Saturday, 2 January 2021

परमेश्वराला शोधा



              *✨परमेश्वराला शोधा✨*


*जे त्याचे निर्बंध पाळून अगदी मनापासून त्याचा शोध करितात, ते धन्य..✍*

              *(स्तोत्र  ११९:२)*


                              *..मनन..*


    परमेश्वर त्याच्या आज्ञा पाळणाऱ्याच्या समीप असतो. त्याने त्या आपल्याला नियम असे लावून दिल्या आहेत. आणि परमेश्वराच्या आज्ञा कठीण नाहीत, आपण मनापासून त्यांचे पालन केले पाहिजे, स्तोत्रकर्ता म्हणतो, *तुझे नियम पाळण्यासाठी माझी वागणूक व्यवस्थित असावी. ( स्तोत्र ११९:५)* आपले जीवन आशीर्वादित असावे असे वाटत असेल तर परमेश्वराच्या मार्गाने चालले पाहिजे, मनापासून त्याचा शोध घेतला पाहिजे, म्हणजे तो तुम्हांस पावेल. विपूल आणि भरपूर आशीर्वाद तो तुम्हाला देईल, जे आज्ञा पाळितात त्यांना सर्व प्रकारचे आशीर्वाद मिळतील, *(वाचा अनुवाद २८:१ते १४)* आपण जर ह्या अध्यायामध्ये लिहिलेल्या गोष्टींचे मनापासून पालन केले तर, ह्या अध्यायात सांगितलेले सर्व आशीर्वाद आपल्याकडे धावत येतील, कारण ह्या अध्यायाच्या सुरूवातीलाच परमेश्वर म्हणतो की, *तुझा देव परमेश्वर ह्याची वाणी तू लक्षपूर्वक ऐकशील,आणि ह्या ज्या सर्व आज्ञा आज मी तुला सांगतो त्या काळजीपूर्वक पाळशील तर तुझा देव परमेश्वर पृथ्वीवरील सर्व राष्ट्रांपेक्षा तुला उच्च करील.( अनुवाद २८:१)*


     परंतु सर्व मानवजात पापी आहे. परिपूर्ण कोणीही नाही, कळत नकळत आमच्या हातून पाप घडते, देवाला न आवडणाऱ्या गोष्टी घडतात, जसे की हेवा, द्वेष, अहंकार, गर्व, मोह अशा अनेक वाईट गोष्टी आपल्याकडून घडतात. परंतु परमेश्वराने त्याच्या एकूलत्या एका पुत्राच्या अर्पणाद्वारे, त्याच्या मोलवान रक्ताच्या द्वारे आमच्यासाठी तारणाची आशा ठेवली आहे. ज्या ज्या वेळी आम्ही पाप करण्यास उद्युक्त होतो, त्या त्या वेळी पवित्र आत्मा आम्हाला सांवरून धरतो.  स्तोत्रकर्ता म्हणतो की, *मला तर तू माझ्या सात्विकपणात स्थिर राखितोस, मला तू आपल्या सन्मुख सर्वकाळ ठेवितोस. ( स्तोत्र ४१:१२)* प्रियांनो, ह्या जगिक जीवनात जगत असताना असे अनेक प्रकारचे मोहात पाडणारे, पापांत पाडणारे प्रसंग आपल्यावर येतात आणि कधी कधी आपल्या हातून एखादे पाप घडते ही, देव पापांची क्षमा करणारा देव आहे, परंतु वचन सांगते की, *जर आपण आपली पापे पदरी घेतली तर तो विश्वसनीय व न्यायी आहे म्हणून आपल्या पापांची क्षमा करील व आपल्याला सर्व अनीतिपासून शुद्ध करील. ( १ योहान १:९)* 


    म्हणून आपण आपली पापे कबूल करून सोडून द्यावीत, पापाला मेलेले असे आपले आचरण असावे, त्याचे निर्बंध मनापासून पाळून त्याचा शोध करावा, त्याच्यापासून दूर राहून पापात पडू नये म्हणून सांभाळा, कारण सैतान दारात टपून बसलेला आहे, त्याच्या अधीन होऊ नका, सैतानाला वश होऊ नका, त्याची सत्ता आपल्यावर चालू नये म्हणून जपा, कारण असे लिहिले आहे की, *म्हणून आपण उभे आहो असे ज्याला वाटते, त्याने पडू नये म्हणून सांभाळावे. ( १ करिंथ १०:१२)* त्याच्या आज्ञा, त्याचे निर्बंध पाळा आणि आशीर्वादित व्हा, धन्य व्हा.


          

No comments:

Post a Comment