Monday, 25 January 2021

कृपेचे धन



                 *✨कृपेचे धन ✨*


*"त्याच्या कृपेच्या विपुलतेप्रमाणे त्या प्रियकरात त्याच्या रक्ताच्या द्वारे आपल्याला मुक्ती म्हणजे आपल्या अपराधांची क्षमा मिळाली आहे."*✍

                      *(इफिस १:७)*


                           *...मनन...*


           *!!..परमेश्वराची स्तुती असो..!!*


    आपण कृपेच्या काळात अगदी शेवटच्या क्षणी येवून ठेपलो आहोत. आपण पापात होतो, देवाच्या इच्छेविरुद्ध वागणारे होतो. जग आणि जगातील गोष्टीमध्ये आपण स्वतःला पूर्णपणे झोकून दिले होते. आपले जीवन त्या कधीही न विझणाऱ्या अग्नीच्या सरोवराकडे चालले होते. त्या दुष्टाच्या राज्यात आपला प्रवेश होणार होता. पण प्रभुने आपणावर महान प्रीति केली. आपल्याला त्या बंधनातून बाहेर आणायची योजना आखली आणि त्याच्या एकुलत्या एक पुत्राला आपल्या साठी दिले.


    होय, प्रियांनो मी आपल्यासाठी त्या वधस्तंभावर खिळलेला जो येशू त्याविषयी बोलत आहे. त्याच्या पवित्र रक्ताने त्याने आपले सर्व पाप धुवून काढले आणि आपल्याला पवित्र बनवले. हि आपल्या प्रभू येशूची कृपा नाही तर काय म्हणावे! हे आपणासाठी एक धन आहे.. "कृपेचे धन!" पापांच्या क्षमेद्वारे आपल्याला कृपेचे धन प्राप्त होते. जेव्हा आपण येशूकडून क्षमा प्राप्त करतो, तेव्हा आपल्या जीवनात कृपा येते. तसेच जेव्हा आपण इतरांना क्षमा करतो तेव्हा कृपेची विपुलता आपल्यामध्ये येते. आपण जेवढी क्षमा करू तेवढे कृपेचे धन आपण प्राप्त करू. पौल म्हणतो की, *तुम्ही एकमेकांबरोबर उपकारी व कनवाळू व्हा; जशी देवाने ख्रिस्ताच्या ठायी तुम्हांला क्षमा केली आहे तशी तुम्हीही एकमेकांना क्षमा करा. (इफिस ४:३२)* त्यामुळे आपल्याला सदैव क्षमा करणाऱ्या आत्म्याची गरज आहे. आपल्या आत्म्यामध्ये कोणतीच चिडचिड, द्वेष, (नाराजी) किंवा वाईट भावना असू नये. आपण जेव्हा इतरांना क्षमा करणार नाही, तेव्हा आपण कृपेचे धन गमावतो. प्रतिदिवशी आपण आत्मपरिक्षण केले पाहिजे. "हे प्रभो, माझ्या हृदयात कोणती नाराजी आहे का? मी माझ्या हृदयात कडूपणा राखलाय का?"


    *.... त्याच्या कुशीत भाला भोसकला; आणि लगेच रक्त व पाणी बाहेर निघाले. (योहान १९:३४)* जेव्हा येशूच्या कुशीत भोसकण्यात आले तेव्हा लागलीच त्यातून रक्त आणि पाणी वाहू लागले. रक्त हे क्षमा दर्शविते आणि पाणी प्रेम व कृपा दर्शविते. जेव्हा आपल्याला भोसकण्यात येते म्हणजे लोक आपल्या विरुद्ध बोलतात, निंदा, छळ, अपमान करतात तेव्हा क्षमा आणि क्षमा करणारे प्रेम लगेच आपल्या हृदयातून बाहेर यायला पाहिजे, त्याठिकाणी त्याचे *'कृपेचे धन'* असणार. जेव्हा आपल्याकडे कृपेची विपुलता असेल तेव्हा इतर निष्फळ लोकांमध्ये आपण फलदायी बनू आणि सर्वदा हिरवेगार राहू. जेव्हा सर्व झोपेत असतील तेव्हा आपण जागृत राहून प्रार्थना करू शकू. जेव्हा सर्व लोक निराश अवस्थेत असतील तेव्हा आपण उत्साहित होऊ. आणि इतरांनाही उत्साहीत करू शकू. कृपेलाच हे शक्य आहे. जेव्हा सर्व लोकांची आत्मिक जीवनात अधोगती होत असेल आणि पवित्र जीवन व्यतित करणे त्यांना अशक्य वाटेल त्यावेळी देवाची कृपाच आपल्याला अधिकाधिक देवाच्या पवित्रतेविषयी बोध करेल. *"त्या एकाच्या अपराधाने, त्या एकाच्या द्वारे, मरणाचे राज्य चालू झाले. तर त्यांस कृपा व नीतीमत्वाचे दान यांची विपुलता मिळते ते विशेषेकरून त्या एका येशू ख्रिस्ताच्याद्वारे जीवनात राज्य करितील."  (रोम ५:१७)* आपण जर या विपूल कृपेमध्ये वाढत गेलो तर नक्कीच खिस्त आपल्यामध्ये राज्य करेल.


        

No comments:

Post a Comment