Sunday, 6 December 2020

परीक्षेत पडू नका



            *✨परीक्षेत पडू नका✨*


 *तेव्हा सैतानाकडून येशूची परीक्षा व्हावी म्हणून आत्म्याने त्याला ( प्रभू येशूला) अरण्यात नेले..✍🏼*

                      *( मत्तय ४:१ )*


                           *...मनन...*


           *!!..परमेश्वराची स्तुती असो..!!* 


    अरण्यात सैतानाकडून येशूची परीक्षा झाली. ह्या वचनावरून आपल्याला आठवण होते ती रानामध्ये इस्राएल लोकांच्या झालेल्या परीक्षेची. प्रभू येशूने चाळीस दिवस उपास केला. देवाच्या इच्छेचे, त्याच्या योजना, हेतू, मार्ग यांचे परिपूर्ण पालन करण्याच्या मार्गापासून येशूला दूर न्यावे म्हणून सैतानाने त्याची परीक्षा घेतली. ही परीक्षा येशूच्या कार्यध्येयाच्या पूर्तीसाठी दिव्य उद्देशाने योजिलेली मोहपरीक्षा होती. सैतानाचे सर्व प्रयत्न स्वतःला उंच करून घेण्याच्या मानवी इच्छेला आवाहन करणारे असे होते. परंतु आपण पाहातो की, प्रभू येशूने सैतानाने सुचविलेल्या मोहांना बळी न पडता देवाच्या लिखित वचनांच्या द्वारे सैतानाचे सर्व बेत हाणून पाडले आणि तो देवाच्या वचनाच्या अधीन झाला. सैतानही देवाच्या वचनांचा आधार घेऊन प्रभू येशूला मोहात पाडण्याचा प्रयत्न करीत होता. परंतु सैतानाकडून आलेली प्रत्येक सूचना, प्रत्येक मोह प्रभू येशूने शास्रवचनाच्या आधारेच धूडकावून लावले. प्रभू येशूच्या या अनुभवातून आम्ही कोणते धडे शिकणे आवश्यक आहे ते स्पष्ट होते. आम्हां विश्वासणाऱ्यांची परीक्षा होत असता आम्ही काय करावे, कसे तोंड द्यावे ते यातून आम्हाला शिकता येईल. सैतानाकडून आमची परीक्षा होते तेव्हा आम्ही ख्रिस्ताप्रमाणे देवाच्या अधीन व्हावे, पवित्र वचनाद्वारे त्याचे बेत, त्याच्या योजना हाणून पाडाव्यात. तरच आमचा निभाव लागू शकतो आणि आम्ही ठाम राहू शकतो.


   आमचा सर्वात मोठा शत्रू सैतान हा आहे. त्याच्याबरोबर आमचे आध्यात्मिक युद्ध सतत चालूच असते. त्यासाठी आम्ही सतत तयार असले पाहिजे. इफिस सहाव्या अध्यायामध्ये सांगितल्याप्रमाणे देवाची शस्रसामग्री धारण केली पाहिजे. पवित्र आत्मा आणि देवाच्या पवित्र वचनांचा योग्य उपयोग करून सैतानाला थोपवले पाहिजे. वचनाद्वारे आम्हाला सामर्थ्य प्राप्त होते. देवाच्या वचनाचे वाचन, मनन करून त्याचे आमच्या जीवनात लागूकरण केले पाहिजे. देवाचे वचन आम्ही आमच्या अंतःकरणात साठवून ठेवले पाहिजे. ते तोंडपाठ करून त्यायोगे आमचे मन भरून टाकले पाहिजे. याकोब लिहीत आहे की, *"म्हणून सर्व मलिनता व उचंबळून आलेला दुष्टभाव सोडून, तुमच्या जिवाचे तारण करण्यास समर्थ असे मुळावलेले वचन सौम्यतेने स्वीकारा." ( याकोब १:२१)* पवित्र आत्मा आम्हाला देवाच्या वचनाचे पालन करण्यासाठी प्रेरणा देईल आणि साहाय्य करील. म्हणून प्रियांनो, आम्ही पवित्र आत्म्याला त्यासाठी प्रतिसाद दिला पाहिजे, त्याच्यावर अवलंबून राहिले पाहिजे. मोहाचा सामना करण्यासाठी आणि त्यावर विजय मिळविण्यासाठी पवित्र शास्रातील प्रत्येक उपयुक्त वचनाद्वारे देवाचे साहाय्य घेतले पाहिजे. पवित्र वचनाच्या साहाय्याने त्याला हरवले पाहिजे. सर्वात महत्वाचे म्हणजे आम्ही देवाच्या अधीन व्हावे. 


    

No comments:

Post a Comment