*✨योग्य पेरणी करा✨*
*"इसहाकाने त्या देशात धान्याची पेरणी केली आणि त्याला त्याच वर्षी शंभरपट पीक मिळाले, आणि परमेश्वराने त्याचे कल्याण केले."..✍🏼*
*( उत्पत्ती २६:१२)*
*...मनन...*
*!!..परमेश्वराची स्तुती असो..!!*
आपण मूळ वचनात पेरणीविषयी वाचत आहोत. असे लिहिले आहे की, *"इसहाकाने त्या देशात धान्याची पेरणी केली आणि त्याला त्याच वर्षी शंभरपट पीक मिळाले."* जेव्हा त्याने पेरणी केली तेव्हा एक नाही, दोन नाही, दहा नाही तर शंभरपट पीक त्याला मिळाले आहे. ही पेरणी जेव्हा केली तेव्हा त्या काळात तिथे मोठा दुष्काळ पडला होता. जर पाऊस पाणी नसेल तर कोण शेतात पेरणी करील का? *पूर्वी अब्राहामाच्या दिवसांत दुष्काळ पडला होता तसा दुसरा दुष्काळ आता देशात पडला. (उत्पत्ती २६:१)* या दुष्काळामध्ये देखील परमेश्वराने त्याला तो देश सोडून जाऊ नको म्हणून सांगितले. परमेश्वराने त्याला स्वतः दर्शन देवून सांगितले की या दुष्काळ परिस्थिती मध्ये *तू मिसर मध्ये जाऊ नको. मी सांगेन त्या देशात किंवा त्या ठिकाणी रहा. मी तुझ्याबरोबर असेल आणि तुला आशीर्वादित करीन.* या प्रभूच्या शब्दावर त्याने विश्वास ठेवला आणि विश्वासाने त्याने कृतीही केली. म्हणजे विश्वासाने त्याने त्या देशात पेरणी केली. आणि त्यास शंभर पट पीक आले. केवळ पीक आले एवढेच नाही तर देवाने त्याचे कल्याण ही केले. तो त्या देशात एक महान व्यक्ति झाला, त्याची उत्तरोत्तर संपत्ती वाढत गेली. तो सर्वात धनवान, धन संपन्न व्यक्ति झाला.
या जगात अनेक धनवान लोक आहेत, अगदी आपल्या देशात आपला देश विकत घेतील असे लोक आहेत. परंतु हे लोक प्रभूच्या राज्यात कधीच जाऊ शकणार नाहीत. खरे धनी किवा थोर लोक कोण आहेत? ज्यांनी परमेश्वराकडून आशीर्वाद प्राप्त केला तेच लोक खरे धनवान आहेत, थोर आहेत. कोणत्या संपत्तीने देवाचे लोक धनी आहेत? ते दया करण्याद्वारे श्रीमंत आहेत, प्रीतिने श्रीमंत आहेत, देवाच्या सामर्थ्याने श्रीमंत आहेत, त्याच्या कृपेने श्रीमंत आहेत. होय प्रियांनो देवाने आपल्याला एक सर्वात महान संपत्तीने समृद्ध केले आहे ती म्हणजे पवित्र आत्म्याची संपत्ती. पौल म्हणतो की, *"ही आमची संपत्ती मातीच्या भांड्यात आहे."(२ करिंथ ४:७)* पवित्र आत्मा हा आपल्या शरीर रुपी मातीच्या भांड्यात एक बहुमूल्य संपत्ती सारखा आहे. पवित्र आत्म्याच्या द्वारे तुम्ही आणि मी शंभर पट पीक देवू शकतो. परंतु त्यासाठी परमेश्वराने सांगितले त्याच ठिकाणी राहावे लागेल. त्याची वचने आपल्याला आशीर्वादित करतात. जिथे काही नाही अशा ठिकाणी अद्भुत गोष्टी उत्पन्न करणारा परमेश्वर त्याच्या प्रिय जणांना उत्तम ते दिल्यावाचून रहात नाही.
दुष्काळ याचा अर्थ काय? आपल्या आध्यात्मिक जीवनात दुष्काळ म्हणजे देवाची दिव्य शांती नसने, देवाचा अनुग्रह नसने, देवाची प्रीति नसने. हे सर्व पीक येण्यासाठी आपल्याला पेरणी करणे आवश्यक आहे. पेरणी शिवाय पीक येवू शकत नाही. *"शांती करणार्यांसाठी नीतिमत्त्वरूपी फळ देणारे बी शांतीत पेरले जाते." (याकोब ३:१८)* शंभरपट पीक येण्यासाठी आपण तीन प्रकारे पेरणी केली पाहिजे. इसहाकानेही याच तीन प्रकारे पेरणी केली तेव्हा त्यास शंभर पट पीक आले. ती पेरणी म्हणजे प्रथम आपण अश्रू ढाळून प्रार्थना केली पाहिजे. दुसरे आपण धार्मिकता पेरली पाहिजे आणि तिसरी पेरणी म्हणजे आत्म्याची पेरणी केली पाहिजे.
*१) अश्रू ढाळून पेरणी -* स्तोत्रकर्ता म्हणतो *"जे अश्रूपूर्ण नेत्रांनी पेरणी करतात ते हर्षाने कापणी करतील." (स्तोत्र १२६:५)* पवित्र शास्त्रात अनेक अशी उदाहरणे आपण पाहू शकतो की ज्यांनी ज्यांनी शोक केला, अश्रू ढाळले प्रभूने त्यांना आशीर्वाद दिलेला आहे. त्यांचे जीवन हर्षित केले आहे. सर्व प्रथम इस्रायली लोकांनी मिसर देशात असताना परमेश्वराकडे विलाप केला आणि देवाने त्यांना त्या गुलामगिरीतून बाहेर काढून हर्षित केले. हन्नाने अश्रू ढाळून प्रार्थना केली परमेश्वराने तिला पुरुष संतान देऊन हर्षित केले. हिज्कीया राजा मरणार होता, पण त्यानेही अश्रू ढाळून प्रार्थना केली परमेश्वराने त्याचे आयुष्य पंधरा वर्षे वाढवले. परमेश्वर आपले अश्रू वाया जाऊ देत नाही. तो ते त्याच्या बुधलीत साठवतो. दावीद आपल्या स्तोत्र मध्ये म्हणतो की, *"माझी आसवे तू आपल्या बुधलीत भरून ठेवली आहेत;" (स्तोत्रसंहिता ५६:८)*
*२) धार्मिकतेची पेरणी -* आपल्या या जीवनातून देवाचा स्वभाव दिसून आला पाहिजे. देवाचे महान प्रेम आपल्या वागण्यातून प्रकट झाले पाहिजे. जेव्हा आपण पवित्र वचन पूर्णपणे स्वीकारतो तेव्हा देवाचा खरा प्रकाश ज्याला आपण देवाचा स्वभावही म्हणू शकतो. याचे ज्ञान आपणास प्राप्त होते. खरे बोलणे, दया करणे, नम्र होऊन राहणे, देवाचे भय धरून चालणे हे आपले नीतिमत्त्व आहे. यानुसार आपण जीवन जगून धार्मिकतेची पेरणी केली तर आपणास एक सर्वात उत्तम असे पीक मिळेल ते म्हणजे प्रेम, प्रीति. *"तुम्ही आपणांसाठी नीतिमत्त्वाची पेरणी करा म्हणजे प्रेमाची कापणी कराल;" (होशेय १०:१२)*
*३) आत्म्याची पेरणी -* आपण या जगाचे नाही. आपल्याला स्वर्गाच्या राज्यासाठी पाचारण केले आहे. स्वर्गीय स्थानी जाण्यासाठी आपण आत्मिकतेने चालले पाहिजे. पौल म्हणतो की, आत्म्याचे चिंतन हे जीवन आणि शांती आहे. जर जीवन आणि शांती आपल्याला हवी असेल तर आपण आत्म्याच्या प्रेरणेने चालले पाहिजे. देह स्वभाव आपण मारले तरच आपण आत्म्याच्या द्वारे चालवले जाऊन जीवन प्राप्त करु शकतो. देहावर आपण जय मिळवला पाहिजे. गलतीकरांस पत्र लिहिताना पौल म्हणतो की, *"जो आपल्या देहस्वभावासाठी पेरतो त्याला देहस्वभावा-पासून नाशाचे पीक मिळेल; आणि जो आत्म्यासाठी पेरतो त्याला आत्म्यापासून सार्वकालिक जीवन हे पीक मिळेल." (गलती ६:८)*
प्रिय देवाच्या लेकरांनो, परमेश्वर सांगेल त्याच ठिकाणी तुम्ही राहा. तो त्याच ठिकाणी तुम्हाला थोर बनविल. तुमचे कल्याण करील. चला आपल्या जीवनाच्या प्रवासात दुष्काळाचा अनुभव असेल तर आजच आपण आपल्या अश्रूंची पेरणी करू या! धार्मिकतेची पेरणी करु या! आत्म्याची पेरणी करु या!!!
No comments:
Post a Comment