Thursday, 3 December 2020

सुरुवात जरी लहान पण परिणाम महान

 *लूक १६: १०-१२*


     *सुरुवात जरी लहान*

                   *पण*

        *परिणाम महान* 

  

    *जो अगदी थोडक्याविषयी विश्वासू  तो पुष्कळाविषयीहि विश्वासू आहे. आणि जो थोडक्या विषयी अन्यायी तो पुष्कळाविषयीहि अन्यायी आहे.* *लूक १६:१०*.


       लहान सहान वाटणाऱ्या गोष्टी किती महत्वाच्या असतात ही पुढील उदाहरणावरून लक्षात येते. " एक लहान खिळा मिळाला नाही ,त्यामुळे घोड्याला नाल ठोकता आलीं नाही, म्हणून सैनिकाला घोडा मिळाला नाही , घोडा नाही म्हणून युद्धासाठी सैनिक मिळाला नाही, सैनिक मिळाला नाही म्हणून राजा मोठे युध्द हरला. राजा मोठे युध्द का हरला तर एक लहानसा खिळा घोड्याला नाल ठोकायला मिळाला नाही म्हणून !!! थोडक्यात काय तर खिळा जरी लहान वस्तू होती तरी ती नसल्याने मोठा पराभव झाला. 

 प्रभू येशु ख्रिस्ताच्या दृष्टीने लहान किंवा थोडक्या गोष्टीना फार महत्व आहे. *लहान गोष्टीपासून सुरुवात केल्यानेच सेवा फलदायी होते*. जर ह्याच लहान गोष्टीकडे क्षुल्लक समजून दुर्लक्ष केले तर सेवा फलदायी होत नाही. मोशेकडे एक सामान्य काठी गुरे राखण्यासाठी होती, परमेश्वर म्हणाला "तुझ्या हातात काय आहे?",  "काठी आहे प्रभु" मोशे उत्तरला , देव म्हणाला "ती खाली टाक." त्याने टाकली तिचा साप झाला , देव पुन्हा म्हणाला "आता शेपटीला धरून उचल". त्याने उचलली तो ती पुन्हा काठी झाली. *पण आता मात्र ती काठी ही देवाची काठी झाली.* 

त्यामुळे इस्राएल राष्ट्राला मोशेने परमेश्वराच्या सामर्थ्याने गुलामगिरीतुन बाहेर काढले . पाच लहानसे गोटे दावीदाकडे होते , पण त्या लहान गोट्यांच्या उपयोगाने बलाढ्य गल्याथ मारला गेला. *लहानशी अलाबास्त्र कुपी मरियेने येशूच्या पायावर ओतली , तो परमाळणारा गंधोत्सव सर्व  जग आज लूटत आहे, प्रभू येशूच्या वचनानुसार !!* 

     प्रभू येशूसाठी कार्य हे छोट्या गोष्टी पासूनच सुरू केले पाहिजे. *आम्हाला एकदमच मोठ्या गोष्टी करायला पाहिजे असतात.. एका व्यक्तीला किंवा एका कुटुंबातील लोकांना सुवार्ता सांगायला कमीपणा वाटतो. मोठे चर्च हवे असतात संदेश देण्यासाठी. कार्य करण्यासाठी. जेव्हा ही प्रवृत्ती असते तेव्हा कार्य होत नाही. दुसऱ्याशी तुलना करायलाच नको. त्याने अपयशच हाती येते. *समस्या ही नाहीच  की दुसरे जे करतात ते आम्ही करू शकत नाही तर समस्या ही आहे की, जे आम्ही करू शकतो तेच करीत नाही!* 

कारण लहान सहान गोष्टी करायला कमीपणा वाटतो. 

*देवाला आमचा उपयोग करून घ्यायचा आहे पण देव करीत नाही कारण लहान किंवा थोडक्या आम्हाला करता येणाऱ्या गोष्टी करण्यात आपल्याला रसच नसतो.* 

एका ठिकाणी प्रभू येशू म्हणतो *या लहानातील एकाला तुम्ही फक्त एक पेलाभर पाणी प्यायला दिले तर तुम्ही प्रतिफळाला मुकणारच नाही*. 

   *पेलाभर पाणी देणे ही लहान जरी वाटली तरी ती प्रतिफळ मिळवून देणारी सेवा आहे* .जर प्रभूपासून प्रतिफळाचीअपेक्षा आहे तर प्रभूच्या कार्याला छोट्या गोष्टी पासूनच सुरुवात करू. त्याच पुढे जाऊन मोठं स्वरूप धारण करतात. महान जे सेवक प्रभूचे होऊन गेले त्यांच्या सेवेची सुरुवात छोट्या छोट्या गोष्टीतूनच झाली, कष्ट घेतले त्यांनी हाल सोसले, तेव्हा कोठे ते महान सेवक झाले. *स्वतः प्रभूने बारा शिष्यापासून सुरुवात केली आज जगभर करोडो लोक प्रभू येशूचे शिष्य आहेत*. *प्रभूची जर सुरुवात थोडक्या पासून होती तर मग आपल्याला का कमीपणा वाटावा ?*

     *दयाघन ईश्वरा तुझ्या सेवेची सुरुवात थोडक्यातून करण्यास आमचे सहाय्य कर आणि ही सेवा फलद्रुप कर .*

                *आमेन*

      

No comments:

Post a Comment