*✨वधस्तंभावरील ख्रिस्त ✨*
*"आम्ही तर वधस्तंभावर खिळलेला ख्रिस्त गाजवतो, हा यहूद्यांना अडखळण व हेल्लेण्यांना मूर्खपणा असा आहे"..✍*
*( १ करिंथ १:२३)*
*...मनन...*
*!!..परमेश्वराची स्तुती असो..!!*
मनुष्याला उंच करणे मूर्खपणा आहे व तसे करणे हे सुवार्तेच्या विरूद्ध आहे. ख्रिस्ती जीवन हे केवळ ख्रिस्तकेंद्रितच असले पाहिजे. कारण ते तसे ख्रिस्तकेंद्रित असले तरच ते सर्व दृष्टीने समर्थ असे असते. कारण ख्रिस्तच मंडळीचा पाया आहे आणि जर पायाच खोदून डळमळीत केला तर ही त्याच्यावर उभारलेली इमारत जमीनदोस्त होण्यास वेळ लागणार नाही. ख्रिस्त हाच मंडळीचा पुढारी आहे. परंतु विश्वास न ठेवणारे ख्रिस्ताला अनुसरण्याऐवजी धार्मिक पुढाऱ्यांच्या मागे जातात. पौल म्हणतो, *तुमच्यापैकी प्रत्येक जण "मी पौलाचा", " मी अपुल्लोसाचा", "मी केफाचा", " मी ख्रिस्ताचा" आहे असे म्हणतो. ( वचन १२)* परंतु तो त्यांना विचारत आहे की, पौलाला तुमच्यासाठी वधस्तंभावर खिळले होते काय ? पौलाच्या नावात तुमचा बाप्तिस्मा झाला होता काय ? प्रियांनो, जर आमच्यासाठी, आमच्या पापांची क्षमा व्हावी म्हणून ख्रिस्त वधस्तंभावर खिळलेला आहे तर आम्ही ख्रिस्तच गाजविला पाहिजे. कारण तोच आमच्यासाठी मरण पावला आहे. स्वतः मरण सोसून, तुम्हाला जीवन देईल असा दूसरा कोणीच मनुष्य नाही. केवळ ख्रिस्तच तुम्हाला जीवन ते ही सार्वकालिक जीवन देऊ शकतो.
यहूदी चिन्हे मागत होते. कारण जर काही चमत्कार पाहिला तरच ते विश्वास ठेवीत होते. याउलट हेल्लेणी ज्ञानाचा शोध करीत होते. ते मनुष्याच्या कारणमिमांसेचा, वाद, तर्कज्ञान याचा शोध करीत होते. त्यामुळेच वधस्तंभावरचा ख्रिस्त त्यांच्यासाठी अडखळण व मूर्खपणा असा झाला आहे. कारण त्यांना हे समजत नाही की, त्यांच्या दोघांसाठीही ख्रिस्त हाच देवापासून आलेले सामर्थ्य व देवाचे ज्ञान असा आहे. पौल म्हणतो, *ज्यांचा नाश होत आहे त्यांना वधस्तंभाविषयीचा संदेश मूर्खपणाचा आहे. ( वचन १८)* आणि परमेश्वरापेक्षा माणसांच्या बोलण्यावर भरंवसा ठेवणे हा देखील मूर्खपणाच आहे. सुवार्तेवर विश्वास ठेवणाऱ्यांचे देवाने आपल्या सामर्थ्याने व ज्ञानाने तारण केले आहे आणि ज्या गोष्टीला माणसे देवाचे मूर्खपण व देवाची दुर्बलता म्हणत तीच मानवी ज्ञानाहून व बळाहून कितीतरी श्रेष्ठ ठरले आहे. यशयाने म्हटले आहे की, देव म्हणतो, *"मी ज्ञान्यांचे ज्ञान नष्ट करीन, बुद्धिमंतांची बुद्धि व्यर्थ करीन." ( यशया २९:१४)*
वधस्तंभापाशी आलेला माणूस वधस्तंभापासून दूर जातो, तेव्हा पूर्वीसारखा राहात नाही तर तो पूर्णपणे बदलून जातो. मग त्याला वधस्तंभावरील येशूला स्वीकारणे किंवा नाकारणे भाग पडते. जो वधस्तंभावरील येशूला स्वीकारतो तो देवाचे मूल होतो. *जितक्यांनी त्याचा स्वीकार केला तितक्यांना म्हणजे त्याच्या नावावर विश्वास ठेवणाऱ्यांना त्याने देवाची मुले होण्याचा अधिकार दिला. ( योहान १:१२)* आणि वधस्तंभाकडे दुर्लक्ष केले किंवा तो नाकारला तर तो मनुष्य नाशाप्रत जातो. *जो पुत्राचे ऐकत नाही त्याच्या दृष्टीस जीवन पडणार नाही, पण देवाचा क्रोध त्याच्यावर राहतो. ( योहान ३:३६)* होय प्रियांनो, आम्ही नाश होणाऱ्यांमध्ये असू नये तर तारण झालेल्यांमध्ये आमची गणती व्हावी. आम्ही ख्रिस्तावर विश्वास ठेवावा, त्याची वाणी ऐकावी. कारण जे त्याची वाणी ऐकतात व त्याच्यावर विश्वास ठेवतात त्यांच्यासाठी ख्रिस्त देवाचे सामर्थ्य व देवाचे शहाणपण बनतो. पौल चिन्हे मागणारा यहूदी नव्हता, ज्ञानपिपासू हेल्लेणी नव्हता, परंतु, तारणाऱ्या ख्रिस्तावर प्रीति करणारा ख्रिस्ती होता. पौलाप्रमाणे आम्हीही ख्रिस्तावर प्रीति करणारे असावे.
*वधस्तंभावर खिळलेल्या ख्रिस्ताला ओळखणे हेच जगातील सर्वश्रेष्ठ ज्ञान आहे.*
No comments:
Post a Comment