या राज्यात जाऊ शकत. आपण प्रभूची इच्छा जाणून घेतली पाहिजे, समजून घेतली पाहिजे. वरील वचनाद्वारे प्रभू आम्हाला सांगत आहे की, सर्व रक्षणीय वस्तूंपेक्षा आपल्या अंतःकरणाचे विशेष रक्षण कर. होय प्रियांनो, आपले अंतःकरण आपण कसे ठेवतो याकडे आपण लक्ष दिले पाहिजे. त्यासाठी विशेष प्रयत्न केले पाहिजेत.
मनुष्याला गरजेचे आहे की, त्याने आपल्या अंतःकरणाचे रक्षण करावे. कारण त्यात जीवनाचा उगम आहे. आणि जीवन म्हणजे प्रत्यक्ष प्रभू येशू ख्रिस्त आहे. तो स्वतःच म्हणतो, *मार्ग, सत्य व जीवन मी आहे.* सर्व बरे वाईट विचार अंतःकरणातूनच निर्माण होतात आणि मनुष्य पापात पडतो. जीवनाचा उगम तेथे आहे, म्हणजेच प्रभू येशू ख्रिस्त तेथे अंतःकरणात आहे आणि म्हणून आपण सर्व वाईट विचार, कुकल्पनांपासून दूर राहावे. कारण जिथे ख्रिस्त आहे तिथे ह्या गोष्टींना जागा नाही. आपण पाहातो की, मनुष्याला बाहेरून जाऊन भ्रष्ट करील असे काहीच नाही तर मनुष्याच्या अंतःकरणातून निघणारे वाईट विचार मनुष्याला विटाळविते. येशू म्हणतो, *जे तोंडातून निघते ते अंतःकरणातून येते व माणसाला विटाळविते. कारण अंतःकरणातूनच दुष्ट कल्पना, खून, व्यभिचार, जारकर्म, चोऱ्या, खोट्या साक्षी, शिवीगाळी ही निघतात. ( मत्तय १५:१८,१९)*
जेव्हा ख्रिस्त आमच्या जीवनात असतो तेव्हा आपोआपच ह्या जगिक गोष्टींपासून आम्ही दूर केले जातो. आमचे अंतःकरण ख्रिस्ताकडे, ख्रिस्ताविषयीच्या गोष्टींकडे लागलेले असते. आमच्या जीवनातील प्रत्येक क्षण आम्ही ख्रिस्ताला दिलेला असतो. प्रत्येक गोष्टींमध्ये प्रथम स्थान ख्रिस्ताला दिलेले असते. आम्ही संपूर्णपणे ख्रिस्तमय झालेले असे दिसून येतो. प्रेषित पौलाप्रमाणे आपले जीवन असावे. पौल म्हणतो, *मी ख्रिस्ताबरोबर वधस्तंभावर खिळलेला आहे, आणि ह्यापूढे मी जगतो असे नाही, तर ख्रिस्त माझ्याठायी जगतो, आणि आता देहामध्ये जे माझे जीवित आहे ते देवाच्या पुत्रावरील विश्वासाच्या योगाने आहे, त्याने माझ्यावर प्रीति केली व स्वतःला माझ्याकरिता दिले. ( गलती २:२०)*
देवापासून विभक्त असलेले जीवन मात्र ह्याउलट असते. तेथे सर्व जगिक गोष्टींचा अंगीकार केलेला दिसून येतो. प्रभूला प्राधान्य न देता जगिक गोष्टींचा उदोउदो करत असलेले असे आणि देवापासून विभक्त असलेले असे अंतःकरण आपणांस पाहावयास मिळते. प्राचीन इस्राएली लोकांची अवस्था अशीच झालेली आपण पाहातो. त्यांच्या ठायी असलेल्या पापांमुळेच त्यांना बंदीवासात जावे लागले. आणि त्यांच्यामुळे देवाचे नाव सर्व राष्ट्रांमध्ये अपवित्र झाले होते. तरीही परमेश्वर त्यांना म्हणत आहे की, *मी तुमचा सर्व अधर्म घालवून तुम्हांस स्वच्छ करीन, तेव्हा नगरे वसतील व पडीत जागा बांधण्यात येतील असे मी करीन. ( यहेज्केल ३६:३३)* परमेश्वराने त्यांना खूप सुंदर अभिवचन देऊन आशीर्वादित केले. प्रभू परमेश्वर म्हणतो, *मी तुम्हांस नवे हृदय देईन, तुमच्या ठायी नवा आत्मा घालीन, तुमच्या देहातून पाषाणमय हृदय काढून टाकीन व तुम्हांस मांसमय हृदय देईन. ( यहेज्केल ३६:२६)* किती सुंदर अभिवचन दिले आहे परमेश्वराने त्यांना !! ज्यांनी देवाच्या सर्व आज्ञा मोडल्या, मूर्तिपूजेच्या मागे लागले त्यांना प्रभूने इतके सुंदर अभिवचन दिले. कारण परमेश्वर खरोखरच आम्हांवर खूप प्रीति करतो. तो आमचे हट्टी, कठीण, सर्व प्रकारच्या दुष्टतेने भ्रष्ट झालेले हृदय काढून टाकून आम्हाला देवाचे ऐकणारे, देवाच्या आज्ञा पाळणारे शुद्ध हृदय देईल आणि त्यासाठी, आम्ही जगीक गोष्टींची नाही तर देवाची इच्छा करणारे असले पाहिजे, देवाचे पवित्र वचन जतन करून ठेवणारे असले पाहिजे. मग परमेश्वर आम्हाला नवीन शुद्ध अंतःकरण देईल. देवाच्या या अद्भूत देणगीबद्दल आम्ही देवाची स्तुती करू या. देवाचे आभार मानू या.
*!!..प्रभू येशू ख्रिस्ताची स्तुती असो..!!*
*
No comments:
Post a Comment