*✨आपली नावे कुठे आहेत?✨*
*"... तर तुमची नावे स्वर्गात लिहिलेली आहेत ह्याचा आनंद माना."..✍🏼*
*( लूक १०:२० )*
*...मनन...*
*!!..परमेश्वराची स्तुती असो..!!*
किती सुंदर वचन आहे ना! आणि किती आनंद वाटतो, आपली नावे *स्वर्गात लिहिलेली आहेत.* मला तर नक्कीच असे वाटते की या आनंदाशिवाय आपल्या जीवनात दुसऱ्या कोणत्याही आनंदाची आवश्यकता नाही. या आनंदाशिवाय दूसरा कोणताही आनंद मोठा नाही. परंतु एक प्रश्न आहे, खरेच आपली नावे स्वर्गात लिहिलेली आहेत का? त्या जीवनाच्या पुस्तकात लिहिलेली आहेत का?आज प्रत्येक माणूस हा स्वतःच्या नावाला उंच करण्यासाठी जीवन जगत आहे. इतरांनी त्यांची प्रशंसा करणे, त्यांना मोठेपणा देणे, त्यांना आदर्श ठरविणे ह्या मध्ये त्यांना आनंद वाटतो. परंतु वचन सांगते स्वर्गात आणि पृथ्वीच्यावर एकच नाव आहे जे प्रशंसनीय, आदरणीय, सर्व नावावरुन श्रेष्ठ आहे, आणि ते म्हणजे फक्त *"येशू"* आपण आपल्या जीवनात प्रत्येक गोष्टीमध्ये प्रथम स्थान आपल्या *प्रभू येशूला* दिले पाहिजे. कारण तोच आपले जीवनाचे पुस्तक आहे. तोच आपला स्वर्ग आहे. स्वर्गात किंवा जीवनाच्या पुस्तकात आपली नावे लिहिलेली असावीत तरच आपण परमेश्वराच्या न्यायासमोर वाचू शकतो.
जीवनाच्या पुस्तकात कोणाची नावे लिहिली जावीत, किंवा कशाप्रकारे ख्रिस्ती जीवन किंवा विश्वास जीवन जगावे यासाठी अनेक प्रकारची वचने पवित्र शास्त्रात लिहिलेली आहेत. अशा अनेक वचनांद्वारे प्रभूने आपल्याला बोध केलेला आहे. पण आपण आज अगदी थोडक्यात याविषयी बघूया - आज जगा मध्ये लोक आपले नाव वेगवेगळ्या ठिकाणी नोंदणी करण्यासाठी खूपच उत्सुक असतात. जसे की, रेशन कार्ड, आधार कार्ड, पॅन कार्ड, एखाद्या विशिष्ट कमिटी, संघटना, इत्यादी ठिकाणी आपले नाव असावे यासाठी धडपड चालूच असते. या जगीक यादीत आपल्या नावनिशीसाठी आपण एवढी धावपळ करतो आणि नाव नोंदणी करतो पण हे लक्षात घ्या यातून आपल्याला काहीच लाभ नाही. मनुष्य हा श्वासवत आहे. त्याचे जीवन हे नश्वर छायेसारखे आहे. ते कधी नष्ट होईल माहीत नाही. आपण बायबलमध्ये वाचतो की, योसेफने देखील गर्भवती असलेल्या मरीयेला घेवून जाऊन नावनिशी केली होती. *नावनिशी लिहून देण्यासाठी, त्याला वाग्दत्त झालेली मरीया गरोदर असताना तिलाही त्याने बरोबर नेले. ( लूक २:५)* परंतु आपण बघतो की येशूच्या जन्मानंतर योसेफचा उल्लेख पुन्हा कोठेच आढळला नाही.
प्रियांनो, येशू म्हणत आहे की तुमची नावे जीवनाच्या पुस्तकात लिहिलेली असावीत. स्वर्गात लिहिलेले असावी. येशू म्हणतो की, जिथे तुमचे धन तिथे तुमचे मन ही लागेल. होय प्रियांनो, आपले धन आपण स्वर्गात साठवले पाहिजे. कोणते धन?परमेश्वर म्हणतो की मी तुम्हाला अंधारात लपलेले गुप्त धन देईल. *तुला अंधारातील निधी व गुप्त स्थळी लपवलेले धन देईन, म्हणजे तुला समजेल की तुझ्या नावाने हाक मारणारा मी परमेश्वर इस्राएलाचा देव आहे. ( यशया ४५:३)* याचा अर्थ जो पापाचा अंधकार आहे, अधर्माचा अंधार आहे, अनीतीचा अंधार आहे, दुष्ट शक्तीचा अंधार आहे. या अंधारात लपलेले धन म्हणजे मनुष्य! या मनुष्याला त्या अंधारातून प्रकाशात आणणे म्हणजे त्यास स्वर्गाच्या राज्यासाठी तयार करणे. जेव्हा एका पापी व्यक्तीचे तारण होते तेव्हा स्वर्गात आनंद केला जातो. एक एक आत्मा आपण प्रभू कडे आणला पाहिजे. हेच धन परमेश्वर तुम्हाला आणि मला देत आहे. आणि याचे प्रतिफळ आपल्याला प्राप्त होणार आहे. म्हणून या काळात आपण "सुवार्ता" ही जास्त प्रमाणात आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल अशा उद्देशाने कार्य केले पाहिजे. अनेक लोकांना तारणात आणून आपले नाव जीवनाच्या पुस्तकात लिहिले जाण्यासाठी आटोकाट प्रयत्न केला पाहिजे. *'ज्या कोणाची' नावे जगाच्या स्थापनेपासून 'वधलेल्या कोकऱ्याजवळील जीवनाच्या पुस्तकात लिहिलेली' नाहीत असे पृथ्वीवर राहणारे सर्व जण त्या श्वापदाला नमन करतील. ( प्रकटी १३:८)* प्रभू येशूच्या नावात चिन्ह चमत्कार होतात त्यात आपण आनंद मानू नये. खरा आनंद आहे तो स्वर्गात आपले नाव लिहिलेले आहे, जीवनाच्या पुस्तकात नाव लिहिलेले आहे याचा. पृथ्वीवर शत्रूच्या सर्व शक्तीवर प्रभूने आपल्याला अधिकार दिला आहे. याचा अर्थ असा होत नाही की आपण या गोष्टी करून किंवा या अधिकाराचा वापर करून जे अद्भुत चमत्कार होतात त्यामुळे आपण स्वर्गात जाऊ. बिलकुल नाही. आपले खरे कार्य आहे ती देवाची इच्छा करणे. आणि देवाची इच्छा आहे की एकाही आत्म्याचा नाश होऊ नये तर प्रत्येकाला देवाचे राज्य मिळावे. आणि त्यासाठी प्रत्येक व्यक्तीला सुवार्ता सांगणे गरजेचे आहे.प्रभूने आम्हाला सर्व पृथ्वीवर जाऊन देवाच्या राज्याची घोषणा करायला सांगितले आहे, सुवार्ता सांगायला सांगितले आहे.
No comments:
Post a Comment