Tuesday, 26 January 2021

रक्तात सुरक्षा



                *✨रक्तात सुरक्षा✨*


*...ज्या ज्या घराच्या कपाळपट्टीवर व दोन्ही बाह्यांवर रक्त लावलेले परमेश्वर पाहील ते ते दार तो ओलांडून जाईल आणि नाश करणाऱ्याला तुमचा नाश करण्यासाठी तुमच्या घरात शिरू देणार नाही..✍🏼*

                  *( निर्गम १२:२३ )*


                           *...मनन...*


           *!!..परमेश्वराची स्तुती असो..!!* 


     परमेश्वराने इस्राएल लोकांना मिसर देशातील गुलामगिरीतून सोडविण्यासाठी मोशेला निवडले होते. मोशेने फारोला पुन्हा पुन्हा विनवून सांगितले होते. फारोचे मन पालटावे व त्याने देवाच्या लोकांना जाऊ द्यावे यासाठी देवाने मिसर देशावर नऊ पीडा पाठविल्या परंतु प्रत्येक पीडेच्या आगमनाने फारोचे हृदय अधिकच कठीण होत गेले. अखेरीस मिसर देशातील सर्व प्रथम वत्स मरतील असे देवाने सांगितले. परंतु देवाने त्याच्या लोकांना मात्र यातून वाचविले. इस्राएल लोकांनी वल्हांडणाचा कोकरा वधला नसता आणि त्याच्या उद्धारक रक्ताने त्यांना संरक्षण मिळाले नसते तर तेही या पीडेतून सूटले नसते. देवाने त्याच्या लोकांना कोकरू घेऊन वल्हांडणाचा यज्ञपशू अर्पण करण्यास सांगितले होते. तो कशाप्रकारे अर्पण करावा हे सांगितले होते. *"नंतर एजोब झाडाची एक जूडी घेऊन ती पात्रातील रक्तात बुचकळावी आणि तिने त्यातले रक्त दरवाजाच्या कपाळपट्टीला व दोन्ही बाह्यांना लावावे, आणि सकाळपर्यंत कोणीही घराच्या दाराबाहेर जाऊ नये." ( निर्गम १२:२२)* मृत्यूची पीडा मिसर देशावर येणार होती. इस्राएली लोकांतील जेष्ठ पुत्रांना जिवंत ठेवण्याची योजना देवाच्या न्यायीपणाची साक्ष देते. ते कोकरू व त्याचे रक्त येशू ख्रिस्ताचे व त्याच्या वधस्तंभावर सांडलेल्या रक्ताचे दर्शक आहे. ही पीडा देवाच्या आणि त्याच्या लोकांच्या शत्रूंकरिता होती व त्यांच्यासाठी ती मिसर देशाच्या इतिहासातील काळरात्र ठरली. आपणांपैकी कोणी मृत्यूच्या सत्तेत आहात काय? जर आपल्या पापांची क्षमा झालेली नसेल तर आपण या सत्तेत आहोत.

    आपला प्रभू येशू ख्रिस्ताचे पापांसाठी यज्ञार्पण होऊन त्याच्या अर्पणाद्वारे तो मनुष्यजातीचे देवाबरोबरचे नाते यात समेट घडवून आणणार होता. वल्हांडण सणाचा मुख्य उद्देश देवाची इस्राएल वरील कृपा, प्रेम, अनुग्रह प्रकट करणे हाच होता. इस्राएल लोक देवाच्या कृपेस पात्र होते म्हणून त्याने त्यांना मिसर देशातून बाहेर आणले असे नाही तर त्याची त्यांच्यावर प्रीति होती आणि तो आपले अभिवचन पूर्ण करण्यास बांधील होता. वचन सांगते, *परमेश्वराने तुम्हाला पराक्रमी हाताने दास्यगृहातून.. ह्याचे कारण हेच की, तुमच्यावर त्याचे प्रेम आहे, आणि तुमच्या पूर्वजांना त्याने जे शपथपूर्वक वचन दिले होते ते पूर्ण करण्याची त्याची इच्छा आहे. ( अनुवाद ७:८)*

     दाराच्या बाह्यांवर लावलेल्या रक्ताचा उद्देश इस्राएल लोकांतील प्रत्येक कुटूंबातील प्रथम जन्मलेल्या पुत्राचे मृत्यूपासून रक्षण करणे हाच होता. भविष्यामध्ये ख्रिस्त वधस्तंभावर आपले रक्त सांडणार होता, दारावर लावलेले रक्त हे याचेच दर्शक होते. त्याच्या रक्ताने आध्यात्मिक मरण आणि पापाचा अंतिम न्यायदंड यांच्यापासून आमचा बचाव करणे हाच उद्देश यामागे होता. *नियमशास्त्राने सर्व काही होते आणि रक्त ओतल्यावाचून पापक्षमा होत नाही. ( इब्री ९:२२)* वल्हांडणाचे कोकरू हे प्रथम पुत्राच्या बदली यज्ञ म्हणून अर्पण केले गेले, ख्रिस्ताने आमच्या ऐवजी कसे अर्पण केले हे या यज्ञार्पणातून समजते. देवाच्या विरूद्ध पाप केल्याने आम्ही मरणदंडास पात्र होतो परंतु ख्रिस्त वधस्तंभावर मरण पावला आणि त्याने आमची शिक्षा स्वतःवर घेतली. म्हणूनच पौल ख्रिस्ताला *"वल्हांडणाचा यज्ञपशू*" म्हणत आहे. पौल म्हणतो, *... कारण आपला "वल्हांडणाचा यज्ञपशू" जो ख्रिस्त त्याचे आपल्यासाठी अर्पण झाले. ( १ करिंथ ५:७)* वल्हांडणाचे कोकरू नर निर्दोष, दोषरहित असणे आवश्यक होते. कोकरू हे देवाच्या परिपूर्ण, पापरहित पुत्राचे, ख्रिस्ताचे प्रातिनिधिक आहे. दाराच्या दोन्ही बाह्यांना रक्त लावणे ही आज्ञाधारकपणाची व विश्वासाची कृती होती. इस्राएल लोकांचा बचाव या त्यांच्या विश्वासाने आज्ञापालन करून केलेल्या कृतीमुळेच झालेला आपण पाहातो. या विश्वासामुळेच म्हणजे विश्वासाने आज्ञापालन केल्यानेच आम्हालाही आध्यात्मिक स्वातंत्र्य मिळावे आणि आमचे तारण व्हावे याचसाठी ख्रिस्ताने आपले रक्त सांडले. आम्ही त्या अनमोल रक्ताची आठवण ठेवावी. प्रियांनो, तुमच्या हृदयरूपी दारावर कोकऱ्याच्या रक्ताचा शिक्का लावला आहे का? आम्हाला देवाने नाशापासून वाचविण्यासाठी निवडले आहे. म्हणून आम्ही ख्रिस्ताच्या रक्ताच्या सुरक्षेच्या बाहेर जाऊ नये. 


         

No comments:

Post a Comment