*✨आनंद न करण्याची ताकीद✨*
*तुझा वैरी पडला तर त्याबद्दल आनंद मानू नको, तो जमीनदोस्त झाल्याने तुझे मन उल्लासू नये..✍🏼*
*( निती २४:१७)*
*...मनन...*
*!!..परमेश्वराची स्तुती असो..!!*
आपण इतरांच्या आनंदामध्ये जसे सहभागी होतो, तसेच आम्ही त्यांच्या दुखाःतही सहभागी झाले पाहिजे. बायबल मध्ये आपण वाचतो की बऱ्याच ठिकाणी आपल्याला आनंद करा म्हणून सांगण्यात आले आहे. परंतु ही किती सुंदर आणि विलक्षण शिकवण आहे की आनंद करू नका. असे कोणीच कोणाला सांगत नाही. पण बायबल सर्व गोष्टींचे सखोल शिक्षण देणारा पवित्र ग्रंथ आहे. मनुष्याच्या जीवनात प्रत्येक क्षणी त्याचे वर्तन, त्याचे आचरण कसे असावे हे फक्त बायबलच आम्हाला शिकविते. दूसऱ्याचे वाईट झाले हे पाहून आनंद करणे म्हणजेच आपण त्या व्यक्तीचे अधिक वाईट चिंतने होय. स्तोत्रकर्ता त्याबद्दल जी शिक्षा होणार आहे ते ही सांगत आहे. तो म्हणतो, *जर उल्लासले तर परमेश्वर पाहील आणि त्याला ते आवडणार नाही आणि तो त्याच्यापासून आपला क्रोध फिरवील. ( नीति २४:१८)*
जून्या करारात आपण वाचतो की, अम्मोनी लोकांनीही असेच केले. परमेश्वर म्हणतो, *"माझे स्थान अपवित्र करण्यात आले, इस्राएल देश ओसाड करण्यात आला, यहूदाचे घराणे बंदिवान करून नेण्यात आले तेव्हा, तूं वाहवा केली. तू इस्राएल देशाविषयी टाळ्या पिटल्यास, थैथै नाचलास व त्याची दुर्दशा पाहून तू मनापासून द्रोहपूर्वक आनंद केलास." ( यहेज्केल २५:३,६ )* परमेश्वराने अम्मोन्यांविषयी रागावून पूढे त्यांना मोठी शिक्षा करीत आहे असे पाहावयास मिळते. परमेश्वर म्हणतो की, *म्हणून पाहा, मी आपला हात तुजवर उगारीन, मी तुला राष्ट्रांच्या हाती लूट म्हणून देईन, तुझा राष्ट्रांतून उच्छेद करीन, देशामधून तुला नाहीसे करीन, तुला मी नष्ट करीन, तेव्हा तुला समजेल की मी परमेश्वर आहे. ( यहेज्केल २५:७)* किती घोर परिणाम अम्मोन्यांना भोगावे लागले. देवाच्या असंतोषाला, क्रोधाला त्यांना तोंड द्यावे लागले.
प्रियांनो, आपल्या शेजाऱ्यावर जेव्हा आपत्ती येते किंवा तो जेव्हा अडचणीत सापडतो, संकटात सापडतो तेव्हा आपण काय करतो ह्याकडे आम्ही लक्ष दिले पाहिजे. कारण कधी कधी असे होते की शेजारी जर चांगला असेल तर त्याचे साहाय्य करण्याचे आपण ठरवतो परंतु शेजारी जर त्रास देणारा, किंवा तुसडा असेल तर त्याच्याकडे दुर्लक्ष केले जाते आणि कधी कधी त्याच्यावर आलेल्या ह्या प्रसंगाबद्दल, विपत्तीबद्दल आनंद व्यक्त केला जातो, त्याचा उपहास केला जातो. आपले हे करणे पूर्णपणे चुकीचे आहे. कारण आपल्याला प्रभूने अशी आज्ञा दिली आहे की, वैऱ्यांवरही प्रीति करा. प्रभू म्हणतो की, *मी तर तुम्हांस सांगतो, तुम्ही आपल्या वैऱ्यांवर प्रीति करा आणि जे तुमचा छळ करितात त्यांच्यासाठी प्रार्थना करा. ( मत्तय ५:४४)* असे करून आपण आपल्या प्रभूच्या परिपूर्ण प्रीतीचे अनुकरण करतो. कारण असे लिहिले आहे की, *ह्यास्तव जसा तुमचा स्वर्गीय पिता पूर्ण आहे तसे "तुम्ही पूर्ण व्हा." ( मत्तय ५:४८)*
होय प्रियांनो, आपण ही आपल्याला आपल्या प्रभूने शिकविल्याप्रमाणे चालले पाहिजे, आणि इतरांच्या संकटात, दुःखात, विपत्तीत, अडचणीत, त्यांच्या कठीण परिस्थितीमध्ये आम्ही आनंद मानू नये तर त्यांना आम्ही साहाय्य केले पाहिजे. आणि प्रभूने सांगितले तसे एकमेकांवर, शेजाऱ्यांवर आणि आपले जे वाईट करण्याचे योजितात अशा शत्रूंवरही प्रीति केली पाहिजे. आणि आमच्या प्रभूसारखे आम्हीही परिपूर्ण झाले पाहिजे. परमेश्वर म्हणतो, *"तू आपल्या भावाचा संकटसमय व त्याच्या विपत्तीचा दिवस पाहून संतोष मानू नकोस आणि यहूदाच्या वंशजांना नाशसमय प्राप्त झाला असता तुला आनंद वाटू देऊ नकोस; संकटाच्या दिवशी ताठ्याने बोलू नकोस". ( ओबद्या १:१२)*
No comments:
Post a Comment