*✨आशीर्वादित जीवन ✨*
*कारण जी भूमी आपणावर वारंवार पडलेला पाऊस पिऊन आपली लागवड करणाऱ्यांना उपयोगी अशी वनस्पती उपजविते , तिला देवाचा आशीर्वाद मिळतो..✍*
*(इब्री ६:७)*
*..मनन..*
*!!..परमेश्वराची स्तुती असो..!!*
आपण वाचतो की,परमेश्वराने तिसऱ्या दिवशी जलसंचय आणि कोरडी जमीन दृष्टीस पडो असे बोलले तेव्हा तसे झाले. त्याने जलसंचयाला समुद्र म्हटले आणि कोरड्या जमिनीला भूमी म्हटले. परमेश्वराने त्या जमिनीवर वनस्पती उगवण्यासाठी पाऊस पाडला नव्हता हे आपण उत्पत्तीच्या दूसऱ्या अध्यायात वाचतो. म्हणजे जमिनीवर वनस्पती किंवा फळझाडे उगवण्यासाठी पावसाची आवश्यकता होती. जमिनीवर पाऊस पडल्याशिवाय कोणतीही हिरवळ, फळ देणारी वनस्पती, फळझाडे उगवू शकत नाही. कारण पाण्याशिवाय काहीच होऊ शकत नाही. आपण वचनात वाचतो की परमेश्वराने जेव्हा एदेन बाग लावली तेव्हा त्या ठिकाणी त्या बागेला पाणी देण्यासाठी एका नदीचा उगम झाला. म्हणजेच कोरडी जमीन, त्यावर फळ देणारी वनस्पती, हिरवळ येण्यासाठी पाण्याची गरज... आणि पाणीपुरवठा होण्यासाठी पाऊस ! जमीन म्हणजे आपले अंतःकरण, ज्याला आपण हृदयही बोलतो. आपल्या अंतःकरणात देखील फळ येण्यासाठी पाण्याची आवश्यकता आहे. आणि पाण्याचा पुरवठा होण्यासाठी पावसाची. पाऊस हवा आहे, एक वर्षाव हवा आहे! तेव्हाच आपली अंतःकरणरुपी जमीन भरपूर पीक देईल. हा वर्षाव म्हणजेच पवित्र आत्म्याचा वर्षाव! योएल मध्ये आपण वाचतो की, *"परमेश्वर म्हणतो... मी माझ्या आत्म्याचा वर्षाव करीन."* पवित्र आत्म्याच्या वर्षावाची आपणांस गरज आहे तेव्हाच आपली जमीन, आपले अंतःकरण चांगल्या प्रकारे फळ देऊ शकते, चांगल्या प्रकारचे वनस्पती म्हणजेच स्वभाव आपल्यात दिसू शकतात. पवित्र आत्म्याच्या द्वारे मिळणारा आनंद सर्वात मोठा आनंद आहे. नेहमी आपण आत्म्याने भरले पाहिजे. रोज नवीन अभिषेक प्राप्त केला पाहिजे. रोज अभिषेकाने भरणे म्हणजे आपल्या अंतःकरणरुपी जमिनीची मशागत करणे. कुठल्याही काटेकुसळेरुपी पाप, अशुद्धता आपल्या अंतःकरणात न ठेवणे. जशी भूमी वारंवार पडलेल्या पावसाने जो लागवड करतो त्यास उपयोगी अशी वनस्पती उपजविते, तसेच आपणही जेव्हा जेव्हा देवाचे वचन, पवित्र आत्म्याच्या अभिषेकाने आपणही चांगले पीक देणारे बनू शकतो.
जी भूमी म्हणजेच जे अंतःकरण, चांगले आहे, सालस आहे, कठीण नाही तर कोमल आहे, त्या अंतःकरणात प्रभूच्या वचनाची लागवड केली असता वारंवार देवाची वचने, संदेश, सुवार्ता ऐकून ते अंतःकरण देवाला संतोषविणारे असे प्रतिफळ देते. पेरणारा बी पेरितो तेव्हा, *काही चांगल्या जमिनीत पडले, ते उगवून शंभरपट पीक आले. ( लूक ८:८)* त्याप्रमाणेच जो देवाचे वचन ऐकतो, ते ग्रहण करितो आणि त्याप्रमाणे आचरण करितो तो परमेश्वराच्या पसंतीस उतरतो. आणि परमेश्वराचा आशीर्वाद त्याला प्राप्त होतो, स्तोत्रकर्ता म्हणतो की, *जे झाड पाण्याच्या प्रवाहाजवळ लाविलेले असते, जे आपल्या हंगामी फळ देते, ज्याची पाने कोमेजत नाहीत, अशा झाडासारखा तो आहे, आणि जे काही तो हाती घेतो ते सिद्धीस जाते. ( स्तोत्र १:३)*
म्हणून आपणही वचनांचा पाऊस आपणावर वारंवार पडूनही कोरडे, कठीण ह्रदयाचे राहू नये, आणि कांटेकुसळे उपजविणाऱ्या भूमीसारखे होऊ नये कारण तिचा नाश ठरलेला आहे. आपल्याला तर देवाने सार्वकालिक जीवन मिळावे ह्यासाठी निवडलेले आहे, पाचारण केलेले आहे. असे लिहिले आहे की, *ज्यांना एकदा प्रकाश मिळाला, ज्यांनी स्वर्गीय दानांची रूची घेतली, जे पवित्र आत्म्याचे वाटेकरी झाले. ( इब्री ६:४)* ते जर पतित झाले तर, *ते देवाच्या पुत्राला स्वतःपूरते नव्याने वधस्तंभावर खिळतात व त्याचा उघड अपमान करितात. ( इब्री ६:६)* म्हणून आपण आपले आचरण देवाला सर्वस्वी मान्य होणारे असे ठेवावे. कारण आपण त्याची आशीर्वादित केलेली अशी लेकरे आहोत, शंभरपट पीक देणारी देवाची संतती आहोत. आमच्या जीवनाद्वारे प्रभूचे गौरव व्हावे ह्यासाठी आम्हाला निवडलेले आहे. आम्ही सदोदित आमच्या देवाचे गौरव करावे, स्तुती करावी. कारण आमच्या जीवनात आमच्या प्रभूचे खूप मोठे आणि महत्वाचे स्थान आहे.
No comments:
Post a Comment