*✨ख्रिस्त सर्वांसाठीच✨*
*मग तिने त्याला उत्तर दिले, खरे आहे महाराज, तरी घरची कुत्रीहि मेजाखाली मुलांच्या हातून पडलेला चूरा खातात..✍*
*( मार्क ७:२८ )*
*...मनन...*
*!!..परमेश्वराची स्तुती असो..!!*
येथे इस्राएलसाठी 'मुले' हा शब्द वापरला आहे. तारणाचा संदेश आणि आध्यात्मिक तारणाची योजना ही प्रथम इस्राएल लोकांना सांगितली पाहिजे असे येशू लोकांना शिकवत होता. प्रभू येशू सोर प्रांतात गेला असता त्या भागातील एक कनानी बाई जिच्या मुलीला अशुद्ध आत्मा लागलेला होता तिने येऊन त्याला त्या मुलीतून भूत काढून टाकण्याची विनंती केली. ती म्हणाली, *"हे प्रभो, दावीदाचे पुत्र, माझ्यावर दया करा. माझी मुलगी भूताने फारच जर्जर केली आहे." ( मत्तय १५:२२)* परंतु आपण पाहातो की ख्रिस्ताने प्रथम तिच्याकडे लक्ष दिले नाही. आणि तिला काहीच उत्तर दिले नाही. परंतु जेव्हा शिष्यांनी त्याला तिला पाठवून द्यावे म्हणून विनंती केली तेव्हा प्रभूने उत्तर दिले की, *"इस्राएलाच्या घराण्यातील हरवलेल्या मेंढरांखेरीज इतर कोणाकडे मला पाठविलेले नाही." ( मत्तय १५:२४)* त्या स्त्रीला त्याचे म्हणणे पटते तरीही ती सुज्ञतेने आणि चिकाटीने विनंती करत राहते ह्यावरून तिचा प्रभूवरचा विश्वास दिसून येतो. तिने अजूनही चिकाटी न सोडता प्रभूच्या पाया पडून म्हटले, *प्रभूजी, मला साहाय्य करा.* तेव्हा परत त्याने उत्तर दिले की, *"मुलांना प्रथम तृप्त होऊ दे, कारण मुलांची भाकरी घेऊन घरच्या कुत्र्यांना टाकणे ठीक नाही." ( मार्क ७:२७)* ह्यावर तिने उत्तर दिले, *"खरेच, प्रभूजी, तरी घरची कुत्रीहि आपल्या धन्याच्या मेजावरून पडलेला चूरा खातात." ( मत्तय १५:२७)*
प्रियांनो, आपण पाहातो की प्रभूने कधीच भेदभाव केला नाही. तर त्याने त्याच्याकडे येणाऱ्या सर्वांना आरोग्य दिले, सर्वांच्या समस्या सोडवल्या. असे असतानाही एकदा नाही तर दोन वेळा प्रभूने तिच्या मुलीला आरोग्य देण्यास नकार दिला. इतकेच नाही तर तिची तुलना कुत्र्याशी करून तिचा अपमानही केला. असे आपल्या प्रभूने का केले असेल ? येशूने त्या स्त्रीचा अनादर केला नाही तर तो तिची परीक्षा पाहण्यासाठी, ती विश्वासामध्ये कितपत टिकून राहील हे पाहण्यासाठी तिच्या विश्वासाची परीक्षा पाहतो. आपण पाहातो की, तिचा विश्वास खूप मोठा आहे. देवाने इस्राएलला दिलेल्या आशीर्वादाचा लाभ परराष्ट्रीयांनाही मिळावा हा देवाचा हेतू आहे असे ती म्हणते. यावरून समजते की जे ख्रिस्तावर खरा आणि दृढ विश्वास ठेवतात त्यांच्यासाठी देवाच्या राज्याचे फायदे उपलब्ध आहेत हे तिला माहीत आहे तसेच तिला हेही माहीत आहे की देवाची कृपा आग्रहाने मागण्याचा अधिकार किंवा हक्कही आपल्याला नाही. कारण ती स्वतः मूर्तिपूजक आहे. परंतु असे असूनही तिने प्रभूला ओळखले आहे. म्हणूनच तर ती त्याला *प्रभूजी, दावीदाचे पुत्र* असे संबोधत आहे. आणि तिला खात्री आहे की तोच केवळ तिच्या मुलीला आरोग्य देऊ शकतो. म्हणून ती खंबीर राहून, दृढतेने प्रभूपाशी पुन्हा पुन्हा मागत आहे. तिचा अपमान करूनही ती चिडून किंवा निराश होऊन तिथून निघून गेली नाही तर देवाच्या उत्तराची, तिच्या मुलीला आरोग्य देण्याची वाट पाहात ती तिथेच थांबली आहे. कारण तिला समजले होते की *तारण व सूटका केवळ दाविदाचा पुत्र, प्रभू येशू ख्रिस्तामध्येच आहे.* म्हणूनच तिने माघार घेतली नाही. ती प्रभूसमोर लीन आणि नम्र झाली. कोणत्याही प्रकारचा वादविवाद न करता नम्रपणे तिने ख्रिस्ताचे म्हणणे ऐकून घेतले. आपल्या अंतःकरणात तिने किंचितही अविश्वासाला जागा दिली नाही. जसे याकोबाने देवाबरोबर झगडून आशीर्वाद प्राप्त करून घेतले होते, तो प्रभूला म्हणाला, *जोपर्यंत तू मला आशीर्वाद देत नाही तोपर्यंत मी तुला जाऊ देणार नाही.* त्याप्रमाणेच या स्त्रीने माघार न घेता प्रभूची वाट पाहात राहिली आणि तिने विश्वासाचे प्रतिफळ म्हणजे आपल्या मुलीसाठी आरोग्य आणि आशीर्वाद मिळविला. येशूने तिला उत्तर दिले, *"बाई, तुझा विश्वास मोठा, तुझी इच्छा सफळ होवो," आणि त्याच घटकेस तिची मुलगी बरी झाली. ( मत्तय १५:२८)*
प्रियांनो, *प्रभूने म्हटले मागा म्हणजे तुम्हांस मिळेल.* आम्ही मागतो, परंतु आम्ही धीर धरून आणि चिकाटीने प्रभूची वाट पाहात नाही. आम्ही कालांतराने देवाकडे मागायचे सोडून देतो किंवा काही लोक तर देवालाच सोडून देतात आणि बहकून दूसऱ्या दैवतांकडे जातात. आम्ही तसे करू नये तर आम्ही आमच्या प्रभूची वाट पाहात राहावी. कारण उपदेशक म्हणतो, प्रत्येक गोष्टींचा समय नेमून दिलेला आहे. त्याच वेळी ती घडून येईल. म्हणून देवाच्या लोकांनी स्वतःसाठी किंवा इतरांसाठी प्रार्थना करीत असताना चिकाटी दाखवली पाहिजे, धीर धरून वाट पाहिली पाहिजे. आणि माघार न घेता विश्वासात दृढ राहिले पाहिजे. देव उत्तर द्यायला विलंब लावत आहे म्हणून नव्हे तर प्रत्येक गोष्ट जरी आपल्याला समजत नसली तरी आपण ख्रिस्तावर अवलंबून आहोत हे त्यावरून दिसते. आम्ही धीर धरून चिकाटीने प्रार्थना करतो तेव्हा प्रभू आमची प्रार्थना निश्चितच ऐकेल आणि आम्हाला आशीर्वाद दिल्याशिवाय राहाणार नाही.
No comments:
Post a Comment