Wednesday, 30 December 2020

अजून कोठवर ?



            *✨अजून कोठवर ?✨*


 *हे परमेश्वरा, तू मला कोठवर विसरणार ? सर्वकाळ काय ? तू माझ्यापासून आपले मुख कोठवर लपवणार ?..✍🏼*

                   *( स्तोत्र १३:१ )*


                           *...मनन...*


           *!!..परमेश्वराची स्तुती असो..!!* 


    "कोठवर ?" असा प्रश्न कधी ना कधी आपल्या सर्वांनाच पडतो. कोठवर ? हा प्रश्न यशया आणि हबक्कुक या देवाच्या विश्वासू संदेष्ट्यांनीही विचारला. ( यशया ६:११, हबक्कुक १:२) त्याचप्रमाणे आमच्या प्रभू येशू ख्रिस्तानेही लोकांच्या अविश्वासू असण्याबद्दल म्हटले, *"हे विश्वासहीन व कुटिल पिढी ! मी कोठवर तुम्हांबरोबर असू ? कोठवर तुमचे सोसू ?" ( मत्तय १७:१७)* कशामुळे आम्हाला असा प्रश्न पडतो ? कदाचित अन्याय, दीर्घकाळ चालू असणारे आजारपण, वाढत्या वयातील वेगवेगळ्या समस्या, आसपासच्या लोकांच्या वागण्यातील चुकीची प्रवृत्ती पाहून निराश झाल्यामुळे इत्यादि अनेक गोष्टी आपल्या समोर समस्या बनून उभ्या असतात. परंतु आमचा भरवंसा आमच्या देवावर असला पाहिजे दाविद राजाप्रमाणे. आम्ही अशावेळी धीर धरून परमेश्वराची वाट पाहिली पाहिजे. याकोब लिहीतो, *"माझ्या बांधवांनो, प्रभूच्या उपस्थितीपर्यंत धीर धरा." ( याकोब ५:७)* स्तोत्रकर्ता म्हणजे दाविद राजा खूप खिन्न, खचलेला आणि उद्विग्न झालेला दिसत आहे. दाविद राजाला शत्रूंनी चोहोकडून घेरलेले आहे. अशा वेळी शोकाच्या परिणामातून तातडीच्या प्रार्थनेचा स्वर उमटतो. आणि पालट झाल्याच्या अनुभवातून शांती, विसावा लाभतो. खऱ्या प्रार्थनेत गरजेची प्रत्येक बाजू देवापूढे मांडली जाते. दाविद परमेश्वराची प्रार्थना करत आहे आणि प्रार्थनेचे उत्तर मिळाले म्हणून दाविद परमेश्वराची स्तुती करत आहे, तो म्हणतो, *"परमेश्वराने माझ्यावर फार उपकार केले आहेत, म्हणून मी त्याची स्तुतीस्तोत्रे गाईन." ( वचन ६)*


    या ठिकाणी हा प्रसंग शौलासंबंधी आहे. दाविद परमेश्वराकडे या शत्रूचा ( शौलाचा) नाश व्हावा अशी विनंती करीत नाही. कारण संधी मिळाली असूनही त्याने शौलाला मारले नाही हे आपण पाहातो. दाविद म्हणतो, *परमेश्वराच्या अभिषिक्तावर आपला हात टाकायचे माझ्याकडून न घडो. ( १ शमुवेल २६:११)*  देव खूप दूर असल्यासारखे वाटते तेव्हा आम्ही खचून जातो, आमच्या प्रार्थना ऐकल्या जात नाहीत असे वाटते. दीर्घकाळापासून होणारे क्लेश आम्हाला त्रासून सोडतात. आम्हाला ताबडतोब, एका क्षणात उत्तर हवे असते. पण काही गोष्टी लगेच सुस्थिर करता येत नाहीत. त्या सोसाव्याच लागतात. पण देवाच्या लोकांनी काही महत्वपूर्ण गोष्टी लक्षात घ्यायला हव्यात. नीतिमान लोकांच्या प्रार्थनेची उत्तरे कदाचित लवकर मिळणार नाहीत, पण देव त्यांच्या प्रार्थना ऐकतोच ऐकतो. आजार, आर्थिक अडचण किंवा काही अवघड कौटूंबिक समस्यातून जात असताना देवाने आपल्याला सोडल्याची भावना आपल्याला होते. अशा वेळी पवित्र आत्म्याने आपल्याला शांती व धीर द्यावा अशी प्रार्थना करावी. पवित्र शास्र आम्हाला शिकवते की, आपण आत्मिकरित्या तारले गेलो आहोत आणि देवाबरोबर आपले व्यक्तिगत नाते आहे. ते भावना किंवा परिस्थितीवर आधारित नाही, तर आमच्या ठायी असलेल्या दृढ विश्वासाद्वारे आहे. ही वस्तुस्थिती आपल्याला आनंदी व प्रसन्न होण्यास कारण होते. 


     प्रियांनो, जर आपण येशू ख्रिस्तावरील विश्वासाच्या द्वारे देवावर विसंबून राहात आहोत तर मग देवाने आपल्या प्रार्थनेच्या उत्तराला केलेल्या उशिराचा अर्थ त्याने आम्हाला सोडून दिले आहे असा होत नाही. उलट आपल्या जीवनाद्वारे काही तरी उद्देश सिद्धिस न्यावा अशी त्याची योजना असू शकते. ( पाहा २ करिंथ १२:७-१०, इब्री १२:१०,११) आम्ही आमच्या अडचणीत, संकटात देवाला आपली गाऱ्हाणी सांगू शकतो. आम्ही त्याचे साहाय्य मागावे ही त्याची इच्छा आहे. दुःख, क्लेश संपतीलच असे नाही, परंतु दाविद राजाने दुःख- संकटातही स्तोत्रे लिहीली, गीते गाईली कारण त्याला माहीत होते तो देवाचे लेकरू आहे, देव त्याला साहाय्य करण्यास समर्थ आहे. काय आम्ही देवाचे लाडके मूल आहोत काय ? देव आम्हाला साहाय्य करण्यास समर्थ आहे यावर आमचा विश्वास आहे काय ? प्रियांनो, आम्ही दुःख- संकटातही देवाच्या प्रीतीवर विश्वास ठेवायला शिकले पाहिजे, देवाच्या हाती सर्व सोपवून विश्वासाने त्याच्यावरच अवलंबून राहिले पाहिजे.


ए. डब्ल्यू. थोरोल्ड लिहीतात की, *"आध्यात्मिक जीवनाचे शिखर अखंड सूर्यप्रकाशात सुखानंद अनुभवणे नाही तर देवाच्या प्रीतीवर निःशंक आणि परिपूर्ण विश्वास हेच ते शिखर आहे."*


         

No comments:

Post a Comment