Thursday, 24 December 2020

ख्रिसमस, ख्रिस्तजन्मदिन का खिस्तजयंती?

 *ख्रिसमस, ख्रिस्तजन्मदिन का खिस्तजयंती?*




ह्या वर्षी दोघांनी मला ह्या विषयावर प्रश्‍न विचारले. एक बंधू म्हणाले की, ‘‘ख्रिस्तजयंती या शब्दावर दरवर्षी वाद निर्माण होतात. कारण प्रचलित अर्थानुसार जयंती ही फक्त मृत व्यक्तीच्या संदर्भात वापरतात. टिळकांनी हा शब्द वापरून चूक केली का?’’ दुसर्‍या एका बहिणीने विचारले, ‘‘ख्रिस्तजन्मदिन का ख्रिस्तजयंती कोणता शब्द बरोबर आहे?’’ तेव्हा येशू ख्रिस्ताच्या जन्मानिमित्त आपण जो उत्सव साजरा करतो त्यासाठी नेमक्या कोणत्या शब्दाचा वापर करावा याविषयी मी माझे वैयक्तिक मत मांडतो. प्रथम आपण जयंती शब्दाचा शब्दकोशातील अर्थ पाहू :


*जयंती*


‘अवतारी पुरुषाच्या जन्मदिवसाचा समारंभ’ - मराठी शब्दरत्नाकर

‘देव किंवा साधुसंत यांच्या जन्मतिथीचा उत्सव’ - मराठी व्युत्पत्ती कोश

‘देवाची, पुण्यपुरुषाची अथवा थोर पुरुषाची जन्मतिथी; त्या दिवसाचा उत्सव; वाढदिवस’ - अभिनव मराठी-मराठी शब्दकोश.


आता २५ डिसेंबर ही येशूची जयंती आहे काय ते आपण पाहू :


सर्वप्रथम आपण हे लक्षात घेऊ या की, २५ डिसेंबर ही येशूची जन्मतारीख नाही. येशूचा जन्म कधी झाला याविषयी कोणालाच निश्‍चित ठाऊक नाही. त्यामुळे २५ डिसेंबरला ‘ख्रिस्तजन्मदिन’ म्हणता येत नाही. ती लबाडी होईल आणि कोणत्याही असत्यावर ख्रिस्ती सत्याची उभारणी करता येत नाही.


दुसरी गोष्ट, २५ डिसेंबरला ‘ख्रिस्तजयंतीही’ म्हणता येणार नाही. कारण येशू हा आदी आणि अंत आहे. तो सर्वगुणसंपन्न परमेश्‍वर आहे. त्यामुळे जन्ममरण ह्या मानवी कल्पना त्याला लागू होत नाही. त्याची जयंतीही पाळता येत नाही. जयंती पाळली तर पुण्यतिथीही पाळावी लागेल. त्यामुळे २५ डिसेंबरला त्याची जयंती म्हणणे ही मानवी कल्पना आहे. लोकांनी अनंतकालिक देवाला मानवनिर्मित कल्पनेच्या चौकटीत बसवलेले आहे.


तिसरी गोष्ट, २५ डिसेंबरला ‘ख्रिसमस’ म्हणणेही बरोबर नाही. ख्रिसमस हा शब्द ख्राईस्ट + मास अशा दोन शब्दांपासून तयार झाला आहे. ख्रिस्त म्हणजे अभिषिक्त. हा ग्रीक शब्द आहे जो मूळ हिब्रू शब्द मशीहापासून आलेला आहे. आणि मास शब्दाचा अर्थ आहे रोमन कॅथलिकांचा ख्रिस्ताच्या मरणाच्या स्मरणार्थ केला जाणारा प्रभुभोजनाचा विधी. म्हणून ख्रिसमस म्हणजे ख्रिस्ताच्या जन्माच्या स्मरणार्थ केलेले प्रभुभोजन असा त्याचा अर्थ आहे, त्यात येशूच्या जन्माचा काही उल्लेख येत नाही. उलट मरणाच्या स्मरणार्थ विधी केला जातो.


*ख्रिस्तजन्मोत्सव हाच योग्य शब्द*


आपण पाहिले की २५ डिसेंबर येशूच्या जन्माची तारीख नाही, तरी त्या तारखेला आपण येशूच्या जन्माची आठवण करून उत्सव साजरा करतो. त्यामुळे त्याला ‘ख्रिस्तजन्मोत्सव’ म्हणणेच योग्य ठरेल असे मला वाटते. इतर शब्दांमुळे जे प्रश्‍न उपस्थित केले जातात ते या शब्दाने होत नाहीत.


पण जर खरी तारीख तुम्हांला ठाऊक नाही तर कशाला ख्रिस्तजन्मोत्सव साजरा करता? बायबलमध्ये तसे काही सांगितलेले नाही. खरे तर तुम्ही रोमी लोकांचा सण साजरा करता असे काही जण आक्षेप घेतात.


आता २५ डिसेंबर ही येशूच्या जन्माची तारीख नाही हे आपणांस मान्य आहे. तसेच ऐतिहासिक दृष्ट्या ती रोमी लोकांच्या एका सणाची तारीख होती हेही खरे आहे. पण येशू जन्मला हे सत्य पवित्र शास्त्रात दिले आहे. ते नाकारता येत नाही. तो आमच्यासाठी जन्मला ह्याचा आम्हाला आनंद वाटतो आणि त्यासाठी आम्हांला एखादा दिवस नेमून त्याच्या जन्माचा उत्सव साजरा करायचा असेल तर काय हरकत आहे?


संत पौल रोमकरांस पत्रात म्हणतो की, ‘‘कोणी माणूस एखादा दिवस दुसर्‍या दिवसापेक्षा अधिक मानतो. दुसरा कोणी सर्व दिवस सारखे मानतो. तर प्रत्येकाने आपल्या मनाची पूर्ण खातरी करून घ्यावी. जो दिवस पाळतो, तो प्रभूकरता पाळतो, आणि जो पाळीत नाही तो प्रभूकरता पाळत नाही; आणि जो खातो तो प्रभूकरता खातो, कारण तो देवाचे आभार मानतो; जो खात नाही, तो प्रभूकरता खात नाही, आणि तोही देवाचे आभार मानतो. कारण आपल्यातील कोणी स्वतःकरता जगत नाही आणि कोणी स्वतःकरता मरत नाही’’ (रोम.१४ः५-७). तेव्हा आपणांस रोमी लोकांच्या सणाच्याच दिवशी जर ख्रिस्ताच्या जन्माची आठवण करायची असेल, तर त्याला कोणी हरकत घेता कामा नये. मात्र आपण तो दिवस ‘प्रभूकरता’ पाळावा. त्याच्या वचनाच्या विरुद्ध इतर कोणत्याही विपरीत गोष्टी करून आपण त्याला खिन्न करू नये. त्या दिवशी आपण त्याची भक्ती करावी. तो दिवस त्याच्या जन्माविषयी व तत्संबंधी घडलेल्या गोष्टी बोलण्यात घालवावा. त्याच्या जन्माविषयी ख्रिस्तीतरांना सुवार्ता सांगावी. आणि त्याच्या जन्माचा उत्सव पाळत असताना मंडळीतील व मंडळीबाहेरील गोरगरिबांचीही आठवण ठेवावी. 


ह्या बंधुभगिनींच्या प्रश्‍नांची उत्तरे दिल्यावर त्या बंधूने दुसरा प्रश्‍न विचारला, ‘‘अवतार व देहधारण यात फरक काय?’’ चला तर, तेही आपण पाहू :


*अवतार*


उपासना संगीतात एका गाण्यात ‘देवाचा अवतार पाहिला देवाचा अवतार’ असे कवी म्हणतो. पण येशू हा देवाचा अवतार नव्हता. पवित्र शास्त्रात कुठेच ‘अवतार’ हा शब्द वापरला नाही, तर येशूने ‘देहधारण’ केले असे म्हटले आहे. ‘‘शब्द देही झाला व त्याने आमच्यामध्ये वस्ती केली, आणि आम्ही त्याचे गौरव पाहिले. ते पित्यापासून आलेल्या एकुलत्या एकाचे गौरव असावे असे अनुग्रह व सत्य ह्यांनी परिपूर्ण होते.’’

येशूच्या देहधारणाची ही कल्पना अवतारापेक्षा अनेक बाबतीत भिन्न आहे :


१. ख्रिस्तीतरांत अवतार म्हणजे अनेक देवदेवतांनी वेळोवेळी घेतलेले मानवी किंवा पशुपक्ष्यांचे जन्म आहेत. पण आदी व अंत असणाऱ्या येशूने एकदाच देहधारण केलेले आहे.


२. ख्रिस्तीतरांत दुष्टांचा व दुष्ट प्रवृत्तींचा संहार करून धर्माची पुनःस्थापना करण्यासाठी अवतार घेतले जातात. पण येशूने जे देहधारण केले ते दुष्टांचा संहार करण्यासाठी नाही, तर दुष्टांवर प्रीती करण्यासाठी केले. तो म्हणतो, ‘‘मी तर त्यांना जीवनप्राप्ती व्हावी व ती विपुलपणे व्हावी म्हणून आलो आहे’’ (योहान.१०ः१०). तसेच त्याने ठरावीक देशातील, किंवा ठरावीक लोकांसाठी हे देहधारण केले नाही तर हे सर्व मानवजातीसाठी केले. योहान म्हणतो, ‘‘दुसर्‍या दिवशी येशूला आपणाकडे येताना पाहून तो (योहान) म्हणाला, हा पाहा, जगाचे पाप हरण करणारा देवाचा कोकरा!’’ (योहान.१ः२९). त्याला सर्व मानवजातीच्या पापांचा दंड चुकता करायचा होता. त्यांच्या पापासाठी त्याला प्रायश्‍चित्त घ्यायचे होते. त्यासाठी जे निर्दोष व निष्कलंक रक्त हवे होते ते त्याने दिले व सर्व मानवजातीसाठी मुक्तीचा मार्ग मोकळा केला.


३. ख्रिस्तीतरांत अवतार हे स्त्रीपुरुषांच्या किंवा देवदेवता व स्त्रिया यांच्या लैंगिक संबंधातून निर्माण झाले. पण येशूने केलेले देहधारण हे लैंगिक संबंधातून झालेले नाही. त्याची आई मरीया ही कुमारी असताना देवाच्या आत्म्याच्या सामर्थ्याने गरोदर राहिली. हे यासाठी झाले की, येशू जे प्रायश्‍चित्ताचे रक्त मानवजातीच्या पापासाठी वधस्तंभावर सांडणार होता, ते निर्दोष व निष्कलंक असायला हवे होते. येशू स्त्रीपुरुषाच्या संबंधातून जन्मला असता, तर आद्य मातापिता आदाम व हव्वा यांचा पापी स्वभाव घेऊन जन्मला असता व प्रायश्‍चित्तासाठी पापी स्वभावाच्या पुरुषाचे पापी रक्त देवाने मान्य केले नसते. तेव्हा देवानेच त्याला कुमारीपासून जन्माला घालण्याची योजना आखली व ती पूर्णत्वास नेली.


४. इतर अवतार आधी मानव होते. पण त्यांच्या चमत्कारी कृत्यांमुळे त्यांना देव मानले गेले. तरी ते देवासारखे परिपूर्ण, सर्वगुणसंपन्न नव्हते. त्यांच्या हातून चुका होत होत्या. एवढेच नव्हे तर ते दैहिक वृत्तीने वागत, खोटे बोलत, चोरी करीत, लैंगिक पापे करीत. पण त्यांच्या अनुयायांनी त्यांच्या पापांचेही उदात्तीकरण केले. तसे येशूचे नव्हते. येशू हा परिपूर्ण देव होता व परिपूर्ण मानव होता. त्याच्या हातून एकही पाप झाले नाही. तो म्हणतो, ‘‘तुमच्यापैकी कोण मला पापी ठरवतो’’ (योहान.८ः४६).


५. सर्व अवतारांचा शेवट मृत्यूत झाला. ते मरणातून परत जिवंत झाले नाहीत. पण येशू मानवजातीच्या पातकांसाठी वधस्तंभावर जरी मृत्यू पावला, तरी तो तिसर्‍या दिवशी मृत्यूवर विजय मिळवून पुन्हा जिवंत झाला. एवढेच नाही तर पृथ्वीवर ४० दिवस राहून तो सर्वांदेखत सदेह स्वर्गात गेला.


६. ख्रिस्तीतरांत येथून पुढे अवतार येतच राहतील. पण येशूचे देहधारण एकदाच झाले आहे. ते पुनःपुन्हा होणार नाही. आता येशू आपल्याला घ्यायला येईल, तेव्हा तो पुनरुत्थित झालेल्या गौरवी शरीराने येणार आहे.

हा ख्रिस्ती विश्वास आहे. ही ख्रिस्ती आशा आहे की, जसा तो पुनरुत्थित झाला तसे त्याच्यावर विश्‍वास ठेवून त्याला आपला तारणारा म्हणून स्वीकरणारेही पुनरुत्थित होतील व देवासह सदासर्वकाळ जिवंत राहतील!


तेव्हा वाचकांनो, आपले मेल्यानंतर काय होईल ह्याची आपणांस खातरी नसेल, तर येशूवर विश्‍वास ठेवा. त्याला आपला तारणारा व प्रभू म्हणून स्वीकारा. तो तुम्हांला हमखास नरकापासून वाचवून स्वर्गातील अनंतकालिक जीवनात नेईल. कारण दुसऱ्या कोणत्याही अवताराने तुमचा उद्धार व्हावा म्हणून स्वतःचे बलिदान केलेले नाही... आणि पापांत राहणारे कोणीही, मग ते अवतार का असेनात, पापी लोकांचा उद्धार करू शकत नाही. 


●●●

No comments:

Post a Comment