*✨पेराल तेच उगवेल✨*
*फसू नका, देवाचा उपहास व्हावयाचा नाही, कारण माणूस जे काही पेरितो त्याचेच त्याला पीक मिळेल..✍*
*( गलती ६:७ )*
जे देहस्वभावाने वागतील व देहस्वभावाच्या तृप्तीसाठी आपल्या पैशांचा व वेळेचा उपयोग करतील त्यांना नाश पावणारे म्हणजेच क्षणभंगूर ठरणारे पीक मिळेल. याउलट, जे पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने चालतात व आपल्या पैशांचा व वेळेचा उपयोग प्रभूच्या इच्छेनुसार करतात त्यांना मिळणारे फळ टिकणारे म्हणजेच कायमचे असेल. आपण आपल्या धनाचा उपयोग प्रभूसाठी करीत असाल व यामध्ये पवित्र आत्म्याचे मार्गदर्शन असेल तर त्याचे प्रतिफळ व आशीर्वाद कायम टिकणारे ठरतील. देवाला कोणीही फसवू शकत नाही. देवाचे नियम मोडल्यावर तो काहीच करणार नाही ह्या भ्रमात राहू नये. कारण आपण जे पेरितो तेच पीकाच्या रूपात आपल्याला मिळेल, दूसरे काहीतरी मिळेल अशी अपेक्षा करणे चुकीचे आहे. आम्ही आत्म्यासाठी पेरले तर आम्हाला आध्यात्मिक पीक मिळेल. आणि आम्ही जर देहस्वभावासाठी पेरितो तर आम्हाला अनीतीचे पीक मिळेल. पौल म्हणतो, *जो आपल्या देहस्वभावासाठी पेरतो त्याला देहस्वभावापासून नाशाचे पीक मिळेल, आणि जो आत्म्यासाठी पेरतो त्याला आत्म्यापासून सार्वकालिक जीवन हे पीक मिळेल. ( गलती ६:८)*
ख्रिस्ती सेवकाची किंवा ख्रिस्ती जीवनाची तुलना व्यापारी किंवा नोकरदार किंवा कारखानदार यांच्याशी केलेेली नाही तर शेतकऱ्याशी केलेली आहे. कारण पेरणी, कापणी हे शेतीतील शब्द आहेत. आणि ख्रिस्ती कार्य हे विकत घेणे किंवा विकणे असे नसून पेरणे व कापणे असे आहे. आम्हाला किती माहीत आहे, त्यावर हंगाम अवलंबून नाही तर आम्ही किती पेरतो आणि काय पेरतो ह्यावर पीक किती येईल हे अवलंबून आहे. आमच्या अंतःकरणाच्या कोठारात कितीही विपूल प्रमाणात बी- बियाणे असले तरी ते आम्ही जेव्हा पेरणी करू तेव्हाच उगवून येईल. आणि पेरणीही योग्य भूमीमध्येच केली पाहिजे. तरच विपूल फळ मिळेल. *( वाचा -पेरणाऱ्याचा दाखला - लूक ८:४ ते १५)*
आत्म्याच्या भूमीवर जीवनाचे बी पेरा, *जीवन म्हणजे ख्रिस्त..कारण तो म्हणतो, मार्ग, सत्य व जीवन मीच आहे* त्याद्वारे आत्म्यामध्ये देवाचे गौरव होईल. परंतु तेच बी देहाच्या भूमीवर पेरले तर ते कुजून जाईल, सडून जाईल आणि त्याद्वारे काहीच फलप्राप्ती होणार नाही. म्हणून देहाच्या भूमीवर पेरू नका. आम्ही आमच्या जिवंत देवाच्या पवित्र वचनांची पेरणी केली पाहिजे. कारण ती आपण प्रभूसाठी म्हणून केलेली असेल आणि त्यामध्ये पवित्र आत्म्याचे मार्गदर्शन आपल्याला मिळेल. आणि त्याच्यापासून मिळणारे फळ म्हणजेच प्रतिफळ किंवा आशीर्वाद हे कायम स्वरूपाचे असतील. पण लक्षात ठेवा की स्वार्थी जीवनातून आत्म्याचे फळ कधीच फलद्रूप होणार नाही. आमची साधनसामग्री आम्ही पापस्वभावाचे किंवा देहाचे चोचले पुरविण्यासाठी लावली, आत्म्याकडे लावली नाही तर वाईट तेच आम्हाला मिळेल. कारण 'पेरणी तशी कापणी' हे तत्व लक्षात ठेवावे. असे असूनही आपण निराश न होता चांगले तेच करीत राहावे. पौल म्हणतो, *चांगले करण्याचा आपण कंटाळा करू नये, कारण आपण न खचलो तर यथाकाळी आपल्या पदरी पीक पडेल. ( गलती ६:९)* म्हणून प्रियांनो, आम्ही न खचता, निराश न होता पवित्र वचनांची पेरणी करीत राहिले पाहिजे. म्हणजे प्रभूपासून आम्हाला चांगले फळ मिळेल. पौल म्हणतो, *प्रभूमध्ये आमचे श्रम व्यर्थ नाहीत हे तुम्ही जाणून आहां, म्हणून तुम्ही स्थिर व अढळ व्हा आणि प्रभूच्या कामात सर्वदा अधिकाधिक तत्पर असा. ( १ करिंथ १५:५८)*
*शब्दांनी व कृतींनी आध्यात्मिक विचारांचे, वचनांचे बी पेरा. देवाच्या वचनातून तशाच प्रकारचे फळ मिळेल. आत्म्यांशी वागताना आम्ही कारागिर नसतो. बिघडलेले जीवन दुरूस्त करणे एवढेच आमचे काम नाही तर आम्ही त्यांच्या अंतःकरणात प्रभूच्या पवित्र वचनांची पेरणी केली पाहिजे.*
No comments:
Post a Comment