*✨देवाच्या न्यायापासून जपा✨*
*परमेश्वराच्या भयप्रद दृष्टीपुढून, त्याच्या ऐश्वर्याच्या प्रतापांपुढून खडकात दडून जा; आपणाला धुळीत पुरून घे..✍🏼*
*( यशया २:१० )*
*...मनन...*
*!!..परमेश्वराची स्तुती असो..!!*
या अध्यायामधील संदेशामधून यरुशलेमेचे अंतिम वैभव आणि तिची सध्याची झालेली नीचावस्था यांचा उल्लेख प्रामुख्याने केलेला दिसून येतो. उच्च अवस्थेबद्दल पाहिले तर सीयोनमध्ये खरोखरच परमेश्वर आहे, हेच तिचे वैभव आहे. परंतु आता यहूदाच्या लोकांचा परमेश्वराने त्याग केलेला आहे. कारण त्यांनी त्यांच्यावर दया आणि कृपा करणाऱ्या परमेश्वराच्या आज्ञेविरूद्ध आचरण करून देवाला क्रोध आणला आहे. ते अंधश्रद्धा, परदेशीयांबरोबर मैत्री, धनसंपत्ती, हत्यारे आणि मूर्ती यांच्या विपुलतेमुळे नीचावस्था पावले आहेत. लोभ, मूर्तीपूजकांशी नाते जोडणे, मूर्तीपूजा अशा देवाच्या विरूद्ध असणाऱ्या गोष्टी करून त्यांनी देवाबरोबरचे नाते तोडले आहे. ते जगाशी एकरूप झाले होते. त्यांची भिस्त सोन्यारूप्यावर व मूर्तीवर होती. देव त्यांना फलहीन द्राक्षवेल म्हणत आहे. देवाने त्यांचे धीराने सहन केले. परंतु आता त्यांचा न्याय लवकरच होणार होता. ते गर्विष्ठ झाले होते. यहूदा आता राष्ट्रांचा प्रकाश राहिलेला नव्हता. त्यामुळे हा देश गजबजलेला असला, समृद्धीने भरलेला असला तरीपण तो अनाथ आहे कारण तेथे देव सोडून बाकी सर्व काही आहे. देवाची समक्षता सोडून जगीक गोष्टींची तेथे रेलचेल आहे. परंतु येथे ऐहिक बलावर विसंबून राहण्यातील व्यर्थता दिसून येते. *देव गर्विष्ठांना विरोध करतो आणि लीनांवर कृपा करतो. ( याकोब ४:६)*
या वचनातून परमेश्वराच्या क्रोधापासून स्वतःला कसे सांभाळावे ते निदर्शनास येते. तो म्हणतो, "खडकात दडून जा." खडक म्हणजे ख्रिस्त. पौल म्हणत आहे, *... तो खडक तर ख्रिस्त होता. ( १ करिंथ १०:४)* प्रियांनो, आपल्याला देवाच्या क्रोधापासून वाचविण्यासाठी, त्याच्या न्यायापासून वाचविण्यासाठी एकच मध्यस्थ आहे, तो म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त. ( १ तीमथ्य २:५) ख्रिस्ताने आमचे सर्व पाप, अपराध स्वतःवर घेतले. ख्रिस्ताचे रक्त आम्हाला आपल्याला आपल्या पापापासून शुद्ध करते, पवित्र करते. आपण पवित्र असलो तरच पिता परमेश्वराला पाहू शकतो. पवित्रतेशिवाय आपण आपल्या जिवंत देवाला पाहू शकत नाही. म्हणून पेत्र म्हणतो, *जसा तो पवित्र आहे, तसे तुम्हीही पवित्र व्हा.*
आमच्यावर येणाऱ्या संकटात, विपत्तीत आम्ही आमचा खडक प्रभू येशू ख्रिस्ताच्या पंखाच्या छायेत लपले पाहिजे. कारण तोच आमचा साहाय्य करणारा आणि लपण्यास बळकट दुर्ग आहे. स्तोत्रकर्ता म्हणतो, *"कारण तू माझा आश्रय, वैऱ्यापासून लपण्यास बळकट दुर्ग असा होत आला आहेस." ( स्तोत्र ६१:३)* आम्ही पश्चाताप केला पाहिजे व पूर्णपणे प्रभूला समर्पण केले पाहिजे. म्हणजे ख्रिस्त आमचे पाप धुऊन आम्हाला शुद्ध आणि पवित्र करतो. धुळीत पुरून घेणे म्हणजे पश्चाताप करणे, स्वतःला रिक्त करणे, आपण कोणीच नाही असा अनुभव घेणे. होय प्रियांनो, आपण शून्य अवस्थेत जाऊन त्या खडकात ( ख्रिस्तात ) लपूया. म्हणजे आपण देवाच्या न्यायापासून सुरक्षित राहू.
वचन सांगते, आपणाला धुळीत पुरून घे.. खरोखरच आम्ही केवळ धूळ आणि माती आहोत. परमेश्वराने आम्हाला मातीपासून यासाठी बनवले की, आपण कधीही आपल्या जीवनात स्वतःविषयी गर्व करू नये. परमेश्वराने देवदूतांची निर्मिती त्याचा महिमा करण्यासाठी केली होती परंतु आपण पाहातो की, देवदूताने कसा गर्व केला आणि परमेश्वराने त्याला कसे आकाशातून खाली टाकले. मनुष्याच्या अवाज्ञामुळे पाप त्याच्यामध्ये आले आणि पापाचे रुपांतर मृत्यूत झाले. आणि परमेश्वरापासून मिळालेला महिमा, गौरव मनुष्य गमावून बसला. धूळीत बसणे किंवा पुरून घेणे हे संपूर्णपणे रिक्त होण्याला दर्शविते. पश्चातापाला दर्शविते. बायबल मध्ये अनेक ठिकाणी आपण पाहातो. ईयोबच्या बाबतीत आपण पाहातो तो स्वतः राखेत बसला होता. त्याचप्रमाणे एस्तेर राणी तिच्या दासींसमवेत तिच्या लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी राखेत बसली. निनवे येथील राजानेही देवाच्या क्रोधापासून वाचण्यासाठी आपल्याबरोबर आपल्या प्रजाजनांनाही घेऊन राखेत बसून पश्चाताप केला. म्हणून येथे देवाच्या लोकांनी देवाविरूद्ध केलेल्या बंडासाठी, देवाच्या आज्ञा मोडून केलेल्या पापांसाठी आपणाला धुळीत पुरून घे असे सांगत आहे. प्रियांनो, आपणही आपल्या देवासमोर नम्र होऊ या व त्याच्या प्रकाशात लीनतेने चालू या. जी व्यक्ती ख्रिस्ताच्या सहवासात राहते ती समाधानी व तृप्त असते. ती नम्र असते. ती पवित्र राहते. म्हणून परमेश्वराचा न्याय आपल्यावर येण्याअगोदर प्रभू येशू ख्रिस्ताला आपला वैयक्तिक तारणारा म्हणून स्विकारुन, त्याचा स्वभाव धारण करून, सौम्य, नम्र जीवन जगत प्रकाशमान होऊ या.
No comments:
Post a Comment