Friday, 8 January 2021

जगावर नव्हे देवावर प्रीति करा



      *✨जगावर नव्हे देवावर प्रीति करा✨*


*जगावर व जगातल्या गोष्टीवर प्रीति करू नका. जर कोणी जगावर प्रीति करीत असेल तर त्याच्या ठायी पित्याची प्रीति नाही..✍*

           *( १ योहान २:१५)*


                           *...मनन...*


          *!!..परमेश्वराची स्तुती असो..!!*


     या अध्यायामध्ये वचन १५-१७ मध्ये जगाच्या खोट्या मार्गापासून पापवासनापासून दूर राहण्याविषयी आणि जगावर किंवा जगातील गोष्टींवर प्रीति करू नये अशी ताकीद दिली आहे. कारण जगावरील प्रीति ही पित्यावरील प्रीतीपेक्षा हीन आहे. जगाच्या प्रीतीमध्ये देहाची वासना, डोळ्यांची वासना आणि संसाराची फुशारकी आहे. येथे जग म्हणजे शब्दशः अर्थ, आपण राहातो तो ग्रह असा नाही तर जग म्हणजे मनुष्याने ख्रिस्ताशिवाय आनंद मिळविण्याची केलेली रचना किंवा सोय. त्यामध्ये सर्व जगीक गोष्टींचा समावेश होतो. मनोरंजन, नाटके, फॅशन, इत्यादि. म्हणजेच थोडक्यात येथे येशू ख्रिस्ताचे स्वागत होत नाही अशा गोष्टी. "मानवी समाज चुकीच्या तत्वावर उभा केला जातो आणि त्याचे लक्षण म्हणजे चुकीच्या अपेक्षा, खोटी मुल्ये किंवा अहंपणा." या पृथ्वीवरील जे सर्व काही पवित्र देवाच्या विरूद्ध आहे, त्यांस जग म्हटले आहे. कारण देवाला न आवडणाऱ्या गोष्टींनी हे जग भरलेले आहे. आणि अशा दुष्टाईने भरलेल्या जगामध्ये आपण राहात आहोत. दुष्टाईने भरलेल्या म्हणजेच ज्या देवापासून नाहीत अशा गोष्टी. वचन सांगते, *कारण जगात जे सर्व आहे ते, म्हणजे देहाची वासना, डोळ्याची वासना व संसाराविषयीची फुशारकी, ही पित्यापासून नाहीत, तर जगापासून आहेत. ( वचन १६)* देहाची वासना म्हणजे पाप करण्याची इच्छा. ही इच्छा शरीराने आणि डोळ्यांतून प्रगट होते आणि फुशारकी गर्विष्ठ मनामधून बाहेर पडते. ह्या वासनांप्रमाणे जो वागतो तो देवाच्या इच्छेविरूद्ध वागतो, देवाने मना केलेल्या गोष्टी करतो. आणि तो देवावर प्रीति करीत नाही. 


    वरील वचनानुसार पापांची विभागणी तीन प्रकारात केली आहे. *१) देहाची वासना, २) डोळ्यांची वासना, आणि ३) संसाराविषयी फुशारकी*

    कशाप्रकारे ते वचनाद्वारे आपण पाहू या - 


   *१) देहाची वासना -* देहाची वासना म्हणजे आपल्या ठायी असलेल्या वाईट स्वभावातून निर्माण होणारी वास्तविक शारीरिक भूक, देहाला होणारे मोह, लालसा, लोभ. आणि हे देहाचे हट्ट जेव्हा पुरविले जातात तेव्हा मनुष्य पाप करतो. पवित्र शास्रामध्ये आपण दोन उदाहरणे पाहातो, सैतानाने हव्वेला मोहात पाडले आणि देवाने मना केलेल्या झाडाचे फळ खाण्यास लावून देवाची आज्ञा मोडण्यास भाग पाडले. आणि पाप जगात आले. त्याचप्रमाणे आपण पाहातो की, आपला प्रभू येशू ख्रिस्त, जेव्हा चाळीस दिवस आणि चाळीस रात्री अरण्यांत अन्नपाण्याशिवाय उपाशी होता, तेव्हा सैतानाने त्याला मोहात पाडण्यासाठी, त्याची परिक्षा पाहिली आणि चाळीस दिवसांपासून भुकेलेल्या प्रभूला सांगितले, *तूं देवाचा पुत्र आहेस तर ह्या धोंड्यास भाकर हो असे सांग. ( लूक ४:३)* खरे तर अन्न ही शरीराची खूप महत्वाची गरज आहे. आणि प्रभूला भूकही लागलेली होती. आणि त्याला अशक्य असे काहीच नव्हते, तो स्वतःची भूक भागवू शकत होता. परंतु ख्रिस्ताने सैतानाला वचनाद्वारे उत्तर देऊन नमवले. प्रियांनो, भूक अनेक प्रकारची आहे, आणि ही भूक हीच आमची कमजोरी आहे. आणि सैतान आमची कमजोरी ओळखून त्यावरच हल्ला करीत असतो. जेणेकरून आम्ही त्याच्या मोहाला बळी पडून पाप करू. म्हणून आम्ही शारिरीक भूकेपेक्षा नैतिक भूक म्हणजेच देवाच्या आमच्याबाबतीत असलेल्या इच्छा पूर्ण करण्याकडे आपले लक्ष लावले पाहिजे.


   *२) डोळ्यांची वासना -* डोळ्यांची वासना म्हणजे आपण पाहातो त्यातून निर्माण होणारी अनैतिक इच्छा. हे जग डोळ्यांना मनोरम दिसणाऱ्या आणि मोहमयी गोष्टींनी भरलेले आहे. पावलापावलावर आम्हाला मोहात पाडणाऱ्या गोष्टी दिसून येतात. आपण पाहातो, दाविद राजा प्रभूने निवडलेला असा होता. तो खूप नीतिमान होता, परंतु *डोळ्यांच्या वासनेमुळे* तो पापात पडला. आणि बथशेबेशी व्यभिचार केल्यामुळे देवाच्या क्रोधास आणि शिक्षेस पात्र ठरला. ख्रिस्ताच्या बाबतीत सांगायचे तर सैतानाच्या पहिल्या मोहाला तो बळी न पडल्यामुळे त्याने दूसरे हत्यार बाहेर काढले आणि प्रभूला जगातील सर्व राज्यांचे वैभव दाखवून तो प्रभूला म्हणाला, *ह्यांवरचा सर्व अधिकार व ह्यांचे वैभव मी तुला देईन, कारण हे मला सोपवून दिले आहे व माझ्या मनास येईल त्याला मी हे देतो. म्हणून " तू मला नमन करशील तर हे सर्व तुझे होईल." ( लूक ४:६,७)* परंतु सैतानाच्या या मोहावरही प्रभूने पवित्र वचनाद्वारे विजय मिळविलेला आपणांस पाहावयास मिळते. प्रियांनो, आपले डोळे काय पाहातात त्याकडे आम्ही लक्ष दिले पाहिजे. आमच्या नेत्रांना चांगले तेच दिसावे ह्यासाठी जपले पाहिजे. चांगल्याचाच शोध घेतला पाहिजे.  डोळ्यांना सर्वच प्रकारच्या गोष्टी दिसतात, ज्या काही चांगल्या असतात तर काही वाईटही असतात. काही मनुष्याला मोहात पाडणाऱ्या, मोहक असतात. परंतु आम्ही आमचे लक्ष चांगल्या गोष्टींकडे लावले पाहिजे. आमची दृष्टी अशुद्ध, अपवित्र गोष्टींकडे लावू नये तर शुद्ध आणि पवित्र अशा आमच्या जिवंत देवाकडे आणि पवित्र वचनांकडे आम्ही आमची दृष्टी लावली पाहिजे.


   *३) संसाराविषयीची फुशारकी -* संसाराची फुशारकी म्हणजे स्वतःचे कौतुक करण्याची वृत्ती. मनुष्याला जगातील गोष्टी मिळविण्याची अभिलाषा असते. जगातील मोठेपणा, मानमरातब, स्तुती, प्रशंसा, लोकप्रियता, सत्ता, धनसंपत्ती ह्यामध्येच त्यांना जास्त स्वारस्य असते. नवीन करारामध्ये लूक बाराव्या अध्यायामध्ये आपण पाहातो एक धनवान मनुष्य, त्याच्या शेतात भरपूर पीक आल्यामुळे धान्याची कोठारे मोठी करून पुष्कळ वर्षे पुरेल इतके धान्य साठविण्याचे स्वप्न तो पाहातो आणि स्वतःच्या जिवाला म्हणतो, "विसावा घे, खा, पी, आनंद कर." परंतु त्याला हे माहीत नाही की कुठल्याही क्षणी तो मरू शकतो. *जो कोणी स्वतःसाठी द्रव्यसंचय करितो व देवविषयक बाबतीत धनवान नाही, तो तसाच आहे.* प्रभू येशू ख्रिस्ताविषयी जर पाहिले तर, सैतान आता शेवटचे शस्र बाहेर काढतो आणि त्याला यरूशलेमेत नेऊन मंदिराच्या शिरोभागी उभे करून म्हणतो, *तूं देवाचा पुत्र आहेस तर येथून खाली उडी टाक, कारण शास्रात असे लिहिले आहे की, तुझे रक्षण करण्यास तो आपल्या दूतांना तुझ्याविषयी आज्ञा देईल, आणि तुझा पाय धोंड्यावर आपटू नये म्हणून ते तुला हातांवर झेलून धरतील. ( लूक ४:९-११)* असे सांगण्यामागे सैतानाचा उद्देश होता की प्रसिद्धी मिळविण्यासाठी प्रभू असे करील. परंतु तो तर ह्या जगामध्ये प्रसिद्धी, नावलौकिक मिळवावा ह्यासाठी आला नव्हता, तर सर्वांना पापक्षमा व्हावी आणि सर्वांना सार्वकालिक जीवन मिळावे ह्यासाठी तो आला होता. त्यामुळे सैतानाच्या या मोहावरही प्रभूने विजय मिळविला. 


    सैतान ख्रिस्ताच्या उलट आहे, देह आत्म्याच्या उलट आहे म्हणून जग पित्याच्या उलट आहे. भूक, दृष्टी आणि महत्वाकांक्षा ही पित्यापासून नसून जगाची आहे. त्याचा उगम जगातून आहे. नाश होणाऱ्या गोष्टीत जगिकता असते. अशा गोष्टी मनुष्याला सुखी, समाधानी करू शकत नाहीत. प्रियांनो, आम्ही ह्या पापी वासनांच्या अधीन होऊन सैतानाला वश होऊ नये म्हणून सांभाळा. आम्ही वासनांमध्ये अडकून न पडता आमची दृष्टी आमच्या जिवंत प्रभू येशू ख्रिस्ताकडे लावू या. पवित्र वचनांचे मनन, चिंतन करू या, कारण वचनच असे शस्र आहे की ते प्रत्येक प्रसंगात आम्हाला मार्गदर्शन करते. आम्ही कसे आचरण करावे हे आम्हाला शिकविते. म्हणूनच स्तोत्रकर्ता म्हणतो, *तुझे वचन माझ्या पावलांकरिता दिव्यासारखे व माझ्या मार्गावर प्रकाशासारखे आहे. ( स्तोत्र ११९:१०५)*


     

No comments:

Post a Comment