Monday, 8 February 2021

माझे घर प्रार्थना घर






              *✨माझे घर प्रार्थना घर✨*





*"तुला व तुझ्या मुलाबाळांना धूळीस मिळवितील, आणि तुझ्यामध्ये चिऱ्यावर चिरा राहू देणार नाहीत, कारण तुझ्यावर कृपादृष्टी केल्याचा समय तू ओळखला नाहीस"..✍*


                          *( लूक १९:४४ )*





                           *...मनन...*




          *!!..परमेश्वराची स्तुती असो..!!*




     प्रभू येशू ख्रिस्ताने जेव्हा यरूशलेमेत प्रवेश केला त्या प्रसंगाविषयी त्याच्याबद्दल बायबल मध्ये लिहिले आहे की, *"येशूचा यरूशलेमेत जयोत्सवाने प्रवेश."* होय, खरोखरच प्रभूने जय मिळविला होता. आणि तो यरूशलेमेस येत असताना सर्व लोकांमध्ये खूप उत्साहाचे वातावरण दिसून येते. ते सर्वजण प्रभूने केलेली जी महत्कृत्ये त्यांनी पाहिली होती त्या सर्वांमुळे आनंद करून उच्च स्वराने देवाची स्तुती करीत म्हणत होते, *"'प्रभूच्या नावाने येणारा' राजा धन्यवादित असो, स्वर्गात शांति, आणि उर्ध्वलोकी गौरव !!"* खूप आनंदाने ते स्तुती करीत होते. आणि ह्याउलट त्यांच्यापूढे चालणारा त्यांचा राजा प्रभू येशू ख्रिस्त यरूशलेमेच्या जवळ आल्यावर त्या शहराकडे पाहून *रडत होता.* कारण आनंदाने उत्सव करणाऱ्या या लोकांनी देवाबरोबर समेट करण्याच्या गोष्टींकडे दुर्लक्ष केले होते. देवाने यहूदी लोकांवर कृपादृष्टी करून आपल्या एकूलत्या एका पुत्राला त्यांच्याकडे पाठवले. परंतु त्यांनी त्याच्याकडेही दुर्लक्ष केले. आणि प्रभू येशू ख्रिस्त त्या शहराकडे पाहात रडत रडत म्हणत आहे की, *"जर तूं, आज निदान शांतीच्या गोष्टी जाणून घेतल्या असत्या तर किती बरे झाले असते ! परंतु आता त्या तुझ्या दृष्टीपासून गुप्त ठेवण्यात आल्या आहेत." ( लूक १९:४२)* त्यांच्याकरिता आता न्यायनिवाडा तेवढा राहिला होता. *जे देवाच्या कृपेचा नाकार करतात, त्यांच्या जीवनात असा क्षण यायची शक्यता असते की, कृपेची संधी त्यांना पुन्हा कधीच लाभणार नाही.*

     यरूशलेमेचा नाश सुमारे पस्तीस वर्षांनी होणार होता हे प्रभू येशू ख्रिस्ताला माहीत होते. त्या समयी रोमी सैन्याने ह्या शहराला वेढा दिला आणि त्यांनी त्या शहरातील लोकांचा कोंडमारा केला. भयंकर दुष्काळ पडला. प्रभू येईल आणि ह्यांतून आपली सूटका करील ह्या अपेक्षेने ते वाट पाहात होते, परंतु प्रभू येशू ख्रिस्ताने म्हटल्याप्रमाणे रोमी सैन्याने अखेर ते शहर धूळीस मिळविले व मंदिर उध्वस्त केले. प्रभू येशू ख्रिस्ताने जे म्हटले होते ते ( लूक १९:४३,४४) ह्या वचनाप्रमाणे घडून आले. नंतर जेव्हा येशू मंदिरात गेला तेव्हा त्याने पाहिले की, त्या मंदिरात व्यापाऱ्यांनी तेथे येणाऱ्या लोकांना लूटण्याचा धंदा चालविला होता. प्रभूने आपल्या अधिकाराने त्यांना बाहेर घालवून टाकले. आणि त्यांना म्हणाला, *"'माझे घर प्रार्थनेचे घर होईल' असा शास्रलेख आहे; परंतु तुम्ही त्याची 'लूटारूंची गूहा' केली आहे." ( लूक १९:४६)* प्रियांनो, परमेश्वराचे मंदिर म्हणजे आमचे शरीर होय. पौल म्हणतो, *तुम्ही देवाचे मंदिर आहां आणि तुम्हांमध्ये देवाचा आत्मा वास करितो हे तुम्हांस ठाऊक नाही काय ? (१ करिंथ ३:१६)* आम्ही जर देवाचे मंदिर आहोत तर आम्ही किती विशेषकरून स्वतःला पवित्र ठेविले पाहिजे. कारण देव पवित्र आहे, तसेच त्याचे मंदिर ही पवित्र असावयास हवे. म्हणून आम्ही कुठल्याही पापाला, अपवित्रतेला आमच्यामध्ये थारा देऊ नये तर स्वतःला शुद्ध आणि पवित्र राखावे. पौल म्हणतो, *तुम्ही मोलाने विकत घेतलेले आहां; म्हणून तुम्ही आपल्या शरीराने देवाचे गौरव करा. ( १ करिंथ ६:२०)* 

    होय प्रियांनो, यरुशलेमच्या लोकांना जिवंत देवाचे सान्निध्य समजले नाही, त्याची महानता, त्याचे देवत्व त्यांनी ओळखले नाही. परंतु आपला परमेश्वर आपल्याला एक स्थान देत आहे. तेथे नेहमी जिवंत देवाचे सान्निध्य असणार, ते स्थान गौरवाने भरलेले असणार, ते स्थान देवाच्या पवित्र तेजाने पूर्ण भरलेले असणार. परमेश्वर आपल्याला एक अभिवचन देत आहे... *"मी आपल्या इस्त्राएलासाठी एक स्थान नेमून देईन. मी तेथे त्यास रोवीन; म्हणजे ते आपल्या स्थानी वस्ती करुन राहतील व तेथून पुढे कधी ढळणार नाहीत."  (१ इतिहास १७:९)* आपल्या जीवनात ख्रिस्ताला आपण जे स्थान दिले आहे त्याप्रमाणे आपला भविष्यकाळ असणार आहे. आपण ख्रिस्ताला आपल्या अंतःकरणात स्थान देऊ या. त्याला आपल्या हृदयात वसतीस बोलावू या. कारण आपण देवाचे मंदिर आहोत.     




     

No comments:

Post a Comment