Saturday, 26 December 2020

अतिपवित्र देव



              *✨अतिपवित्र देव✨*


*आणि जे दिसले ते इतके भयंकर होते की, मोशे म्हणाला, ' मी अति भयभीत' व ' कंपित' झालो आहे.. ✍*

                    *( इब्री १२:२१)*


                           *...मनन...*


          *!!..परमेश्वराची स्तुती असो..!!*


    इस्राएल लोकांना देवाने नियमशास्र दिले तेव्हा ते सिनाय पर्वताजवळ राहात होते. देवाने त्यांना प्रगट व्हायचे ठरविले तेव्हा त्याने त्या सर्वांना पवित्र आणि शुद्ध होण्यास सांगितले होते. नंतर आपण पाहातो की, पर्वतावर मेघ उतरले. विजा चमकू लागल्या आणि भूमिकंप झाला. तेव्हा त्यासमयी मोशेला सुद्धा भिती वाटली. परमेश्वर देव हा अतिपवित्र असून तो मनुष्य नाही किंवा मनुष्यांपैकी कोणी नाही. तो अति थोर न महान देव आहे हे इस्राएल लोकांना समजावे म्हणून तो अशाप्रकारे प्रगट झाला. *सर्व सिनाय पर्वतावर धूर पसरला कारण परमेश्वर अग्नीतून त्याच्यावर उतरला. भट्टीच्या धूरासारखा त्याचा धूर वर चढला व सर्व पर्वत थरथरू लागला. शिंगाचा आवाज अधिकच वाढू लागला तेव्हा मोशे बोलू लागला व देव त्याला आपल्या वाणीने उत्तर देत गेला. ( निर्गम १९:१८,१९)* खरोखरच देव किती पवित्र आहे हे आम्ही समजून घेतले पाहिजे. 


    परमेश्वराने ख्रिस्तामध्ये जो नवा करार केला आहे त्याप्रमाणे आपण स्वर्गीय स्थानाकडे आलो आहोत. आपण सियोन पर्वत म्हणजेच जिवंत देवाचे नगर, स्वर्गीय यरूशलेमेत आलो आहोत. तेथे लाखो देवदूत आहेत. ही नगरी देवाच्या खऱ्या मंडळीचे दर्शक आहे. प्रभूच्या मंडळीतील त्याचे सर्व लोक हे स्वर्गीय राज्याचे वारीस आहेत. देव खरा न्यायाधीश आहे आणि तो खऱ्या आणि स्वर्गीय ज्ञानाने सर्वांचा न्याय करील. ते सर्व प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे नीतिमान ठरविण्यांत आले आहेत. परमेश्वराने त्यांच्याबरोबर जो नवा करार केला आहे तो स्थिर आहे. कारण ह्या कराराचा मध्यस्थ स्वतः प्रभू येशू ख्रिस्तच आहे. त्याचे रक्त क्षमेसाठी ओतले गेले आहे. *नव्या कराराचा मध्यस्थ येशू, आणि शिंपडण्याचे रक्त ह्यांच्याजवळ आला आहात, त्या रक्ताचे बोलणे हाबेलाच्या रक्ताच्या बोलण्यापेक्षा उत्तम आहे. ( इब्री १२:२४)* हाबेलाचे रक्त हे *'न्याय कर'* अशी हाक मारते, तर ख्रिस्ताचे रक्त *'क्षमा कर '* अशी हाक मारते. 


    देवाने सिनाय पर्वतावरून इस्राएल लोकांना आज्ञा दिल्या होत्या. त्यांनी त्या मानल्या नाहीत त्यामुळे देवाचा क्रोध त्यांच्यावर पडला व अविश्वास आणि आज्ञाभंग ह्यामुळे हजारोंचा रानात नाश झाला. देवाने ख्रिस्ताला ह्या जगात पाठविले व तो त्याच्याद्वारे आमच्याबरोबर बोलत आहे. *तो ह्या काळाच्या शेवटी पुत्राच्या द्वारे आपल्याशी बोलला आहे, त्याने त्याला सर्व गोष्टींचा वारीस करून ठेविले आणि त्याच्याद्वारे त्याने विश्व निर्माण केले. ( इब्री १:२)* आणि पूढे असेही म्हटले आहे की, जे प्रभू येशू ख्रिस्ताचे ऐकणार नाहीत त्यांचा निभाव लागणार नाही. *कारण पृथ्वीवर आज्ञा सांगणाऱ्यांचा अवमान करणारे जर निभावले नाहीत, तर स्वर्गातून आज्ञा सांगणाऱ्यांपासून बहकल्यास आपण विशेषेकरून निभावणार नाही. ( इब्री १२:२५)*


    परमेश्वर इस्राएलाशी बोलला तेव्हा पर्वत थरथरले व देवाचे गौरव प्रगट झाले. आणि पृथ्वी किती अस्थिर किंवा हलणारी आहे हे त्यांना समजले. परमेश्वराचा क्रोध ह्या जगावर येईल तेव्हा आकाशातील ग्रह व तारे हेसुद्धा कंपायमान होतील. कारण सेनाधीश परमेश्वर म्हणतो, *आणखी एकदा लवकरच मी आकाश व पृथ्वी, समुद्र व कोरडी जमीन, ही हलवून सोडीन. ( हाग्गय २:६)* प्रियांनो आम्ही ख्रिस्ताच्या वाणीकडे लक्ष दिल्यामुळे कधीही न हलणाऱ्या, स्थिर अशा देवाच्या राज्यात आलो आहोत म्हणून देवाचे उपकार मानू या. देवाने आपल्याला सोपविलेली जबाबदारी म्हणजेच देवाची सेवा, त्याचे आदरयुक्त भय धरून त्याची सेवा करूया. जेणेकरून देवाला संतोष होईल अशाप्रकारे आमचे आचरण असावे..  *सदासर्वकाळ आमच्या विश्वासाचा उत्पादक व पूर्ण करणारा प्रभू येशू त्याच्याकडे सदैव पाहात राहू या.*

 

*देवाच्या दृष्टीने त्याला संतोष देणारे जीवन जगण्यास स्वतः प्रभू आम्हाला साहाय्य करील.*


      

No comments:

Post a Comment