Wednesday, 20 January 2021

यहोवा यिरे



                 *✨यहोवा यिरे✨*


*"तुझा एकुलता एक प्रिय इसहाक यास घेऊन मोरीया देशात जा आणि मी तुला सांगेन त्या डोंगरावर त्याचे होमार्पण कर"..✍🏼*

               *( उत्पत्ती २२:१२ )*


                           *...मनन...*


           *!!..परमेश्वराची स्तुती असो..!!* 


      परमेश्वराने अब्राहामाची परीक्षा घेतली. ही परीक्षा त्याच्या एकुलत्या एक मुलगा इसहाक याच्या प्रती प्रेमाची परीक्षा होती. अब्राहाम इसहाकापेक्षा परमेश्वरावर अधिक प्रीति करतो की नाही हे पाहण्यासाठी ही  परीक्षा घेतली गेली होती. एका पित्यासाठी आपला मुलगा तोही वृद्धपणी झालेला मुलगा, देवाच्या आशीर्वादानेच प्राप्त झालेला मुलगा, त्याच्यापेक्षा या जगात कोणतीच गोष्ट अधिक प्रिय असू शकत नाही. परंतु आपण पाहातो की, अब्राहामाने परमेश्वराची इच्छा पूर्ण केली. प्रियांनो, परमेश्वर आपल्याकडून देखील आपल्या उत्तम आशीर्वादांचे आपण होमार्पण करावे असे इच्छितो. परमेश्वरापासूनच आम्हाला सर्व प्रकारचे भौतिक आणि आध्यात्मिक आशीर्वाद प्राप्त होतात. आम्ही आमचे सर्वात उत्तम आशीर्वाद होमार्पण केले पाहिजे. कारण त्यातूनच आपण आपली देवावरची प्रीति दर्शवितो. देवावर असलेले आमचे प्रेम हे पवित्र आणि निर्दोष असावे. कारण ते जगीक नसून आत्मिक असते. पौल म्हणतो, *"जे प्रेमामध्ये पवित्र व निर्दोष आहेत तेच आगमनामध्ये उचलले जातील." ( इफिस १:४)* म्हणून आम्ही प्रेमामध्ये पवित्र व निर्दोष असायला हवे. 

     आम्ही जगातील गोष्टींवर प्रीति करू नये. जगातील व्यर्थतेवर प्रीति करून त्यामागे गेलो तर आपली प्रीति पवित्र नाही. या जगामध्ये असणारे आमचे जगीक नातेसंबंध, आमचे आईवडील, मुलगा मुलगी, पती - पत्नी, आमची नोकरी, व्यवसाय किंवा देवाकडून प्राप्त केलेले एखादे वरदान हे आमच्यासाठी आमचा इसहाक होऊ शकते. आम्ही त्यांना मूर्ती बनवून त्यांची पूजा करू नये. म्हणजेच आम्ही देवापेक्षा दूसऱ्या कशावर, कोणावर अधिक प्रीति केली तर आमच्या प्रेमामध्ये दोष आहे. पौल तीमथ्याला लिहीतो की, *"देवावर प्रेम करण्याऐवजी सुखविलासाची आवड धरणारी होतील." ( २ तीमथ्य ३:४)* हे शेवटच्या दिवसाचे चिन्ह आहे. अब्राहामाने देवाच्या वाणीकडे कान दिला आणि देवाची इच्छा पूर्ण करण्यासाठी त्याने स्वतःला तयार केले. त्याने कोणाचाही सल्ला मसलत घेतली नाही. कारण कदाचित त्यामुळे तो आपल्या निर्णयापासून ढळला असता. जेव्हा आमच्या जीवनामध्ये परमेश्वराची इच्छा प्रगट होते तेव्हा आम्ही मनुष्याचा म्हणजेच रक्त व मांस यांचा सल्ला घेऊन परमेश्वराला प्रसन्न करू शकत नाही. त्याचप्रमाणे दूसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आम्ही आमच्या स्वतःच्या सामर्थ्याने देवाची इच्छा पूर्ण करू शकत नाही तर देवाच्या सान्निध्यात राहूनच आणि देवाच्या साहाय्यानेच आम्ही देवाची इच्छा पूर्ण करू शकतो. अब्राहामाने कोणालाही सोबत न घेता इसहाकाचे अर्पण करण्यास गेला. आपल्या जीवनात देखील परमेश्वराची परिपूर्ण इच्छा करण्यासाठी आम्हाला विभक्त जीवनाची गरज आहे. आणि अर्पणाशिवाय आराधना परमेश्वराला ग्रहणयोग्य नाही. म्हणून पौल म्हणतो त्याप्रमाणे, *आम्ही आमची शरीरे  जिवंत, पवित्र व देवाला ग्रहणीय यज्ञ म्हणून समर्पण करावी. ( रोम १२:१)*

      प्रियांनो, आपण आपल्या इसहाकरूपी गोष्टींना परमेश्वराच्या पवित्र वेदीवर ठेवून त्यांचे होमार्पण केले पाहिजे. त्या गोष्टींचे अर्पण करण्यास आम्ही भिऊ नये. कारण ज्याप्रमाणे अब्राहामाने त्याचे अर्पण गमावले नाही त्याप्रमाणे आम्हीही आमचे अर्पण, आमचा इसहाक गमावणार नाही. तर याउलट त्याद्वारे आम्ही आमची देवावरील प्रीति प्रगट करतो आणि त्यातून मिळणाऱ्या स्वर्गीय आशीर्वादांस योग्य बनतो. म्हणून आम्ही नेहमी देवाच्या अधीन होऊन देवाची इच्छा पूर्ण करण्याचा प्रयत्न करावा. जो देवाच्या सान्निध्यात राहून देवाची इच्छा पूर्ण करतो त्याला कोणत्याही चांगल्या गोष्टींची वाण पडत नाही. कारण आपला परमेश्वर आपली सर्व काळजी, चिंता घेणारा परमेश्वर आहे. तोच आपला यहोवा यिरे आहे.


         

No comments:

Post a Comment