*✨कृपेमुळे विश्वासाने नीतिमान✨*
*परंतु देवाच्या अभिवचनाकडे पाहून तो अविश्वासामुळे डळमळला नाही तर विश्वासाने सबळ होऊन त्याने देवाचे गौरव केले...✍*
*( रोम ४:२०)*
*...मनन...*
*!!..परमेश्वराची स्तुती असो..!!*
देवाने पापी माणसाला निर्दोष ठरविण्यासाठी ख्रिस्ताला ह्या जगात पाठविले, ह्यासाठी की ख्रिस्ताने त्यांच्यासाठी प्रायश्चित्त असे व्हावे. ख्रिस्तावरील विश्वासाने पापी नीतिमान ठरतो. ख्रिस्तावर विश्वास ठेवणारा नियमशास्रातील कर्मांवाचून नीतिमान ठरतो. यहूदी लोकांचा पूर्वज असा जो अब्राहाम, त्याला जिवंत देवाने स्वतःला प्रगट केले आणि त्याला आज्ञा व अभिवचने दिली. त्याला दर्शन देऊन परमेश्वराने म्हटले, *तूं आपला देश व नातलग सोडून मी तुला दाखवीन त्या देशात चल. ( प्रे. कृत्ये ७:३)* आणि अब्राहामाने देवाची आज्ञा पाळली. आणि आपण पाहातो की, पूढे परमेश्वराने अब्राहामाला खूप आशीर्वादित केले.
पवित्र शास्रामध्ये आपण पाहतो की, अब्राहाम शंभर वर्षांचा झाला होता आणि साराचे गर्भाशय निर्जिव होऊनही, परमेश्वराने त्यांस *आकाशातील ताऱ्यांइतकी तुझी संतती असेल,* असे अभिवचन दिले आणि काहीही आशा शिल्लक उरलेली नसतानाही अब्राहामाने आशेने त्यावर विश्वास ठेवला. शास्र सांगते, *अब्राहामाने देवावर विश्वास ठेवला आणि ते त्याला नीतिमत्व असे गणण्यात आले. ( रोम ४:३)* त्याचा परमेश्वरावर इतका विश्वास होता की, *दिलेले वचन पूर्ण करण्यास परमेश्वर समर्थ आहे अशी त्याची पक्की खात्री होती. ( रोम ४:२१)* ख्रिस्ताचे नीतिमत्व आमच्याकडे मोजण्यात येते. आणि मानवाला देवासमोर नीतिमान ठरविण्यांत येते. *मनुष्य सत्कर्मे केल्यामुळे नीतिमान ठरत नाही, तर ख्रिस्तावर विश्वास ठेवल्याने नीतिमान ठरतो. ( रोम ३:२८)*
आमचे तारण विश्वासाच्या द्वारे होते, म्हणून आम्ही ख्रिस्तावर संपूर्ण भरंवसा ठेवून विश्वासाने जगले पाहिजे. ख्रिस्ती जीवनामध्ये विश्वासाला खूप महत्व आहे. एखादी गोष्ट आपण परमेश्वराजवळ ती मागण्याअगोदरच मला मिळाली आहे असा विश्वास ठेवून मागितली तर, परमेश्वर नक्कीच आपली मागणी पूर्ण करतो. अब्राहामाच्या विश्वासाबद्दल अनेक उदाहरणे आपल्याला बायबल मध्ये पाहावयास मिळतात. अब्राहामाला विश्वासाच्या द्वारे तीन गोष्टी मिळाल्या, *नीतिमत्व, वतन आणि संतान. ( रोम ४:३,१३,१७)* त्याच्या कृपेने नीतिमान ठरल्यानंतर आम्हालाही मोठे लाभ मिळतात. *कृपा म्हणजे पात्रता नसताना झालेली मेहेरबानी* ह्या जीवनात विश्वासाच्या बरोबरीने आम्हाला परमेश्वराकडून शांती, क्षमा आणि अभिवचन ही मिळतात. ( रोम ५:१५) आणि त्यापेक्षाही महत्वाचे म्हणजे आम्हाला *तारणाची खात्री* मिळते. ( रोम ५:६ ते ११) म्हणून प्रियांनो, आपणही आपल्या अंतःकरणात असा विश्वास ठेवला पाहिजे की परमेश्वरावर विश्वास ठेवणाऱ्याला तो कधीच लज्जित होऊ देणार नाही. विश्वासाद्वारे तो सर्व काही पूरवून देण्यास समर्थ आहे. त्याच्यासाठी अशक्य असं काहीच नाही.
देव एखाद्या व्यक्तीला नीतिमान ठरवितो म्हणजे नेमके काय करतो ते वचनाद्वारे पाहू या -
*१) त्याच्या अपराधांची क्षमा करतो. ( कलस्सै २:१३) त्याच्या पापांची क्षमा करतो म्हणजेच सर्व पापांपासून त्याला मुक्त करतो. ( इफिस १:७)*
*२) त्याच्या पापांवर पांघरूण घालतो. त्याच्या पापांबद्दल देव त्याला कधीच शिक्षा करणार नाही. ( रोम ८:१) त्यांची पापे तो पुन्हा आठवणारच नाही. ( इब्री १०:१७,१८)*
*३) त्याच्या हिशेबी त्याने केलेल्या पापांची यादी नाही. आपल्या सर्व पापांची क्षमा आपल्याला मिळाली आहे. ( कलस्सै १:१४)*
*अशाप्रकारे नीतिमान ठरलेला मनुष्य किती धन्य आहे !!*
*
No comments:
Post a Comment