*✨देव अनुकुल आहे.. तर..?✨*
*ख्रिस्ताच्या प्रीतीपासून आपल्याला कोण विभक्त करील ? क्लेश, आपत्ती, छळणूक, उपासमार, नग्नता, संकट किंवा तरवार ही विभक्त करतील काय ?..✍*
*( रोम ८:३५)*
*...मनन...*
*!!..परमेश्वराची स्तुती असो..!!*
ख्रिस्तामध्ये आम्ही सुरक्षित आहोत याचे सुंदर वर्णन पौलाने केले आहे. ह्या शास्रपाठातून पौलाला सांगायचे आहे की, आमच्या जीवनात कितीही संकटे, दुःखे, हालअपेष्टा आली तरी ती आम्हां विश्वासणाऱ्यांना ख्रिस्तापासून, ख्रिस्ताच्या प्रीतीपासून विभक्त करू शकत नाही. याउलट ही संकटे आम्हाला ख्रिस्ताच्या आणि आमच्यासाठी असलेल्या त्याच्या योजनांच्या, उद्दिष्टांच्या जवळ आणण्यास कारणीभूत होतात. देवाने आपल्या योजनेनुसार प्रत्येक विश्वासणाऱ्याला, नवीन जन्म पावलेल्या व्यक्तीला बोलाविले आहे. देवाच्या लेकरांना वेगवेगळ्या प्रकारच्या अत्यंत कठीण परिस्थितीमधून जावे लागते. परंतु देव सदैव आमच्याबरोबर आहे. सर्व गोष्टींवर त्याचे नियंत्रण आहे. आपले विचार, बोलणे व आचरण हे ख्रिस्ताच्या विचाराप्रमाणे, बोलण्याप्रमाणे, त्याच्या आचरणाप्रमाणे घडून यावेत ही देवाची योजना आहे. आम्ही कधीही ख्रिस्ताच्या प्रीतीच्या कक्षेबाहेर जाऊ शकत नाही. ख्रिस्तावरील विश्वासाच्या द्वारे जे नीतिमान ठरवले गेले आहेत आणि जे त्याच्याशी एकनिष्ठ राहातात, विश्वासू राहतात त्यांच्याबद्दल पौल लिहितो, *"देवाच्या निवडलेल्या लोकांवर दोषारोप कोण ठेवील ? देवच नीतिमान ठरवणारा आहे." ( वचन ३३)* आम्ही जर ख्रिस्ताचे निवडलेले आहोत, ख्रिस्ताच्या जवळ आहोत तर...
*१)देव आपणांला अनुकुल असल्यास आपणांला प्रतिकूल कोण ? ( वचन ३१)* जेव्हा देव आमच्या बाजूला आहे तर आमच्यावर विजय मिळवू शकेल असा कोणता शत्रू आहे ? देवाने स्वतः आमचे तारण योजिले, आणि तो स्वतःच आमचे कल्याण व्हावे म्हणून कार्य करीत आहे व आम्हाला गौरवात नेण्यास समर्थ आहे तर तो आमच्या बाजूला असल्यामुळे आमचे शत्रू आमच्यावर विजय प्राप्त करू शकत नाही. कारण तो आमचा उत्तम मेंढपाळ आहे. ( स्तोत्र २३ वाचा) देवाने आपला पुत्र आम्हांकरिता दिला आणि त्यातून त्याच वेळी या जीवनातून पार होण्यासाठी आणि अंतिम तारण प्राप्त होण्यासाठी जे जे आवश्यक ते ते आम्हाला उपलब्ध करून दिले. ह्यावरून देवाच्या आमच्यावरील प्रीतीची आम्हाला खात्री पटते. त्याची प्रीति सर्वश्रेष्ठ आहे. आणि ही प्रीति आम्हाला उत्तम ते देईलच देईल. ह्याची आम्हाला खात्री आहे. वचन सांगते, *ज्याने आपल्या स्वतःच्या पुत्रास राखून न ठेवता त्याला आपणां सर्वांकरिता समर्पण केले, तो त्याच्याबरोबर आपल्याला सर्व काही कसे देणार नाही ? ( वचन ३२)* देव जे काही करितो आणि देवाच्या सर्व योजना त्याच्या लेकरांच्या कल्याणासाठीच असतात.
*२) आपणाला दोषी ठरवू शकेल असा कोण आहे ?* देवाने स्वतः आपल्याला निर्दोष असे ठरविले आहे. परंतु सैतान आमच्यातील दोष दाखविण्याचा प्रयत्न करत असतो, त्याचे तेच काम आहे. प्रकटीकरणाच्या पुस्तकात आपण पाहातो, जेव्हा दियाबल, म्हणजेच सैतान व त्याच्या दूतांना खाली पृथ्वीवर टाकण्यात आले, तेव्हा स्वर्गात मोठी वाणी ऐकू आली, *आमच्या बंधूंना 'दोष देणारा', आमच्या देवासमोर 'रात्रंदिवस त्यांच्यावर दोषारोप करणारा' खाली टाकण्यात आला आहे. ( प्रकटी १२:१०)* पण जगाचा न्यायाधीश देव आहे. त्याने ख्रिस्तामध्ये आपल्याला नीतिमान ठरविलेच आहे. ( रोम ५:१) सैतान आरोप करितो, तरी *न्याय करण्याचा अधिकार केवळ ख्रिस्ताला आहे. ( योहान ५:२२)* ख्रिस्ताने तर आम्हाला निर्दोष ठरविता यावे ह्यासाठी मरण पावला आणि देवाच्या उजवीकडे बसून आमच्यासाठी मध्यस्थी करीत आहे. ( इब्री ७:२५)
*३) ख्रिस्तापासून वेगळे करील असे कोण आहे किंवा अशी एखादी गोष्ट आहे का ?* इतके बलशाली किंवा समर्थ काहीच नाही, कोणीच नाही. जे खरोखरच ख्रिस्ताशी एकनिष्ठ आहेत, त्यांच्यावर कितीही कठीण परिस्थिती आली, संकटे आली तरी त्या परिस्थितीला ते धैर्याने तोंड देतात, परमेश्वर त्यांना सामर्थ्य पुरवतो. पेत्र म्हणतो, *ह्याचकरिता तुम्हांस पाचारण करण्यात आले आहे, कारण ख्रिस्तानेहि तुम्हांकरिता दुःख भोगले आणि तेणेंकरून तुम्ही त्याच्या पावलांवर पाऊल ठेवून चालावे म्हणून त्याने तुम्हांकरिता कित्ता घालून दिला आहे. ( १ पेत्र २:२१)* ज्याने आम्हांवर प्रीति केली, त्याच्या योगे सर्व दुःख, संकटात आपण विजयी ठरतो. देवाच्या प्रीतीपासून आम्हाला विभक्त करणे कोणत्याही शक्तीला शक्य नाही.
प्रियांनो, आम्ही आमच्या अडचणीत, संकटात देवाकडे आपले लक्ष लावू या. आणि त्याच्या महान प्रीतीवर विश्वास ठेवू या त्याबद्दल देवाची स्तुती करू या. आपल्याला देवाच्या प्रीतीपासून वेगळे करू पाहणाऱ्या अनेक गोष्टी सैतान आपल्या मनात घालीन, आम्हाला निराश करण्यासारख्या गोष्टी आमच्या जीवनात घडतील, परंतु ह्या सर्व गोष्टी देवासमोर अतिदुर्बल आहेत. देवाच्या आमच्यावरील प्रीतीपासून त्या आम्हाला क्षणभरही दूर करू शकत नाहीत हे आम्ही कायम लक्षात ठेवावे. देवावरील विश्वासामध्ये आम्ही स्थिर आणि अढळ राहावे.
No comments:
Post a Comment