*✨तुमचे अंतःकरण कोणते ?✨*
*ज्यांना पश्चातापाची गरज नाही अशा नव्याण्णव नीतिमानांबद्दल होणाऱ्या आनंदापेक्षा पश्चाताप करणाऱ्या एका पापी माणसाबद्दल स्वर्गात अधिक आनंद होईल..✍*
*( लूक १५:७ )*
*...मनन...*
*!!..परमेश्वराची स्तुती असो..!!*
प्रभू येशूने या अध्यायामध्ये उधळ्या पुत्राची गोष्ट सांगून पश्चाताप करणाऱ्याचे उत्कृष्ठ उदाहरण सांगितले आहे. आणि क्षमा करण्याविषयी सांगितले आहे. या गोष्टीमध्ये आपल्याला तीन स्वभाव दिसून येतात. ते स्वभाव कोणते आहेत ते आपण वचनाद्वारे पाहूया -
*१) पश्चातापी अंतःकरण -* आपण पाहातो की, धाकट्या मुलाने हट्टाने बापाच्या संपत्तीतून आपला हिस्सा मागून घेतला आणि बापापासून दूर गेला. त्या दूर देशात मनाच्या इच्छेप्रमाणे वागला. चैनबाजी आणि उधळपट्टी यामुळे लवकरच त्याला दारिद्र्य आले. असे करताना त्याने पाप केले. शेवटी, डूकरे राखण्याचे हलके काम करावे लागले, डूकरे यहूदी माणसाला निषिद्ध आहेत. तो एकटाच होता, त्याच्यावर प्रीति करणारा कोणीच नव्हता. अशा हरवलेल्या आणि निराश अवस्थेत त्याला पश्चाताप झाला. त्याला त्याच्या स्थितीची जाणीव झाली, तो शुद्धीवर आला. त्याला त्याच्या बापाची प्रीती आठवली. परंतु आता त्यांचा मुलगा म्हणवून घेण्याची आपली लायकी नाही तर आता केवळ त्यांचा दास होऊन परत घरी जावे असे त्याने ठरवले. तो म्हणाला, *"मी आहे तसाच बापाकडे जाईन व आपले पाप कबूल करून क्षमेची याचना करीन."* तो उठला व त्याच्या बापाकडे निघाला. त्याने पश्चाताप केला, विनम्र कबूली दिली, मागे फिरण्याची इच्छा व्यक्त केली आणि दयेची याचना केली.
*२) क्षमा करणारे प्रीतीचे अंतःकरण -* मनापासून केलेल्या पश्चातापाला परमेश्वर क्षमा करतो. जरी तो त्याच्या पित्यापासून दूर गेला होता, तरीही त्याच्या पित्याची प्रीति कमी झाली नव्हती. निराश न होता तो पिता आपल्या मुलाची वाट पाहात होता. आपल्या पश्चातापी मुलाचा किती प्रेमाने त्याने स्वीकार केला. धावत पूढे जाऊन मुलाला त्याने आपल्या कवेत घेतले. आपल्या मुलाच्या पश्चातापी अंतःकरणाची खूण त्याला पटली आणि मोठ्या आनंदाने त्याने त्याला क्षमा केली. मुलाच्या पश्चातापाचा त्याने उत्सव केला, मुलगा परत आला म्हणून त्याने मोठी मेजवानी केली. उत्तम झगा, अंगठी व जोडा ही दासाच्या नव्हे तर पुत्राच्या अधिकाराची चिन्हे त्यांस लेवविली. आम्ही विश्वासणारेही कधी कधी बहकतो आणि देवापासून दूर जातो, परंतु जो कोणी पश्चातापी अंतःकरणाने देवाकडे येईल त्याला देव त्याचे पाप कितीही मोठे असले तरी क्षमा करतो. पश्चाताप करील त्यालाच पापक्षमेचा आनंद आणि समाधान मिळते.
*३)पश्चातापाची गरज नसलेले व कुरकुर करणारे अंतःकरण -* हा मोठा भाऊ, ज्याने धाकट्या भावाच्या आनंदात सामील होण्याचे नाकारले. उलट त्याच्या पापाविषयी बोलून त्याला तुच्छ लेखीत होता. आणि पित्याने दिलेल्या मेजवानीबद्दल कुरकुर करीत होता. पित्याने आपल्यासाठी कधीच अशी मेजवानी केली नाही म्हणून तो पित्याला दोष देत आहे. घरात आहे ते सर्व त्याचेच आहे असे पित्याने त्याला सांगितले. *एखादा अगदी घरात राहूनही हरवलेला असू शकतो.* तो स्वतःला खूप नीतिमान समजत होता. बापाबरोबर आनंद करण्यास तो तयार नव्हता. स्वतःला धार्मिक समजून ज्या विश्वासणाऱ्याला स्वतःची पापे दिसत नाहीत तो पश्चाताप करीत नाही. तो देवपित्याच्या आशीर्वादाच्या आनंदात सहभागी नसतो. हा भाऊ धर्मपूढाऱ्यांचे प्रतिक आहे. जे उपेक्षित आहेत अशा लोकांविषयीची आपली वृत्ती त्यांनी बदलावी म्हणून प्रभूने या दाखल्यातून त्यांना बोध केला.
*देवाची क्षमा आणि प्रीती स्वीकारली तरच आपल्याला प्रेम आणि क्षमा करण्यास सक्षम होता येते. आणि प्रभू दया व क्षमा करण्यास आपल्या आत्म्याच्या द्वारे आम्हाला सामर्थ्य पुरवतो.*
No comments:
Post a Comment