*✨आम्ही कशावर विश्वास ठेवावा✨*
*देवाचा आत्मा तर ह्यावरून ओळखावा, देह धरून आलेल्या येशू ख्रिस्ताला जो जो आत्मा कबुल करितो तो तो देवापासून आहे..✍🏼*
*( १ योहान ४:२ )*
*...मनन...*
*!!..परमेश्वराची स्तुती असो..!!*
योहानाने ह्या अध्यायामध्ये आपण कशावर विश्वास ठेवला पाहिजे आणि कशावर विश्वास ठेवू नये हे अगदी स्पष्टपणे सांगितले आहे. कारण शेवटच्या दिवसांमध्ये अनेक खोटे संदेष्टे ह्या जगामध्ये उठणार आहेत. आणि त्यांची पारख आपल्याला करता यायला पाहिजे ह्यासाठी की कोणी आपल्याला फसवून देवाविरोधात असलेल्या गोष्टी करायला लावू नये.
आपण कशावर विश्वास ठेवला पाहिजे ? वचनाद्वारे पाहू या -
*१) येशू ख्रिस्त देहाने- देह धारण करून आला ह्यावर आपण विश्वास ठेवला पाहिजे -* तो देहधारी प्रभू आहे. तो मानवी देह धारण केलेला देव होता. मानवाच्या पापांसाठी मानवाच्या ऐवजी मरण सोसावे आणि मानवाची पापे स्वदेहाने वधस्तंभावर वाहून न्यावी यासाठी त्याने मनुष्यरूप धारण केले. योहान लिहितो, *शब्द देही झाला आणि त्याने आम्हांमध्ये वस्ती केली आणि आम्ही त्याचे गौरव पाहिले ते पित्यापासून आलेल्या एकूलत्या एकाचे गौरव असावे असे अनुग्रह व सत्य ह्यांनी परिपूर्ण होते. ( योहान १:१४)* जे त्याचे स्वकीय, त्यांनीही त्याच्यावर विश्वास ठेवला नाही, *मी आणि माझा पिता एक आहोत ( योहान १०:३०)* असे त्याने सांगूनही त्यांनी तो देह धारण करून आलेला देव आहे ह्यावर विश्वास ठेवला नाही. आपण असे करू नये म्हणून सावध असा.
*२) आपण ख्रिस्ताच्या देवत्वावर विश्वास ठेवला पाहिजे -* तो देवाचा एकुलता एक पुत्र आहे आणि तो ख्रिस्त आहे, मसीहा आहे असा आपण विश्वास ठेवला पाहिजे, जो हे स्वीकारितो त्याने जगावर जय मिळविला आहे आणि जो हे नाकारितो तो लबाड आहे. जून्या करारात संदेष्ट्यांद्वारे आधीच त्याच्याबद्दल सांगितले होते, भविष्यलेखात सांगितलेला मसीहा तोच आहे. शिमोनाला तर येशू जन्मास आला तेव्हा त्या बाळामध्ये ख्रिस्ताचा साक्षात्कार झाला. तो म्हणतो, *हे प्रभू, तू आपल्या दासाला शांतीने जाऊ देत आहेस, कारण माझ्या डोळ्यांनी तुझे तारण पाहिले आहे. ( लूक २:२९,३०)* अशाप्रकारे आम्हीही त्याच्या देवत्वावर विश्वास ठेवला पाहिजे.
*३) देव प्रीति आहे ह्यावर आपण विश्वास ठेवला पाहिजे -* ख्रिस्ताच्या प्रीतीशी तुलना करता येईल अशी जगामध्ये एकही व्यक्ती नाही. *"देव प्रीति आहे"* ह्या महान सत्यामध्येच प्रीतीचे सामर्थ्य दिसून येते. ख्रिस्ताच्या प्रीतीचे अनेक उदाहरणे आपल्याला बायबल मध्ये पाहावयास मिळतात. त्याने स्वतः प्रीति करून आपल्याला एकमेकांवर, वैऱ्यांवर प्रीति करण्याची आज्ञा केली आहे. *त्याने तुम्हां आम्हांवर प्रीति केली, त्याची प्रीति आपल्या ठायी पूर्णत्व पावली आहे..पहिल्याने त्याने आम्हांवर प्रीति केली म्हणून आपण प्रीति करतो*
*४) ख्रिस्त आमचा तारणारा आहे, ह्यावर आम्ही विश्वास ठेवला पाहिजे -* आमच्या पापांचे प्रायश्चित्त व्हावे आणि आम्ही तारले जावे ह्यासाठी देवाने ख्रिस्ताला पाठविले. *कारण पापाचे वेतन मरण आहे ( रोम ६:२३)* देवाच्या प्रीतीपासून पाप आम्हाला दूर करते. आम्हाला अटकाव करते. ख्रिस्ताने वधस्तंभावर तुमच्याआमच्या पापांची शिक्षा सर्वस्वी स्वतःचे अर्पण करून घेतली. आणि आम्हाला तारण प्राप्त झाले आहे. नियमशास्राप्रमाणे पूर्वी जो बली वारंवार अर्पण करावा लागत असे, तो ख्रिस्ताच्या अर्पणाने एकदाचाच अर्पण करून आमच्यासाठी त्याने प्रायश्चित्त करून कायमची आमची सूटका केली आहे. प्रायश्चित्त आवश्यक आहे. *ख्रिस्ताच्या बलिदानाच्या द्वारेच आम्हाला सार्वकालिक जीवन लाभले आहे*
प्रियांनो, आम्ही भ्रांतीत पडू नये तर ख्रिस्तच आमचा तारणारा आहे, आमचा प्रभू आहे, ह्यावर आम्ही विश्वास ठेवला पाहिजे. योहान आपल्या पत्रात लिहीत आहे की, *जो सत्य आहे त्याला ओळखण्याची बुद्धी त्याने आपल्याला दिली आहे. जो सत्य आहे त्याच्या ठायी, म्हणजे त्याचा पुत्र येशू ख्रिस्त ह्याच्या ठायी, आपण आहों. हाच खरा देव आणि सार्वकालिक जीवन आहे. (१ योहान ५:२०)*
No comments:
Post a Comment