Monday, 4 January 2021

येशूकडे लक्ष लावा



           *✨येशूकडे लक्ष लावा✨*


*आज जर तुम्ही त्याची वाणी ऐकाल, तर इस्राएल लोकांनी चीड आणली होती तशी तुम्ही आपली मने कठीण करू नका..✍*

                       *( इब्री ३:१५)*


                           *...मनन...*


          *!!..परमेश्वराची स्तुती असो..!!*


     बायबल आम्हाला शिकवते की, देवाच्या लोकांनी देवाबरोबर एकनिष्ठ राहावे आणि त्याच्यावर संपूर्ण विश्वास ठेवावा. आणि विश्वासाने आपला संपूर्ण भार त्याच्यावर टाकावा. कारण तो विश्वसनीय असा देव आहे. त्याची वचने सत्यवचने आहेत. भट्टीत सात वेळा तावून सुलाखून घेतलेली आहेत. *परमेश्वराची वचने शुद्ध वचने आहेत; भट्टीत सात वेळा शुद्ध करून जमिनीवरील मुशीत ओतलेल्या रुप्यासारखी ती आहेत. ( स्तोत्र १२:६)* परमेश्वराने मोशेद्वारे इस्राएल लोकांना कनान देश देण्याचे अभिवचन दिले होते. आपण दिलेल्या वचनानुसार देवाने त्यांना कनान देशाच्या जवळ नेले. तो देश हेरण्यासाठी मोशेने बारा हेरांना पाठविले होते, त्यातील दहा जणांनी परत येऊन त्या देशाविषयी अनिष्ट बातमी सांगितली. ते म्हणाले, *त्या लोकांवर स्वारी करण्यास आपण मुळीच समर्थ नाही, कारण ते आपणांहून बलाढ्य आहेत. ( गणना १३:३२)* तेव्हा सर्व इस्राएल लोकांनी गळा काढून विलाप केला आणि ते रात्रभर रडले. त्यांनी जिवंत देवावर विश्वास ठेवला नाही तर मनुष्यांवर विश्वास ठेवला. देवाने दिलेले अभिवचन ते विसरून गेले. त्यामुळे त्यांचा हा अविश्वास पाहून देवाचा क्रोध त्यांच्यावर भडकला आणि त्याने त्यांना शासन केले आणि चाळीस वर्षे रानात भटकावयास लावले. तो म्हणाला, *देश हेरावयाला जे चाळीस दिवस लागलेत्यातील प्रत्येक दिवसामागे एक वर्ष ह्या हिशोबाने चाळीस वर्षे तुम्ही आपल्या दुष्कर्माचा भार वाहाल, आणि माझा विरोध तुम्हांला भोवेल. ( गणना १४:३४)* आणि आपण पाहातो की, जे दहा हेर कनान देश हेरावयास जाऊन अनिष्ट बातमी घेऊन आले होते, ते सर्व मृत्यु पावले. *ते देशाची अनिष्ट बातमी देणारे पुरूष परमेश्वरासमोर मरीने मृत्यु पावले. ( गणना १४:३७)*


   इस्राएल लोकांनी आपल्या वर्तनाने देवाला चीड आणली. देवाच्या खरेपणाची त्यांनी परिक्षा पाहिली. त्यांचे लक्ष आपल्या उद्धारक पित्याकडे त्यांनी लावले नाही आणि देव जो मार्ग, सत्य व जीवन त्या देवाचे मार्ग समजून घेतले नाहीत. आणि त्यामुळेच परमेश्वराने त्यांना देऊ केलेल्या वचनदत्त भूमीत ते जाऊ शकले नाहीत. आणि देव जो विसावा त्यांना त्या देशात देणार होता, त्या देशात ते गेले नाहीत. आम्ही ख्रिस्तावर विश्वास ठेवून, अवलंबून राहून त्याच्या आज्ञा पाळीत नाही तेव्हा आम्ही आमचा त्याच्यावरचा अविश्वास प्रगट करीतो. आणि ह्या अविश्वासामुळेच त्यांना आत येता आले नाही. वचन सांगते, *जिवंत देवाला सोडून देण्याइतके अविश्वासाचे दुष्ट मन तुम्हांतील कोणाचेंहि असू नये म्हणून जपा. ( वचन १२)* 


    आमचे दुबळेपण म्हटले तर हेच आहे. आम्ही ख्रिस्ताकडे आणि त्याच्या सामर्थ्याकडे लक्ष लावण्याऐवजी स्वतःकडे व स्वतःच्या दुर्बलतेकडे, स्वतःच्या अशक्तपणाकडेच लक्ष लावतो. जिवंत देवाबद्दल अविश्वास दाखविणे म्हणजे त्याला सोडणे होय. जिवंत देवाला सोडण्याइतके आम्ही आमचे मन कठीण करू नये. ज्यांनी ख्रिस्ताचा आपला तारणारा म्हणून स्वीकार केला आहे, ते त्याच्याबरोबर स्वर्गीय आशीर्वादांचे भागीदार आहेत. म्हणून त्याच्यावर विश्वास ठेवला पाहिजे आणि त्याच्या अभिवचनांवरही विश्वास ठेवला पाहिजे. त्याने आपल्याला त्याच्या विसाव्यात येण्याचे आमंत्रण दिले आहे. इस्राएल लोकांना देवामधील ह्या परिपूर्ण विसाव्यामध्ये आणि विश्वासामध्ये नेण्यास यहोशवाला जमले नाही, परंतु आता प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे ते साध्य झाले आहे. म्हणून आम्ही स्वतःच्या सामर्थ्याने प्रयत्न करणे सोडून देऊन आमचा सर्व भार ख्रिस्तावर टाकून देऊ या. आणि वचनदत्त भूमीमध्ये विश्वासाने प्रवेश करू या. ख्रिस्ताला स्वतःचे संपूर्ण समर्पण करू या. 


*"जो माझे वचन ऐकतो आणि त्याप्रमाणे करतो, तोच खरा विश्वासणारा आहे."*


       

No comments:

Post a Comment