*✨इस्राएलाचा आज्ञाभंग✨*
*मी त्या लोकांना तुमच्यासमोरून घालवून देणार नाही, ते तुमच्या कुशीला कांट्यांसारखे होतील आणि त्यांचे देव तुम्हाला पाश होतील..✍*
*( शास्ते २:३)*
*...मनन...*
*!!..परमेश्वराची स्तुती असो..!!*
आपण पाहातो की, यहोशवा मरण पावला तेव्हा इस्राएलावर कोणी राजा नव्हता. त्यामुळे जो तो आपल्याला योग्य दिसेल तसे करीत असे. ( शास्ते १७:६) *एकच सत्य देव आहे हे सत्य जगाला जाहीर करण्यासाठी देवाने आपल्याला निवडले आहे* हा परमेश्वराचा हेतू इस्राएली लोक विसरून गेले. आणि परमेश्वराची सेवा करण्याचे सोडून आपल्या भोवतालच्या राष्ट्रांच्या दैवतांच्या ते भजनी लागले. म्हणून त्यांच्या पापांची शिक्षा म्हणून देव त्यांना त्या त्या राष्ट्रांच्या हाती देत असे. आणि मग ह्या नव्या शत्रूंच्या जूलूमाला, जाचाला कंटाळून, त्रस्त होऊन ते परत परमेश्वराचा धावा करीत असत, देवाकडे वळत आणि परमेश्वर त्यांची दया येऊन त्यांची त्या शत्रूंपासून सूटका करण्यासाठी वेळोवेळी एक शास्ता पाठवत असे. परंतु थोड्याच दिवसांनी ते परत देवापासून दूर जात असत. त्यांच्या जीवनाकडे पाहून लक्षात येते की, जे लोक आपल्या आयुष्यातील अनमोल वेळ देवाची अवज्ञा करण्यात घालवितात त्यांचे कधीच चांगले होत नाही, देवाकडून मिळणाऱ्या आशीर्वादांना ते मुकतात. *समर्पित नसलेल्या प्रत्येक जीवनाचे अगदी असेच होते.*
परमेश्वराने आज्ञा केल्याप्रमाणे इस्राएल लोक वागले नाहीत. तर त्यांनी पुन्हा पुन्हा त्याच्या आज्ञा मोडल्या. म्हणून परमेश्वराचा दूत त्यांना म्हणत आहे की, *तुम्ही ह्या देशातील रहिवाश्यांशी काही करारमदार करू नका, तुम्ही त्यांच्या वेद्या मोडून टाका, असे मी तुम्हाला म्हणालो होतो, पण तुम्ही माझी वाणी ऐकली नाही, तुम्ही हे काय केले ? ( शास्ते २:२)* परमेश्वराच्या आज्ञा न पाळल्यामुळे अनेक वेळा इस्राएलाचा नाश होण्याचा प्रसंग आला परंतु परमेश्वराच्या दयेमुळे प्रत्येक वेळी त्यांचा बचाव झाला. आमच्या देवावरील अविश्वासामुळे आणि आम्ही त्याचे आज्ञापालन न करण्यामुळे जे परिणाम होतात त्यांच्यावरूनच देव आमच्या पापांचे आणि आमच्या दुर्बलतेचे माप आमच्या पदरात घालतो. परंतु परमेश्वर खूप चांगला आहे. तो आमच्याशी त्याने केलेला करार कधीही विसरत नाही. तो आमच्यावर दया करण्याचे कधीही विसरत नाही आणि म्हणून *तो आमचे सर्व दुबळेपण, आमचे अपराधीपण, आम्ही करत असलेला आज्ञाभंग, आमची पापे हे सर्व विसरून आम्हाला पुन्हा स्वतःकडे ओढून घेतो.*
आम्ही देवाचे पवित्र लोक आहोत, हे देवाने निवडलेल्या लोकांनी समजून घेऊन त्याप्रमाणे आचरण करावे अशी देवाची इच्छा होती. त्यांनी भोवतालच्या लोकांमध्ये मिसळायचे नव्हते, कारण देवाने वेगळे केलेले असे ते होते. त्यांनी देवासमीप राहून पाप आणि अधार्मिकता यांच्याविरूद्ध लढले पाहिजे होते, त्यासाठी देवाने आम्हाला शस्रसामुग्री दिली आहे. ( इफिस ६:१०-१८) परंतु त्यांनी मूर्तिपूजा करून देवाची आज्ञा मोडली. आणि देवाच्या निवडलेल्या लोकांचे पतन झालेले, अधःपात झालेला आपल्याला पाहावयास मिळतो. वचन सांगते की, त्यांच्यावर परमेश्वराचा कोप भडकला आणि तो म्हणाला, *मी ह्या राष्ट्रांच्या पूर्वजांशी केलेला करार ह्याने मोडला आहे आणि माझी वाणी ऐकली नाही. म्हणून मी यहोशवाच्या मृत्युसमयी उरलेल्या राष्ट्रांपैकी कोणालाहि मी देखील येथून पूढे त्यांच्यासमोरून घालवून देणार नाही. पण त्यांच्याकरवी मी इस्राएलाची परिक्षा करीन आणि त्यांचे पूर्वज माझ्या मार्गाने चालत होते त्याप्रमाणेच ते चालतात की नाही हे पाहीन. ( शास्ते २:२०-२२)*
प्रियांनो, मनुष्य देवापासून दूर गेला तरी देव सदोदित त्यांच्याजवळ असतो. त्याचा धावा करणाऱ्यांना तो उत्तर देतो. आज्ञा मोडणाऱ्या आपल्या लेकरांकडेही त्याचे नेहमी लक्ष असते. कारण तो आम्हांवर खूप प्रीति करतो आणि कधीही सोडून व टाकून न देण्याचे अभिवचन त्याने आम्हाला दिले आहे. आम्ही देवाच्या आज्ञांचे नेहमी पालन करावे, कधीही आज्ञाभंग करू नये.
*जेथे पाप वाढले तेथे कृपा त्यापेक्षा विपूल झाली. ( रोम ५:२०)*
No comments:
Post a Comment