Monday, 1 February 2021

नीतीने व मर्यादेने वागावे



         *✨नीतीने व मर्यादेने वागावे✨*


*धन्य आशाप्राप्तीची म्हणजे आपला थोर देव व तारणारा असा जो येशू ख्रिस्त त्याचे गौरव प्रगट होण्याची वाट बघत आपण अभक्तीला व ऐहिक वासनांना नाकारून सांप्रतच्या युगात मर्यादेने, नीतीने व सुभक्तीने वागावे..✍*

                *( तीत २:१२,१३)*


                           *...मनन...*


          *!!..परमेश्वराची स्तुती असो..!!*


       विश्वासणाऱ्यांचे आचरण देवाला संतोषविणारे आणि गौरव देणारे असावे यासाठी ते योग्य विश्वासावर आधारलेले असावे आणि ते देवासोबतच्या आपल्या नातेसंबंधांमध्ये मुळावलेले असे असावे. देवाप्रती असलेली आपली प्रीति आणि कृतज्ञता ही अंतःकरणातून आलेली असावी. आपली काहीच पात्रता नसताना आपल्याला दाखवली गेलेली देवाची प्रीति, हीच त्याची सेवा करण्यासाठीची व त्याच्यावर असलेली आपली श्रद्धा काढून घेणाऱ्या कोणत्याही गोष्टीला नाही म्हणण्यामागची आपली प्रेरणा असायला हवी. सर्व माणसांना तारण देणारी देवाची कृपा ही प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे प्रगट झाली. ह्या कृपेनेच एखाद्या व्यक्तीचे तारण होते. तो जिवंत होतो. पौल म्हणतो, *देव दयासंपन्न आहे म्हणून आपण आपल्या अपराधांमुळे मृत झालेलो असतानाही त्याने आपल्यावरील स्वतःच्या अपरंपार प्रेमामुळे, ख्रिस्ताबरोबर आपणाला जिवंत केले. ( कृपेने तुमचे तारण झालेले आहे.) ( इफिस २:४,५)* ह्या कृपेने देव आम्हाला ख्रिस्ती जीवनाविषयीचे धडे शिकवितो. आम्ही ह्या जगामध्ये देवावरच्या विश्वासाने व आशेने जगतो. ती आशा ही की, येशू ख्रिस्ताचे गौरव प्रगट होणार आहे. व तो लवकरच परत येणार आहे आणि आम्हाला त्याच्यासमवेत घेऊन जाणार आहे. कारण तो आमचा थोर आणि उद्धारक देव आहे. तो आमचा तारणारा आहे. आणि ह्या आशेनेच आम्ही त्याची वाट पाहात असावे. पौल म्हणतो, *आपण सत्कृत्ये करावी म्हणून ख्रिस्त येशूच्या ठायी निर्माण केलेले असे आपण त्याची हस्तकृती आहो, ती सत्कृत्ये आचरीत आपण आपला जीवनक्रम चालवावा म्हणून देवाने ती पूर्वी योजून ठेवली. ( इफिस २:१०)*


    प्रत्येक विश्वासू ख्रिस्ती जिची मनापासून अपेक्षा करतो ती "धन्य आशा" म्हणजे "आपला थोर देव आणि तारणारा असा जो ख्रिस्त त्याचा गौरव प्रकट करणे" आणि त्याच्यासोबत सनातन काळ राहण्याची अपेक्षा करणे.   आपली वृत्ती व वर्तणूक ह्यांत तफावत नसावी. तर आम्ही स्वतःला सर्व गोष्टींविषयी चांगल्या कामाचा कित्ता असे इतरांना दिसले पाहिजे. देवाच्या आगमनाची वाट पाहात असताना देवाचा आदर न करण्याची जी वृत्ती म्हणजेच अभक्ती आणि पाप करण्यास उत्तेजित करणाऱ्या अशा जगातील गोष्टी ह्यांचा आम्ही त्याग करावा. त्यांना *"नाही म्हणावे "* देवाची आदराने आराधना करणे, देवाच्या दृष्टीमध्ये नीट आणि योग्य असे आचरण ठेवणे आणि शिस्तीने वागणे ह्याकडे आम्ही लक्ष द्यावे. कारण पूर्वी आम्ही ख्रिस्तापासून दूर होतो. परंतु आता आम्ही ख्रिस्ताच्या ठायी नवीन उत्पत्ति असे आहोत. *तुम्ही त्यावेळेस ख्रिस्तविरहित, इस्राएलाच्या राष्ट्राबाहेरचे, वचनांच्या करारास परके, आशाहीन व देवविरहित असे जगात होता. परंतु जे तुम्ही पूर्वी 'दूर' होता, ते तुम्ही आता ख्रिस्त येशूच्या ठायी ख्रिस्ताच्या रक्ताच्या योगे 'जवळचे' झाला आहां. ( इफिस २:१२,१३)* 


    प्रभू येशू ख्रिस्ताने वधस्तंभावर आमच्या पापांबद्दल खंडणी भरून स्वप्राण अर्पण केला. आणि तोच आम्हाला स्वैर वर्तनापासून मुक्त करून आम्हाला पवित्र आणि शुद्ध करतो. त्याला आमचे तारण व्हावे ह्यासाठी खूप मोठी किंमत मोजावी लागलेली आहे म्हणून आम्ही अभक्तीला व ऐहिक वासनांना नाकारून, चांगली कामे म्हणजेच सत्कृत्ये करून सांप्रतच्या युगात मर्यादेने, नीतीने व सुभक्तीने वागावे आणि देवाची कृपा प्राप्त करून घ्यावी. विश्वासणाऱ्यांनी प्रभू येशूच्या पुनरागमनासाठी तयारीत राहावे. त्यांनी ही आशा सोडू नये की प्रभूच्या आगमनाचा दिवस तो आजचा दिवसही असू शकतो.


*"आमचे आचरण असे असावे की, आम्ही देवाचे स्वतःचे लोक आहोत हे आमच्या आचरणातून लोकांना आम्ही दाखवून द्यावे."*


         

                       

                      

No comments:

Post a Comment